पुन्हा एकदा रतनगड

नाणेघाट-जीवधनला जाऊन महिना होत आला तरी पुढच्या ट्रेकचे योग जुळत नव्हते. त्यामुळे अजयचा जीव कासावीस होत होता. शेवटी त्याने ऑफिसमधील लोकांना घेऊन ट्रेक करायचे ठरवले. हो-नाही करत १८-१९ चा वीकेंड ठरला. फेसबुकची पाने चाळताना पंकजचा ट्रेकचा अपडेट पाहिला होताच. पण मी विचारायच्या आधीच त्याचे मेल येऊन थडकले. “ट्रेकला जायचे काय?” उत्तर तयारच होते. चला. परत एकदा नेहमीचा प्रश्न. कुठे? हरिश्चंद्र, रतन, मकरंद, वासोटा अशी नावे समोर असताना ट्रेक ठरवताना डोक्याची मंडई होते. मग हा नको, तो नको, इकडे जरा बरे वाटतेय असे करत रतनला जायचे नक्की केले. पंकज गाडी घेतो म्हणाल्यावर ट्रेक ५ टाळक्यापुरता मर्यादित करून अजयच्या मित्रांना (क)पटवले. तरीही आयत्यावेळी एक मोहोरा गळालाच. शेवटी मी, पंक्या, अजय आणि अनिकेत असे चारच भिडू राहिलो.

Valley View Panorama - from Ratangad top
Valley View Panorama – from Ratangad top

पहाटे ५ला निघायचे ठरवून आम्ही ६ वाजता नळस्टॉपच्या हॉटेलात पोहे हादडत होतो. त्यामुळे आम्हाला पुण्याबाहेर पडून हायवेला लागायला ६३० वाजलेच. या ट्रेकमध्ये मी-अजय आणि पंकज-अनिकेत अश्या दोन भटक्या जोड्या पहिल्यांदाच एकत्र आलो होतो. तरीही सह्याद्रीच्या रान-वाटांची आवड असल्याने सूर जुळायला वेळ नाही लागला. मग इकडच्या-तिकडच्या गप्पा, ट्रेकच्या बाता मारत, नारायणगावात “बजरंग”चे वडापाव आणि वाफाळणारे मसाला दुध पिऊन पुढे मार्गस्थ झालो. कोतूळमार्गे जायचे असल्याने बरेच अंतर वाचणार होते. कोतुळ हे गाव पूर्वी कुंतलपूर नावाने ओळखले जायचे. येथे चंद्रहास राजाची राजधानी होती. बराच जुना संदर्भ असल्याने गावात अनेक जुने वाडे बघायला मिळाले. वाड्यांचे घडवलेले दगडी जोते आणि कोरीव लाकडी दरवाजे पाहून पूर्वीच्या समृद्धीची कल्पना नक्कीच करवत होती. गावातील गर्दीत राजूरचा फाटा चुकल्याने आम्हाला अकोलेवरून राजूरला जावे लागले. हा संपूर्ण रस्ता अतिशय देखणा आहे. अनेकदा थांबून फोटो काढण्याची हुक्की येत होती मात्र वेळेला जागून आम्ही ती टाळत होतो. राजूरमध्ये एक फक्कड चहा मारला आणि भंडारदऱ्याकडे सुटलो. शेंडी(गावाचे नाव आहे)च्या खालीच रतनवाडीचा फाटा लागतो. या रस्त्याने जाताना उजवीकडे आडवा-तिडवा पसरलेला भंडारदऱ्याचा जलाशय दिसत राहतो. आजूबाजूचा परिसर मधूनच एखाद्या मॉडेलसारखा पोजेस देत होता. आणि आम्ही मात्र पावसाळ्यात येथे अवतरणाऱ्या स्वर्गाची कल्पना करत रतनवाडीकडे निघालो होतो.
रतनवाडी हे रतनगडाच्या पायथ्याचे गाव. गावातच एक पुरातन शिवमंदिर आहे. सुमारे १०००-१२०० वर्षापूर्वी झंझ राजाने बांधलेल्या १२ शिवपुऱ्या पैकी हे एक. हेमाडपंथी रचनेच्या या मंदिराची कलाकुसर दृष्ट लागण्यासारखी आहे. मंदिराच्या सभामंडपात समुद्रमंथनाची शिल्पे कोरली आहेत. अशी सुंदर कलाकुसर बघता-बघता पोटातल्या कावळ्यांनी बंड पुकारल्याने गावातच एके ठिकाणी पिठलं-भाकरी चापली. प्रवरेवरच्या पुलाशेजारूनच गडाकडे पायवाट जाते. या वाटेने जाताना किमान ४-५ वेळा तरी प्रवरेचे पात्र ओलांडावे लागते. आत्ता जरी नदीला पाणी नसले तरी पावसाळ्यात हे पात्र ओलांडणे नक्कीच शिताफीचे काम असणार. गडावर जायची वाट संपूर्ण जंगलातून जात असल्याने चालणे अतिशय सुखद होते.
From the Ratangad Caves
From the Ratangad Caves

