कोकण दुर्गयात्रा

आम्ही ट्रेक कसे ठरवतो हे आत्तापर्यंत तुम्हाला माहित झाले असेलच परंतु हा ट्रेक (खरेतर दुर्गयात्रा) आधीच ठरली होती. मागच्या महिन्यातील जावळी मोहिमेतच पुढचा ट्रेक सी लेवलला करायचा ठरले होते. त्याला फक्त एक आखीव रेखीव स्वरूप देणे बाकी होते. आणि ते काम दोन मिशीवाल्यांनी (एक वारज्याची आणि एक खराडीची) हाती घेतले होते. आंबेगाव बुद्रुकचे “राजकुमार काकडे” सी लेवल साठी “C Level” असल्याने त्यांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली होती. आणि आमचा चौथा भिडू खंडूजीराव तर सेकण्ड होम साठी गोव्यातच पडीक असल्याने अति-उत्साही होते. त्यामुळे कमीतकमी चर्चेनंतर आमची कोकण दुर्गयात्रा “एकदम फायनल” झाली. नाताळ आणि नवीन वर्षाची गर्दी चुकविण्यासाठी आम्ही आदल्या आठवड्याचा बेत आखला होता.

प्लान अ फायनल

१४ डिसेंबर
तेरेखोल, रेडी (मुक्काम)
१५ डिसेंबर
वेंगुर्ला , निवती (मुक्काम)
१६ डिसेंबर
सिंधुदुर्ग, मालवण (मुक्काम), राजेकोट, पद्मगड
१७ डिसेंबर
सर्जेकोट, भरतगड (आडवळणी), भगवंतगड, देवगड (मुक्काम)
१८ डिसेंबर
विजयदुर्ग, अंबोळगड, पूर्णगड, रत्नागिरी (मुक्काम)
१९ डिसेंबर
रत्नदुर्ग, जयगड, अंजनवेल (मुक्काम)
२० डिसेंबर
गोपाळगड, शृंगारतळी, चिपळूण, कराड

घाबरू नका. प्लान जरी भला मोठा दिसत असला तरी मी एवढे लिहिणार नाही. सुट्टी संपवण्यासाठी मी आमच्या कराडच्या घरी डेरे दाखल होतो. त्यामुळे तिथेच बाकी भिडू येऊन मिळाले. शनिवारी पहाटेच कोल्हापूर-निपाणी रस्ता पकडून सुसाट निघालो. रस्ता तर एकदम भन्नाट. दोन्ही बाजूला उसाची हिरवीगार शेती, फटफटणारे तांबडे आणि गाडीत रंगणाऱ्या गप्पा. आजरा फाट्यावर इडली-वडा-सांभार दाबून हाणले आणि पुन्हा एकदा गाडी पळायला लागली. वाटेत आंबोलीच्या महादेवगडाचे दार ठोठावून घेतले आणि भटकंतीचा श्रीगणेशा केला. पुढे आता सावंतवाडी-रेडी-तेरेखोल असा अजून दोन तासाचा पल्ला शिल्लक होता. पण एवढा मस्त प्लान आणि भट्टी जमत असतानाच कुठेतरी बिनसले आणि गाडीचे नशीब फिरले. त्या थोडक्या कामाने सगळा दिवस खाल्ला. कोणालातरी आमची भटकंती पचली नव्हती . त्यामुळे नुकत्याच झालेला जादूटोणा कायदा झुगारून आम्ही “लागलेली नजर” उतरवायला अज्ञातवासात जायचे ठरवले. प्लान एक दिवस पुढे ढकलला आणि सुरु झाला संपूर्ण अज्ञातवास.

कोकण दुर्गयात्री
कोकण दुर्गयात्री

अहो, जाऊ नका कुठे. अज्ञातवास फक्त एकाच दिवसाचा आहे. भटकंती चालू राहणार आहेच. त्यामुळे आमच्या कोकण दुर्गयात्रेचा उर्वरित वृत्तांत लवकरच.

ता.क. या दुर्गयात्रेमध्ये एक नवीन उपक्रम केला. “Mobile Photography”. मोबाईल मधून मोबाईल साठी काढलेले फोटो :). त्याची ही झलक.

Posted in

One response

Reply

Your email address will not be published. Required fields are marked *