कोकण दुर्गयात्रा – निवती, सिंधुदुर्ग

भल्या पहाटे जाग आली ती एका कोकणी म्हातार्‍याच्या बडबडीने आणि शेजारी उभ्या असलेल्या येष्टी च्या घरघर ने. निवती गावातील माणसे जशी जागी होऊ लागली तसे त्यांचे कुतुहल सुद्धा जागे होऊ लागले… घार जशी आपल्या सावजा भोवती घिरट्या मारते तसे एकेक गावकरी येऊन आमच्या तंबू भोवती घिरट्या मारत होता… कोण, कुठले, कशासाठी आला वगैरे प्रश्न वाढायच्या आधीच आम्ही बस्तान उठवले. तसेही उन्हं चढायच्या आत आम्हाला निवती सर करायचा होता. पिट्टू मध्ये आवश्यक सामान आणि कॅमेरा खांद्याला लटकावून निवतीचा डोंगर चढायला सुरवात केली.

निवती वरून सूर्योदय
निवती वरून सूर्योदय

निवती गावाशेजारी समुद्रात घुसलेल्या एका डोंगरावर मोक्याची जागा बघून बांधलेला किल्ला म्हणजे निवती किल्ला. गावातूनच ताडा-माडाच्या बागेतून एक पायवाट किल्ल्याकडे जाते. १० मिनिटे चढून गेल्यावर जांभ्या खडकात खोदलेल्या पायऱ्या लागतात. पायऱ्यांच्या दोन्ही बाजूस १५-२० फुट खोदलेला खंदक दिसतो. थोडे पुढे गेल्यावर किल्ल्याची तटबंदी डावीकडे ठेऊन पूर्ण उध्वस्त झालेल्या दरवाज्यातून गडावर प्रवेश करायचा. माथ्यावर आल्यावर दोन पायवाटा दिसतात. समोरची पायवाट सरळ माथ्यावरून जाते तर उजवीकडे जाणारी पायवाट तटाला सोबत करते. सरळ जाणाऱ्या पायवाटेने गेल्यास एक भली मोठी उध्वस्त इमारत लागते. तर डावीकडे तटबंदी. या तटबंदीवरून निवती गाव आणि पांढऱ्या रेतीचा किनारा अतिशय नयनरम्य दिसतो. तसेच समुद्रात घुसलेल्या पुळणीवर दोन बेसाल्टचे सुळके लक्षवेधक दिसतात. मगाशी पाहिलेल्या इमारतीचा बराचसा भाग अजूनही शाबूत आहे. याच इमारती मधून गडाच्या पश्चिमेच्या बाजूच्या बुरुजावर जायचे. दुरवर पसरलेला अरबी समुद्र डोळ्यात मावून घेण्याचा प्रयत्न करायचा आणि तटबंदीच्या बाजून जाणाऱ्या पायवाटेने गडाच्या उत्तरेला जायचे. गडाची उत्तर बाजू खोल खंदकाने संरक्षित केली आहे. तटबंदीवरचे तीन बुरुज अजूनही शाबूत आहेत. गोलाकार आकाराच्या या बुरुजावर जाण्यासाठी केलेल्या पायऱ्यासुद्धा दिसतात. मात्र त्या ढासळलेल्या अवस्थेत असल्याने बुरुजावर जाणे टाळलेलेच बरे. मात्र येथून दिसणारा भोगवे आणि देवबाग परीसर आपली नजर खिळवून ठेवतो. याच पायवाटेने पुढे गेल्यास गडावर प्रवेश केल्याची जागा येते. येथे आपली गडफेरी पूर्ण होते.

निवती किल्ला
निवती किल्ला

सिंधुदुर्गाची बांधणी केल्यावर लगेचच महाराजांनी निवती किल्ल्याची उभारणी केली. किल्ल्याचा घेर आणि किल्ल्यावर अवशेष कमी असले तरी येथून दिसणाऱ्या नितांत सुंदर दृश्यांसाठी मात्र येथे आवर्जून भेट दिली पाहिजे. तासाभराची गडफेरी उरकून खाली गावात आलो आणि गावातल्या एकमेव हॉटेलात चहा-नाष्टाची फर्माईश दिली. निवतीचा समुद्रकिनारा पाहिल्याशिवाय आम्हाला चैन थोडेच पडणार होते? बैठ्या आणि कौलारू घरांच्या मधून वाट काढत आम्ही तडक किनारा गाठला. किनाऱ्यावर हवापालटासाठी आणलेल्या होड्या त्या छोट्याश्या किनाऱ्याची शोभा वाढवत होत्या. तर समुद्रावरून येणारा वारा लाटांना खडकांशी खेळवत होता. तिकडे गावात गरमागरम कांदेपोहे आमची वाट पाहत होते त्यामुळे थोडा वेळ खारा वारा पिऊन परत फिरलो.

