कोकण दुर्गयात्रा – तेरेखोल, रेडी, वेंगुर्ला

सकाळची १०:३० ची वेळ. चार दुर्गयात्री तेरेखोलच्या खाडीवर फेरीची वाट पाहत उभे होते. आधीच एक दिवस उशीर झाला असल्याने फेरीला केरीमच्या धक्क्यावर येताना होणारा उशीर पाहून आमची घालमेल होत होती. काही करून आज तेरेखोल आणि रेडीचा यशवंतगड पाहून मुक्कामी निवती गाठायची होती. तरच आखलेली मोहीम आटोक्यात येणार होती. तुमच्या लक्षात आले असेलच हे दुर्गयात्री कोण होते ते? केरीमहून फेरीने खाडी पार करून १५ मिनिटातच तेरेखोल किल्ल्यात पोहोचता येते. तेरेखोल जरी गोव्यामध्ये येत असले तरी तेरेखोलला जायचा गाडीरस्ता महाराष्ट्रातूनच जातो. 

तेरेखोल हा महाराष्ट्र आणि गोव्याच्या सीमेवरचा एक छोटेखानी किल्ला. तेरेखोल नदीच्या मुखावर हा किल्ला दिमाखात उभा आहे. किल्ल्याच्या दारापर्यंत गाडीरस्ता असल्याने कुठेही दगदग होत नाही. गोवा सरकारने काही वर्षापूर्वी तेरेखोल किल्ल्याचे रुपांतर एका अलिशान हॉटेल मध्ये केले होते. त्यामुळे किल्ल्याचे मुळचे रूप पूर्ण हरवून गेले आहे. संपूर्ण किल्ला जांभ्या दगडात बांधलेला आहे. गडाचे दरवाजे जुने दिसत असले तरी ते मुळचे आहेत कि हॉटेलसाठी जुन्या पद्धतीने तयार केले ते कळत नाही. समोरच “Fort Tiracol” अक्षरे लक्ष वेधून घेतात. भिंतीलगतच एक जुना भला मोठा पेटारा ठेवण्यात आला आहे. किल्ल्यात प्रवेश करताना लगेचच जाणवते ती इथे केलेली आकर्षक रंगरंगोटी. आत शिरल्यावर समोरच दिसते ते पोर्तुगीज धाटणीचे सेंट अॅंथोनी चर्च. तसेच किल्ल्याच्या तटबंदीला लागून हॉटेलसाठी बांधण्यात आलेल्या खोल्या दिसतात. या खोल्या आणि चर्च हे कायमच बंद असतात. इथून प्रवेशद्वारावरील सज्ज्यावर जाण्यासाठीचा जिना आहे. समोर दिसणारा केरीमचा किनारा, पांढरी शुभ्र रेती  आणि अरबी समुद्राचे निळेशार पाणी पाहून मन सुखावते. तटावरून आसपासचा परिसर बघत किल्ल्याच्या पाठीमागे जायचे आणि पुन्हा चर्च जवळ खाली उतरायचे. सध्या इथले हॉटेल जरी बंद केले असले तरी संपूर्ण किल्ला पाहून दिला जात नाही. गोव्याच्या फिरंग्यांवर कडक नजर ठेवण्यासाठी वाडीच्या सावंतांनी बांधलेल्या या किल्ल्यावर पोर्तुगीजांचाच प्रभाव जास्त दिसून येतो. रंगरंगोटी, वेळोवेळी झालेली डागडुजी, यामुळे हा किल्ला चांगला राहिला असला तरी आपल्यासारख्या दुर्गवेड्यांना ही गोष्ट नक्कीच अस्वस्थ करते.

