सुधागड – एक यादगार ट्रेक

दोन आठवडे चाललेली मेला-मेली आणि अजयच्या खूप साऱ्या “SMS” च्या कष्टांचे फळ म्हणून सुधागड-सरसगडचा ट्रेक ठरला. तसेही बरच दिवसात कोणीच ट्रेक केला नव्हता. त्यामुळे सगळे उत्साहात होते. अचानकपणे अनुष्काने मी पण येणार म्हणून पिल्लू सोडले आणि तिच्यामुळे सर्व मुलींनी “मी” चा सूर लाऊन धरला. झाले. मोठा फौजफाटा जमला. बोटे संपली तरी नावे संपत नव्हती. म्हणजे ट्रेक बराच स्मरणीय ठरणार असे दिसत होते. मुलींच्या येण्यामुळे  सरसगडला फाटा दिला आणि सुधागड जवळचीच ठाणाळे लेणी (जमल्यास) करायचे ठरले. भारताच्या मंत्रिमंडळात होणाऱ्या खाते वाटपाप्रमाणे अजयने प्रत्येकाचे हित बघून कामे वाटून दिली. अन्याकडे “खादी”चे काम तर स्वान्याला भांडी आणायला सांगितले होते. तर आमचा अनुभवी माणूस ट्रेकमधील जीवनावश्यक चीजवस्तू आणणार होता. मी वाटाड्या होतो तर हृश्या, गोखले आणि खंड्या हे बिनखात्याचे मंत्री होते. चला बरीच तयारी झाली होती. पण हृश्या आणि गोखले यांनी अचानकपणे पाठींबा काढून घेतला तर स्वान्या आणि मंडळी ट्रेकच्या रात्री २ वाजता कटाप झाले. शेवटी उरली फक्त आम्ही सहा टाळकी. असो.

Sudhagad from Thakurwadi
Sudhagad from Thakurwadi

सकाळी ६ ला माझ्याघरी जमून सामान वाटप झाले. आणि आम्ही खोपोली च्या दिशेने निघालो. वाटेत रामकृष्ण मध्ये पोटभर चापून घेतले. खोपोली ते पाली रस्ता प्रचंड खराब होता. खंड्या आणि अजय दुचाकीवर असल्याने ते एका खड्ड्यातून दुसऱ्या खड्ड्यात असा प्रवास करत होते. पालीमध्ये पोहोचेपर्यंत ११ वाजले होते. पाली गावातच सरसगडाचे उंच सुळके आहेत. या ट्रेक मध्ये सरसगड मुकणार म्हणून अजयने पुढचा ट्रेक इथेच ठरवून घेतला. पुढे पाच्छापूर-ठाकूरवाडी कि धोंडसे असे दोन पर्याय होते. शेवटी शिडीची आणि जवळची वाट म्हणून ठाकूरवाडीतून जायचे असे ठरले. १५-२० मिनिटात ठाकूरवाडीमधील शाळेसमोर गाड्या लाऊन आम्ही सुधागड कडे बघत उभे राहिलो. मुग्धाचा पहिलाच ट्रेक असल्याने ती एवढा मोठा गड आपण चढू कि नाही असे म्हणत साशंक होती. खंड्याने तर जे होईल ते होईल असे ठरवले होते. गाडीमध्ये बसल्या बसल्या मुग्धाने सुधागडची बरीच माहिती वाचून घेतलेली. त्यामुळे तिचा उत्साह टिकून राहिला होता. चला आता सुरवात. गावातल्या खोपाटांमधूनच गडावर जायची वाट होती. हळूहळू गाव मागे पडले आणि आम्ही सुधागडाचा डोंगर चढू लागलो. सुधागडबद्दल थोडेसे. पंचक्रोशीतील ठाणाळे आणि खाडसाम्बळे लेणी बघता गडाचे संदर्भ सुमारे इ.स. दुसऱ्या शतकापर्यंत मागे जातात. गडावरील भोराईदेवीच्या स्थानावरून पडलेले मुळनाव म्हणजे “भोरपगड”. स्वराज्यात आल्यावर “सुधागड” असे नामकरण झाले.
Ladder at Sudhagad
Ladder at Sudhagad