तरीही काही ठिकाणची खडी चढण छातीचा भाता मात्र नक्कीच फुलवत होती. सुमारे तासभराची चढाई झाल्यावर एका ठिकाणी कात्राबाई-हरिश्चंद्रकडे जाणारी अजून एक पायवाट लागते. येथे एक दगडी चौथरा विसाव्यासाठी बांधला आहे. त्यावाटेवर १५-२० मिनिटाच्या अंतरावर एक पाण्याचे टाके व मंदिर आहे. जवळचे पाणी संपले असल्यास येथील पाणी भरून घेण्यास हरकत नाही. नुकतेच पिठलं-भाकरी खाल्ली असल्याने आमचे विसावे सुद्धा बरेच होत होते. एके ठिकाणी तर अनिकेतने मस्त ताणून दिली होती. तो पंढरीच्या वाटेवर लागण्याआधीच त्याला उठवून जवळ आलेल्या गडाच्या शिड्यांचे आमिष दाखवून पुढे निघालो. थोड्याच वेळात आम्ही गडाच्या कातळभिंतीपाशी जाऊन पोचलो. येथून वर चढण्यासाठी दोन लोखंडी शिड्या बसवलेल्या आहेत. या शिड्या अतिशय अवघड जागी बसवलेल्या असल्याने आम्ही एका वेळी एकानेच वर जाण्याचा शहाणपणा केला. येथेच पूर्वीच्या कातळात खोदलेल्या पायऱ्यांच्या खुणा दिसत होत्या. ब्रिटिशांनी १८१८ मध्ये सह्याद्रीतील इतर किल्ल्यांप्रमाणे रतनगडावरसुद्धा तोफा डागून वर जाण्याचे सगळे मार्ग बंद केले होते. शिड्या चढून वर पोचताच आपल्याला गडाचा मुख्य दरवाजा लागतो. येथून अजून एक छोटा अवघड टप्पा चढून वर गेलो की गुहेकडे जाण्याची वाट दिसते.
येथून डावीकडेची वाट आपल्याला बालेकिल्ल्याकडे घेऊन जाते. गडावर २ गुहा आहेत. पहिल्या छोट्या गुहेत रत्नूबाईचे मंदिर असून दुसरी गुहा बरीच मोठी आहे. दोन्ही गुहांमध्ये मिळून ३० जणांची राहण्याची सोय आरामात होऊ शकते. पण आमच्या आधीच १५ गुज्जू भाईंच्या एका ग्रुपने मोठ्या गुहेचा कब्जा घेऊन तेथे खादाडीचे दुकान मांडले होते. आम्ही बापडे मात्र एका कोपऱ्यात बसून त्यांची मजा बघत होतो. खाकरा, बाकरवडी, सँडविच, फरसाण अश्या अनेक पदार्थांची नावे कानावर पडत होती. थोडी विश्रांती झाल्यावर आम्ही गुहेसमोरच्या कड्यावर बसून समोरचा निसर्ग बघत कांदा-चिवडा चापला. येथून समोर दिसतो तो भंडारदरयाचा विस्तीर्ण जलाशय. डावीकडे आभाळात घुसलेले कळसुबाईचे उंच शिखर. उजवीकडे घनचक्करचा डोंगर. असा सुंदर देखावा बघताना मन गुंग न झाले तरच नवल.
Sunset from Ratangad
Sunset from Ratangad