तेरेखोल
तेरेखोल

तेरेखोल पासून ६ किमीवर रेडी नावाचे बंदर आहे. मॅंगनीजच्या खाणीसाठी नावाजलेले. पण याच गावात एक उत्कृष्ट किल्ला आहे हे फारच कमी लोकांना माहित आहे. रेडी खाडीच्या मुखावरच असलेल्या टेकडीवर मोक्याच्या जागी यशवंतगडची उभारणी केली गेली आहे. रेडी गावातून समुद्राकडे जाण्याच्या रस्त्यावर अगदी शेवटी गडाकडे जायची पायवाट लागते. या पायवाटेने झाडीझुडुपातून मार्ग काढताना समोर येतो तो यशवंतगडाचा भव्य दरवाजा. हा दरवाजा गडाच्या सपाटीवर असून येथून बालेकिल्ल्यावर जाण्याची पायवाट आहे. ही पायवाट आपल्याला बालेकिल्ल्याच्या दरवाज्यापाशी घेऊन जाते. येथे दोन्ही बाजूस अतिशय खोल खंदक खोदलेले दिसतात. किल्ल्याची उंची फारशी नसल्याने हे खंदक संरक्षणाच्या दृष्टीने जास्त उपयोगी ठरत असावेत. या दरवाज्यातून आत गेल्यावर लगेच दुसरा दरवाजा लागतो. हे दोन्ही दरवाजे अतिशय भक्कम तटबंदीने जोडलेले आहेत. आतील कमानी दरवाज्याच्या जवळ एक दिंडीची वाट सुद्धा आहे. शिवाय याच दरवाज्याला लागून उजव्या हाताला तीन सुंदर कमानीची एक वास्तू आहे. पहारेकऱ्यांच्या देवड्या डाव्या हाताला दिसतात. आणि समोरच गडाचा तिसरा दरवाजा आहे. या दरवाज्यातून आपण बालेकिल्ल्यात प्रवेश करतो. बालेकिल्ला सुमारे २०-२५ फुट उंच भक्कम तटबंदीने संरक्षित केला आहे. या तटावरून संपूर्ण गडाला फेरी मारता येते. वाटेत ठीकठिकाणी असलेले प्रशस्त बुरुज, तटातील जंग्या आणि बाजूचा अखंड खंदक पाहण्यासारखे आहेत. तटावरून फेरी मारताना गडाचा प्रचंड विस्तार जाणवत राहतो. गडाच्या उत्तरेला तटबंदीमध्ये एक चोरवाट आणि छोटी खोली आहे ती पाहून बालेकिल्ल्याच्या मध्यभागी असलेल्या एक भव्य वास्तूकडे जायचे.

रेडी-यशवंतगड
रेडी-यशवंतगड

गडाच्या मध्यभागी सपाटीवर बांधलेली ही भव्य दुमजली वास्तू राजवाड्याची आहे हे त्याच्या बांधणीवरूनच लक्षात येते. एकाला जोडून एक अशी अनेक दालने आणि असंख्य दरवाजे यामुळे आपण नक्की कुठून आत आलो आणि कुठल्या दिशेला चाललोय तेच लक्षात येत नाही. या राजवाड्याच्या मधल्या चौकात खांबाचे कोरीव दगड विखुरलेले दिसतात. अजूनही बऱ्यापैकी सुस्थितीत असलेल्या या बांधकामाला आता झाडांच्या मुळांनी घेरायला सुरवात केली आहे. या राजवाड्याच्या बांधणीमध्ये थोडीफार पोर्तुगीज छाप जाणवते. राजवाड्यातून बाहेर पडल्यावर दक्षिणेला एक मंदिर आहे आणि बाजूची वाट आपल्याला परत मुख्य दरवाज्याकडे घेऊन जाते. दुर्लक्षित राहिल्याने गडावर झाडीझुडूपांचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे बरेचसे अवशेष नीट पाहता येत नाहीत. यशवंतगड संपूर्ण फिरायला दीडतास सुद्धा कमी पडतो. गडाचा इतिहास फारसा ज्ञात नसला तरी शिवरायांनी या गडाची डागडुजी केल्याचे उल्लेख आढळतात.