१०-१५ मिनिटातच आम्हाला गडाची शिडी लागली. सध्याची शिडी म्हणजे एक भक्कम लोखंडी जिनाच आहे. या जिन्यामुळे येथील “रॉकपॅच” ची भीती बरीचशी कमी झाली आहे. पण तिथेच खाली जुनी शिडी दिसते. त्यावरून पूर्वी हि वाट नक्कीच बिकट असल्याचे जाणवते. वाट तशी रुळलेली असल्याने चुकण्याचा काहीच संभव नाही. शिवाय खडी चढण असली तरी गर्द झाडीमुळे फारशी दमछाक होत नाही. एका बाजूला तैल-बैल च्या आभाळात घुसलेल्या भिंती आणि दुसऱ्या बाजूला कोकण असल्याने वाटेमध्ये बरेच थांबे घेत आम्ही सह्याद्रीच्या रांगणेपणातील सौंदर्याचा आस्वाद घेतला. तैल-बैल आणि सुधागड मधल्या दरीतून खळखळत वाहणाऱ्या नदीमुळे तर अजूनच मजा येत होती. सुमारे तासभर चढाई केल्यावर पूर्णपणे उध्वस्त झालेला दरवाजा लागला. इतःस्तता विखुरलेले दरवाज्याचे दगड पाहून मन उदास होते.

तिथूनच पुढे कातळात कोरलेला बुरुज आणि त्यामागे लपलेला पाच्छापूर दरवाजा लागतो. दरवाज्यापर्यंतच्या कोरीव पायऱ्या बऱ्यापैकी शाबूत आहेत. तिथेच आडोश्याला पाण्याचे एक टाके सुद्धा आहे. थोडी विश्रांती आणि पोटाला आधार देऊन आम्ही पुढे निघालो. अजून अर्धा तास चढायचे. एका छोट्याश्या धबधब्याशेजारची खडी चढण पार केली समोर येते ते माथ्यावरचे विस्तीर्ण पठार. हुश्श.. आश्चर्य म्हणजे मुग्धा सगळ्यात आधी येऊन  आमच्या स्वागताला उभी होती. आम्ही वर पोहोताच बदादा पाऊस कोसळू लागला. आमचे पुढचे उद्दिष्ट होते ते म्हणजे माथ्यावरचा “सरकारांचा वाडा” शोधणे. गावकर्यांनी सांगितल्याप्रमाणे पठारावरून सरळ चालत गेले कि वाडा लागतो. म्हणून amhi नाकासमोर सरळ निघालो. पण मधेच नाकानेच दिशा बदलली त्यामुळे आम्ही भलतीकडेच पोहचलो. आधीच पावसाचे फटकारे बसत होते त्यात भर म्हणून धुके वाढले. डोळ्यात बोटे घातली तरी काही दिसत नव्हते. चार दिशांना घोडे पिटाळावे तसे मुलींनी आम्हाला वाडा शोधण्यास पाठवले. दीडेक तासाची शोधमोहीम करून एकदाचा वाडा दिसला. तो सुद्धा आमच्या मागेच. काखेत कळसा आणि वाड्याला वळसा.

Sarkar Wada
सरकारांचा वाडा ही गडावरची एकमेव शाबूत असलेली वास्तू आहे. वाड्यात प्रवेश करताच क्षणी आमचा थकवा दूर पळाला. जुन्याकाळची चौसोपी पद्धतीची बांधणी. प्रशस्त पडव्या. शेणाने सारवलेल्या ओसऱ्या. संपूर्ण सागवानी बांधकाम. बाजूच्या एका खोलीमध्ये भल्यामोठ्या पेटाऱ्यात भांडी भरून ठेवली आहेत. गडावर येणार्यांच्या वापरासाठी. आमचा रहायचा प्रश्नच मिटला. एक कोपरा पकडून सामान टाकले आणि सगळे आडवे झालो. मग हळूहळू अजय आणि अन्याने जेवायची तयारी सुरु केली. मी आणि खंड्या उगाच फोटोग्राफी करत वेळ काढत होतो. मुलींनी तर चक्क टेंट मध्ये ताणून दिली होती. थोड्याच वेळात गरमागरम सूप आणि खिचडी तयार झाली. पोट शांत करून सगळे गप्पा मारत आडवे झालो. अन्या आणि खंड्याच्या घोरण्याच्या तालावर  माझी झोप डोळ्यासमोर नाच करत होती. शेवटी एक दोनदा धोसलून खंड्याचा आवाज कमी झाला आणि मीही झोपी गेलो.