गुज्जूभाईंच्या ढोकळा आणि वेफर्सच्या दंग्याने आम्हाला भानावर आणले. आश्चर्य म्हणजे त्यांनी पिण्याचे पाणी उकळवून घ्यायची तयारी चालवली होती. हे म्हणजे कोकणात जाऊन पूर्वी गोठवलेले मासे खाल्ल्यासारखे झाले. शेवटी अजयने त्यांना पाण्याचे एक नितळ टाके दाखवल्यावर त्यांना जरा हायसे वाटले. हे टाके म्हणजेच प्रवरेचा उगम. देवाची करणी आणि नारळात पाणी म्हणतात ना त्याऐवजी कातळात पाणी असे म्हणायला हवे. त्या थंड पाण्याने आमचा सुस्तपणा कुठल्याकुठे पळाला. तोपर्यंत सूर्यास्ताची वेळ झालीच होती लागलीच आम्ही गडाच्या पश्चिमकड्यावर पोचलो. खरेतर जो ट्रेकमध्ये सूर्यास्त आणि सूर्योदयाच्या वेळा चुकवतो तो खरा ट्रेकर नव्हेच. पश्चिमकड्यावर उभे राहून नजरेखाली बुडणाऱ्या सूर्याला बघण्याची मजा काही औरच असते. कोकणातून वर चढणारे भन्नाट वारे कानात घुसले की ट्रेकची खरी मजा कळते. जणू सह्याद्रीच्या दऱ्या-खोऱ्यात घुमणारे हे वारे आपल्या कानात सह्याद्रीबद्दल गप्पागोष्टीच करत असतात.
Star-trail - Taken on Ratangad
Star-trail – Taken on Ratangad

सुर्यास्ताचा हा आनंद मनात भरून घेऊन आम्ही परत फिरलो. गुहेपाशी येताच दिसले की अजूनही ते गुज्जूभाई खाण्यातच गुंतले आहेत. आता फक्त त्यांची गाडी थोडी पुढे सरकून ठेपल्यांवर पोचली होती. अंधारात आम्हीसुद्धा त्यांच्या ‘भाई’गर्दीत मिसळून नुसते हात पुढे केले असते तरी ४-५ पदार्थ नक्कीच मिळाले असते. अजयने शांतता मिळावी म्हणून थोडी आड-बाजूला चूल पेटवून सूप-मॅग्गीची तयारी चालू केली होती. पंकजने गुहेमध्ये हळूच एक कोपरा पटकावून मस्त पडी दिली होती. मगाचच्याच कड्यावर बसून गरमा-गरम सूप पिताना गुज्जूभाईंच्या फिरक्या घेतल्या, परत एकदा फोटो-ट्रेको-ग्राफी च्या गप्पा झाल्या. तेवढ्यात गुज्जूभाईंच्या गोटातून एक आवाज आला. “अरे सुरेशभाई आज डिनरमा सु छे?” आम्ही लागलीच एकमेकांकडे बघितले. अजून डिनर बाकी आहे? तेसुद्धा बटर-खिचडी?? च्यायला. असो. चुलीवर रटरटून शिजलेली मॅग्गी खाऊन आम्ही झोपायची तयारी सुरु केली. अनिकेत आणि पंकजने गुहेतील कोपरा पकडून पाय पसरून दिले. तर मी आणि अजय गुहेसमोरच चांदण्या मोजत आडवे झालो. अमावस्या जवळ आल्याने चंद्र उगवणार नव्हताच. त्यामुळे रात्रभर या चांदण्याच आमच्या साथीला होत्या. आमच्या शेजारीच एक पुणेरी ग्रुप चिकन आणि बिर्याणी शिजवत बसला होता. शेजारधर्म म्हणून ओळख काढली. निहार, परिक्षित आणि अजिंक्य. बोलता बोलता आमच्याबरोबर वेगळ्या वाटेने खाली उतरायला तयारसुद्धा झाली. भलतीच उत्साही आहेत. त्यांचे आवरून होतानाच मी कॅमेरा स्टार-ट्रेल्ससाठी तयार केला. २ तासाचा गजर लावून कॅमेराला चांदण्यांवर सोडून दिले आणि गार वाऱ्याच्या झुळूकेबरोबर कधी झोपलो कळलेच नाही.
Ratangad Nedhe
Ratangad Nedhe