आम्ही आखलेल्या बेतानुसार पुढचे ठिकाण होते ते वेंगुर्ल्यातील डचांची वखार. रेडी गावापासून वेंगुर्ला फक्त २० किमी. माडा-पोफळीच्या वाड्यांमधून जाणारा छोटा वळणावळणाचा रस्ता नजरेस सुखावत होता. शिवाय कोकणात येऊन मासे नाही खाल्ले तर तो कोकणाचा अपमान. त्यामुळे एके ठिकाणी बांगड्याचा काटा सुध्दा चाटूनपुसून खाल्ल्यावरच वेंगुर्ला गाठले. वेंगुर्ला हे एक ऐतिहासिक बंदर. शिवकाळात तर ते फारच नावाजलेले. इथला सुरक्षित समुद्र हेरून डचांनी वेंगुर्ला बंदर ताब्यात घेतले आणि धक्क्याशेजारी बांधली एक वखार. याला वखारीपेक्षा एक छोटा भुईकोट म्हणाले तरी चालेल. कारण ही वास्तू तटबंदी आणि बुरुजांनी संरक्षित केली गेली आहे. सध्या येथे फक्त भग्नावशेष शिल्लक आहेत. आपल्या पुरातत्व खात्याने या वखारीवर शिक्का मारला आहे तो म्हणजे धोकादायक वास्तूचा. पण खरेच या इमारतीचा कोणताही भाग कधीही कोसळू शकेल इतक्या धोकादायक अवस्थेत ती उभी आहे. वखारीच्या भव्य प्रवेशद्वारात देवड्या आहेत. आत गेल्यावर समोरच दुमजली इमारतीचे कोसळलेले अवशेष दिसतात. एक फेरी मारून मागील बाजूस गेल्यावर एक वैशिष्ट्यपूर्ण बांधणीने तोललेला जिना दिसतो. तर वरच्या बाजूस काही खोल्या आणि छताचे ढासळलेले अवशेष आहेत. हे सर्व पहायचे मात्र अतिशय काळजीपूर्वक. वखारीचा इतिहास मात्र अतिशय रंजक आहे. १६५५ साली ३००० तोळे खर्च करून वखार उभी केली गेली. तर नंतर दरवर्षी ९ किलो सोने वखारीवर खर्च होत होते. वखार बांधण्यासाठी केलेल्या खर्चाकडे पाहिल्यास या ठिकाणाचे त्याकाळचे महत्व नक्कीच जाणवते. खरेतर वखार म्हणजे व्यापाराची एक जागा जेथे मालाची साठवण करता येऊ शकेल. परंतु डच, इंग्रज किंवा पोर्तुगीज यांनी वखारीचा उपयोग आपले साम्राज्य वाढवण्यासाठी जास्त केला. एकेकाळी वेंगुर्ल्याच्या वखारीत १० तोफा आणि २०० बंदुकधारी होते असे उल्लेख उपलब्ध आहेत.

वेंगुर्लाची वखार
वेंगुर्लाची वखार

प्लाननुसार आम्ही एक दिवस पिछाडीवर जरी असलो तरी आमचा प्रयत्न होता शक्य तेवढे पुढच्या किल्ल्याचा जवळ जाऊन मुक्काम करणे. उशीर झाला होताच. कोकणात रात्री गाडी पळवणे तसे धोकादायकच. पण तरीही मुक्काम किल्ल्याच्या जवळच झाला पाहिजे होता. म्हणून उशीर झाला तरी पुढच्या गावात पोचलो. गावात मुक्कामी येष्टी आधीच येऊन झोपली होती. एक मोकळी जागा पाहून तंबू लावला. पौर्णिमा तोंडावर आल्याने कुठल्याही दिव्याची गरज भासत नव्हती. भरतीला आलेल्या समुद्राचा आवाज, माडातून पोफळीत घुसणारा वारा, गावात रडणारी कुत्री आणि कोकणात हमखास अनुभवास येणारे गुढ वातावरण. गप्पांसाठी निसर्गाने मस्त भट्टी जमवून दिली होती. अरे हो!!! या किल्ल्याचे नाव सांगायचेच राहिले. किल्ले निवती.

वेंगुर्ला वखार
वेंगुर्ला वखार

Posted in

Reply

Your email address will not be published. Required fields are marked *