Pachhapur Darwaja
Pachhapur Darwaja

सकाळी लवकर उठून अजयने चहाची तयारी सुरु केली. पण त्याच्या इम्पोर्टेड स्टोव ने दगा दिला. ओल्या लाकडांवर चूल पेटवायचे अनेक प्रयत्न असफल झाले. शेवटचा उपाय म्हणून वाड्याशेजारी खोपट्यात राहणाऱ्या एका आजींकडून चहा करून घेण्यास अन्याला धाडले. तोवर मी आणि अजय पाण्याची सोय करण्यासाठी बाहेर पडलो. गडाच्या चोर दरवाज्याशेजारी पाण्याचे टाके आहे असे वाचले होते. परत येईपर्यंत चहा तयार होता आणि खंड्याने यशस्वीपणे चूल पेटवून दाखवली होती. त्यामुळे लगेच मॅग्गी चा प्रोग्राम उरकून घेतला. सामानाची आवरा-आवर करून पुढे गडाचा महादरवाजा बघायला जायचे असे ठरले. आजींपाशी सामान ठेऊन आम्ही गडदर्शन करायला निघालो.
Bhorai devi temple
Bhorai devi temple

वाड्याजवळच्या पायऱ्यांच्या वाटेने गेले कि दोन वाट दिसतात. उजवीकडची वाट आपल्याला अंबरखाना आणि टकमक टोक यांच्याकडे घेऊन जाते. आणि समोर दिसते ते भोराईचे मंदिर. भोरच्या पंतसचिवांची ही कुलदेवी. मंदिरामध्ये एक पोर्तुगीज(?) घंटा आहे. चिमाजी आप्पांच्या वसई मोहिमेतील ही घंटा असावी. सध्या मंदिरासमोर तिथलेच कोरीव दगड वापरून सभामंडप बांधायचे काम चालू आहे. मंदिराच्या भोवती अनेक सती शिळा दिसतात.
Portuguese Bell
Portuguese Bell

इथूनच समोर दिसणारा तैल-बैलचा डोंगर मन हरखून घेतो. तसेच तैल-बैल वरून येताना लागणारा कावडीचा डोंगर आणि नाणदांड घाटाचा परिसरसुद्धा दृष्टीस पडतो. देवीच्या मंदिरासमोरून एक वाट दिंडी दरवाजा उर्फ महादरवाजा कडे घेऊन जाते. खोदीव पायऱ्या असल्याने ही वाट चुकायची अजिबात भीती नाही. गडाची दुसरी धोंडसे गावामधून येणारा मार्ग दिंडी दरवाज्यातूनच येत असल्याने वाट बरीचशी मळलेली आहे. हा दिंडी दरवाजा म्हणजे रायगडाच्या महादरवाज्याची हुबेहूब प्रतिकृती आहे. गोमुखी रचनेचा हा दरवाजा पाहताना गडाची भक्कम बांधणी लक्षात येते.
Dindi Darwaja
Dindi Darwaja

सुधागडचा माथा म्हणजे एक विस्तीर्ण पठार आहे. राजगडावरून जेव्हा महाराजांनी राजधानी सुरक्षित ठिकाणी हलवायचा विचार केला होता तेव्हा सुधागडचा सुद्धा विचार केला होता. परंतु त्यामानाने कमी पाणी आणि आडवळणीचे स्थान म्हणून कदाचित सुधागड पेक्षा रायगडला प्राधान्य देण्यात आले असावे. साधारणपणे २ तासामध्ये गडफेरी पूर्ण होते. गडावर बघण्यासारखे बरेच अवशेष शिल्लक आहेत. आम्ही परताना आजीबाईच्या खोपातापाशी थोडी विश्रांती घेतली निघताना आमच्या जवळचा उरला सुरला खाऊ आणि एक शाल असे आजीबाईला देऊन आम्ही परतीच्या वाटेवर लागलो. उतरताना फारसे थांबे न घेता ठाकूरवाडीत आलो. मुग्धा मागे सारखी फिरून एवढे आपण खरेच चढून आलो याची खातरजमा करून घेत होती. ठाकूरवाडीच्या शाळेत थोडावेळ अंग टेकून आम्ही आळसावलो. अजय आणि खंड्याला परत एकदा खड्ड्यांची सफर करायची होती पण रामकृष्ण मधले जेवण खुणावत असल्याने फारसा वेळ न घालवता पुण्याच्या रस्त्याला लागलो.
एकंदरीत गाजावाजा करून ठरवलेल्या आणि आयत्या वेळी मुख्य मोहरे कटाप झाल्यामुळे सुरवातच गंडलेल्या परंतु अनेक सुखद अनुभव दिलेल्या या ट्रेकमुळे हा वीकेंड नक्कीच यादगार झाला.

Posted in

One response

  1. […] महिन्यापूर्वी सुधागडचा ट्रेक झाला तेव्हा वेळेअभावी ठाणाळे […]

Reply

Your email address will not be published. Required fields are marked *