निवती ते मालवण २७ किमी अंतर तासाभरात कापून आम्ही थेट मालवणच्या जेट्टी पाशी गाडी उभी केली. पुढचा किल्ला सिंधुदुर्ग. असंख्य पर्यटक आणि व्यावसायीकरणामुळे सिंधुदुर्ग बघणे म्हणजे धावपळच. इथले घड्याळ फेरीवाल्यांच्या सोयीनुसार चालते. ४ किमी परिघाच्या या अवाढव्य किल्ल्यास भेट देण्यास फेरीवाले आपणास फक्त एक तास वेळ देतात. एका तासात हा किल्ला पाहणे ३ तासाचा सिनेमा पळवून पळवून पाहिल्या सारखेच आहे. आम्ही सर्वांनी सिंधुदुर्ग आधी बऱ्याचदा पहिला असल्याने येथे जास्त वेळ घालवायचा नाही असे ठरवून फेरीमध्ये बसलो. पण कितीही वेळा सिंधुदुर्ग पाहिला असला तरी लहान मुला प्रमाणे किल्ल्याची जवळ येणारी नागमोडी तटबंदी बघता बघता होडीतील वेळ कसा जातो कळतच नाही. किल्ल्याच्या गोमुखी दरवाज्यासमोरच सर्व होड्या थांबतात. प्रचंड उंचीच्या भव्य तटामधून किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत प्रवेश करायचा. पर्यटकांचे ऐतिहासिक आकर्षण असल्याने किल्ल्यामधील पायवाटांचे आता सीमेंटच्या रस्त्यांमध्ये रूपांतर झाले आहे. किल्ल्यामध्ये पाहण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत.

सिंधुदुर्ग - महापुरुष मंदिर
सिंधुदुर्ग – महापुरुष मंदिर

पण कमी गर्दी पाहून आम्ही थेट महापुरूषाच्या मंदिरापाशी गेलो. तिथून तटबंदीवरून चालत शिवराजेश्वर मंदिराच्या मागच्या बाजूस आलो. या भागात फारशी बांधकामे नसून येथीलच दगड वापरून किल्ल्यामध्ये इतर ठिकाणी बांधकामे केली आहेत. पर्यटकांचा लोंढा येण्याच्या आधीच आम्ही शिवराजेश्वर मंदिरात आल्यामुळे शिवरायांचे दर्शन अगदी निवांत झाले. येथून पुढे दुधबाव, दहिबाव आणि साखरबाव (बाव म्हणजे विहीर) पाहून निशाणा बुरूज गाठला. येथून समोर तटबंदीमध्ये चोर दरवाजा दिसतो. यालाच राणीचा वेळा म्हणतात. बाजूचे राजवाड्याचे अवशेष पाहून आम्ही परत फिरलो. किल्ल्यामध्ये अजून एक आकर्षण म्हणजे महाराजांच्या उजव्या हाताचा आणि डाव्या पायाचा ठसा. हे दोन्ही ठसे महादरवाज्याशेजारील तटबंदीमध्ये घुमटीमध्ये आहेत. येथून दरवाज्यावर असलेला नगारखाना पाहून खाली आलो की आपली धावती गडफेरी संपते. खरे तर सिंधुदुर्ग संपूर्ण पाहायला दिवस सुद्धा कमी पडेल.

सिंधुदुर्ग बद्दल जेवढे लिहावे सांगावे तेवढे कमीच आहे. जंजिराच्या सिद्दीवर मात म्हणून आणि टोपीकरांवर वचक ठेवण्यासाठी महाराजांना एका भक्कम जल दुर्गाची गरज होती. आणि त्यासाठी त्यांनी मालवण शेजारच्या कुरटे बेटावर किल्ला बांधावयास घेतला. तीन वर्षे अहोरात्र खपून आणि एक कोटी होन खर्चून शिवलंका सिंधुदुर्गाची उभारणी झाली. महाराजांची दूरदृष्टी, सिंधुदुर्गाचे स्वराज्यातील मोलाचे योगदान अश्या इतिहासातील अनेक गोष्टींचा विचार करत परत फेरीने मालवण गाठायचे. किल्ल्यामधील पायपि‍टीने पोटात भुकेचा समुद्र खवळला होता. पुन्हा एकदा बांगड्याची आणि पोटाची गाठ भेट झाली आणि पुढचा बेत ठरवायला घेतला.