पहाटे घनचक्करच्या पाठीमागून आकाशात तांबडा रंग पसरायला सुरवात झाली. हळूहळू तांबड्यामध्ये नारिंगी रंग मिसळत गेला आणि एकदम सूर्याने सह्याद्रीपाठीमागून डोकावून आपण आल्याची वर्दी दिली. रंगांची ती उधळण पाहता पाहता अनिकेतने चहा बनवला. हातामध्ये आलं ठेचून घातलेल्या चहाचा वाफाळता कप, जोडीला बिस्किटांची थप्पी, समोरच्या दरीत सोनेरी प्रकाशात नुकतेच जागे होणारे गाव. आमच्या चहाकडे बघून गुज्जूभाईंचा प्रचंड जळफळाट होत होता. त्यामुळे आमच्या चहाला अजूनच चव येत होती. अचानक कड्यावरून ७-८ माकडांचे एक टोळके आले आणि गुज्जूभाईंच्या खायच्या सामानावर तुटून पडले. बहुतेक माकडांमधले ते गुज्जू असावेत. बिस्किटे, चिप्स जे हाताला मिळेल ते खात होती ती माकडे. इतकेच काय चुलीमध्ये शिजायला टाकलेले बटाटेसुद्धा माकडांनी तोंडी लावायला म्हणून घेतले. त्यांचा तो आवेश पाहून सगळे गुज्जूभाई गुहेमध्ये ग्रीलच्या आत जाऊन हताश बसले होते. तोपर्यंत सगळे आवरून आम्ही बालेकिल्ल्याकडे निघालो. वरच्या टाक्याचे पाणी भरून घेतले आणि आम्ही गडफेरीला निघालो. सोबत पुणेरी ग्रुप होताच. राणीचा हुडा, खोदीव टाकी, कोकण दरवाजा, अंधार कोठडी असे काही अवशेष गडावर बऱ्यापैकी शाबूत आहेत. गडाचे सर्वात जास्त आकर्षण कसले असेल तर ते नेढ्याचे. कड्याला आरपार पडलेल्या या भोकामध्ये बसून टाक्याचे थंडगार पाणी पिण्याचा आनंद आम्ही कसा चुकवणार? नेढ्याच्या पलीकडे उभ्या कातळात कोरलेला त्र्यंबक दरवाजा आहे. येथून खाली उतरण्यास पायऱ्या आहेत पण त्यासुद्धा ब्रिटीशांच्या हल्ल्यात फुटलेल्या. बाजूच्या कातळभिंतीला चिकटून खुट्टा आणि रतनगडामधल्या खिंडीत जायची वाट आहे. तिथूनच उजवीकडे जंगलात घुसायचे.
Be aware of monkeys of Ratangad
Be aware of monkeys of Ratangad

थोडे खाली उतरले की डावीकडेची वाट साम्रदकडे आणि उजवी वाट रतनवाडीकडे जाते. ही वाट म्हणजे आजूबाजूच्या गावातील लोकांसाठी शॉर्टकटच आहे. साम्रद, उडदवणे, कुमशेत आदि गावातील लोकांची ये-जा असतेच येथे. सकाळपासून पोटामध्ये काही नसल्याने कुठेतरी थांबून सूप करायचे ठरले. पुढे एका सपाटीवर थांबून चूल पेटवली. टोमॅटो-कॉर्न सूप आणि कालचा ब्रेड असा जंगली नाश्ता झाला. या वाटेने आम्ही परत कात्राबाईकडे जाणाऱ्या दगडी चौथऱ्यापाशी पोचलो. तासाभरात खाली उतरून प्रवरेच्या एका गोठवणाऱ्या डोहात मस्तवाल रेड्यासारखे डुंबून ट्रेकची सगळी झिंग घालवली आणि रतनवाडी गाठली. गावात फार वेळ न घालवता आळे फाट्याजवळ चौदानंबर मध्ये चिकन भाकरी तोडायला हजर झालो.
Reflection in water
Reflection in water

तसे बघितले तर आम्हाला कोणालाच रतनगड नवीन नव्हता. पण प्रत्येक वेळी मिळणारा आनंद मात्र काहीतरी नवीन अजून छान बघितल्याचा अनुभव देऊन जातो. येताना मात्र पुढच्या ट्रेकबद्दल ठरवायला विसरलो नाही.

Posted in

3 responses

  1. मस्त लिहिलंय. आपली शैली जवळपास सारखीच आहे रे लिहिण्याची.

    1. धन्यवाद पंकज. मलापण बरेचदा जाणवते हे.

  2. sagar pawar Avatar
    sagar pawar

    अरे मी कोतुळचा चं आहे हा इतिहास मला माहीत नाही…. धन्यवाद।!

Reply

Your email address will not be published. Required fields are marked *