सिंधुदुर्गची सर्पाकार तटबंदी
सिंधुदुर्गची सर्पाकार तटबंदी

सिंधुदुर्गाला जमिनीवरून संरक्षण देण्याच्या दृष्टीने महाराजांनी मालवणच्या अवतीभोवती अजून तीन दुर्गांची उभारणी केली. त्यातील दोन किल्ले अगदी किनार्‍यावरच आहेत. एक म्हणजे पद्मगड आणि दुसरा राजकोट. तर तिसरा सर्जेकोट थोडा लांब. मालवण किनार्‍यावरून उत्तरेला २० मिनिटे चालले की राजकोट लागतो. काहीही अवशेष शिल्लक नसलेल्या या किल्ल्यावरून सिंधुदुर्गाचा अवाढव्य आकार लक्षात येतो. पूर्णपणे भुईसपाट झालेल्या या किल्ल्याच्या सपाटीचा उपयोग मासे वाळवण्यासाठी होतो. माश्यांचा वास सहन करत कसे बसे १० मिनिटे राजकोटवर घालवून परत फिरायचे.

पद्मदुर्ग
पद्मदुर्ग

किल्ले पद्मगड अगदी सिंधुदुर्गाच्या समोर उभा ठाकला आहे. सिंधुदुर्गला होडीतून जाताना डाव्या हाताला अनेक भगवे झेंडे लावलेले ठिकाण दिसते. हाच पद्मगड. मालवण किनाऱ्यावरून दक्षिणेला १५-२० मिनिटे चालल्यावर दांडगेश्वराचे देऊळ लागते. येथूनच समोरच्या पुळणीवरून चालत पद्मगड गाठता येतो. फक्त भरतीच्या वेळी मात्र ही पुळण समुद्रामध्ये गुडूप होऊन जाते. सिंधुदुर्गच्या गोमुखी प्रवेशद्वारासमोरच पद्मगडचे एकमेव प्रवेशद्वार आहे. गडाचा आकार अगदीच छोटा असून संपूर्ण तटबंदी अजूनही शाबूत आहे. दरवाज्यातून आत प्रवेश केल्यावर एक कोरडी विगीर लागते तर समोर दिसते ते वेताळाचे मंदिर. पाचच मिनिटात गडफेरी पूर्ण होते. दांडगेश्वराच्या समोरच्या या पुळणीवरून ओहोटीच्या वेळी सिंधुदुर्गापर्यंत सहज चालत पोहोचण्यासारखे आहे हे महाराजांनी ओळखून येथे पद्मगडाची उभारणी केली. शिवाय या पुळणीचा उपयोग करून छोट्या जहाजांच्या दुरुस्तीसाठी पद्मगडाचा उपयोग करण्यात येत असे.

सर्जेकोट
सर्जेकोट

सिंधुदुर्गाचा तिसरा पाठराखा सर्जेकोट मालवण पासून ४ किमी वर सर्जेकोट गावातच उभा आहे. एका छोट्या गढीसारख्या या किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी एकच प्रवेशद्वार आहे. किल्ल्यात प्रवेश केल्यावर डाव्या हाताला एक घर लागते तर घरापाठीमागे सर्जेकोटचा बालेकिल्ला उभा आहे. बालेकिल्ल्याची तटबंदी आणि चार बुरुज अजूनही भक्कम अवस्थेत आहेत. बालेकिल्ल्यात प्रचंड झाडी वाढल्याने येथे फिरणे अतिशय अवघड होऊन गेले आहे. तरी सुद्धा थोडी वाट काढत एक तुळशी वृंदावन आणि पडकी विहीर मात्र शोधता येते. जांभ्या दगडात बांधलेल्या या किल्ल्याची तटबंदी आणि सात बुरुज या वयातही आपण भक्कमपणे उभे आहोत याची जाणीव करून देतात.

सिंधुदुर्गाला भेट देणाऱ्यापैकी फक्त बोटावर मोजण्याएवढेच लोक, शिवलंकेच्या या पाठीराख्यांना भेट देतात. हे किल्ले आकाराने छोटे असले तरी त्यांचे ऐतिहासिक दृष्ट्‍या महत्त्व बरेच मोठे आहे. असो. एका दिवसात पाच किल्ले पाहून आमच्या थकलेल्या आणि घामेजलेल्या शरीराला झांट्येच्या हॉटेलने आधार दिला. (त्यासाठी पंकजचे मन:पूर्वक आभार.) आणि “होऊ द्या खर्च” म्हणत गुबगुबीत गादीवर पाठ टेकली.

Posted in

Reply

Your email address will not be published. Required fields are marked *