राजमाची आणि खाद्यंती


बरेच दिवस नाईट ट्रेकचे बेत नुसतेच बनत होते आणि रात्रीच्या अंधारात विरत होते. मागचा ट्रेक होऊन महिना झाला होता. उन्हामुळे घराबाहेर पडणे तर सोडाच पण घरात बसणेसुद्धा अवघड झाले होते. पण ट्रेकची खाज काही पिच्छा सोडत नव्हती. बसल्या बसल्या लोकांचे फेसबुकवरचे ट्रेकचे फोटो बघून बिनधुराचे जळत होतो. शेवटी ठरले. काहीही झाले तरी बुद्ध पौर्णिमेला ट्रेक करायचाच. राजमाची गाठायचे ठरले. अजय तयारच होता कारण ५०-६० किल्ले फिरणारे आम्ही अजूनही राजमाचीच्या वाटेला गेलो नव्हतो. बाकी कोणालाच जमणार नव्हते त्यामुळे आम्ही दोनच शिलेदार रात्री गड सर करणार होतो.

Preparations
Preparations

उन्हाचा त्रास टाळण्यासाठी शनिवारी दुपारी निघायचे ठरले होते. त्यामुळे सकाळपासूनच छोट्या-मोठ्या कामात मदत करून घरातील वातावरण शांत ठेवायचा प्रयत्न करत होतो नाहीतर नाईट ट्रेकचे भवितव्य अंधारात गेले असते. सकाळी बाहेर पडलो तेव्हा मस्त २ जम्बो ग्लास भरून नीरा ढोसली. वाह.. येताना डझनभर रत्नागिरी हापूस आणले… घरी आलो तर जेवायला कांदे-बटाट्याचा झक्कास रस्सा आणि लसणाची चटणी. अर्धा डझन आंबे खाऊनच ताटावरून उठलो. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असे म्हणतात ना तसेच आता ट्रेकची सुरवात खाण्यातून दिसते असे म्हणायला हवे. असो.. अजय येईपर्यंत अजून वेळ होताच आणि आंबेसुद्धा आता डोळ्यातून पापणीवर येऊन थांबले होते.. एक तासभर डुलकी तरी नक्कीच झाली असती. ३ वाजता अजय उगवला. झोपमोड झाली.. चहा बनता बनता आमच्या सॅक भरून झाल्या. चहा पिऊन झोप जाते तोच बेल वाजली. कुरिअरवाला होता. परवाच ऑर्डर केलेले पेत्झिलचे हेड-टॉर्च आले होते. दुधात साखर पडावी तसे झाले. काय वेळ साधली होती साल्याने. या अनपेक्षित गोष्टीने आमचा उत्साह तर अजूनच वाढला. सूर्यास्ताला निदान लोणावळ्यात तरी पोहोचू असा विचार करून आम्ही साडे चारला बाहेर पडलो.

पोट तुडुंब भरेपर्यंत जेवलो असलो तरी वडापाव साठी नक्कीच जागा होती. कामशेतमध्ये ती जागा सुद्धा भरून घेतली. पुढे नॉन-स्टॉप लोणावळा गाठून तुंगार्लीच्या फाट्याला आत वळलो. येथून राजमाची अंदाजे १६-१७ किमी आहे. पायथ्याचे गाव उधेवाडी अथवा राजमाचीपर्यंत गाडी जाते (पावसाळा सोडून). अचानक तुंगार्लीमध्ये एक हलवाई जिलेबी तळताना दिसला. आमची खाऊगिरी परत एकदा उफाळून आली आणि अर्धा किलो गरमागरम जिलेबी बांधून सॅकला लटकवली. पोर्णिमा असल्याने आज चंद्र-सूर्याची गाठ तर पडणारच नव्हती. त्यामुळे पश्चिमक्षितिजावर डोकावणाऱ्या नागफणीच्या मागून सूर्य कोकणात उतरून गेला होता. सह्याद्रीतील कुठल्याही किल्ल्याकडे जाताना जसा रस्ता असतो त्याप्रमाणेच हा एक होता. धड रस्ता नव्हता की पायवाट. अंधार पडल्याने खड्डे-दगड-धोंडे काही न बघता गाडी पळत होती. पण एवढे नक्कीच जाणवत होते की आजूबाजूला बरीच घनदाट झाडी आहे.

Rajmachi-Jilebi

जांभळी फाट्यावर (येथे जांभळाची बरीच झाडे आहेत म्हणून पडलेले हे नाव) एक “हलता-डुलता” गावकरी कोणीतरी आपल्याला गावाकडे सोडेल या आशेवर उभा होता. त्याची “विचारपूस” करून आम्ही राजमाची कडे वळलो. वाटेत ३०-४० ट्रेकर मंडळी निवांतपणे राजमाचीचा रस्ता कापत होती. म्हणजे एकंदरीत आज गडावर पौर्णिमेची जत्रा होती तर. जुन्या आठवणींना उजाळा देत, अगदी सुस्तपणे आम्ही जात होतो. आकाशात काळे ढग जमत होते, त्यामुळे पावसाची शंका मनात घर करायच्या बेतात होती. चंद्र मधूनच डोकावून पौर्णिमेची जाणीव करून देत होता. एकूणच काय तर रात्रीच्या भटकंतीला पुरेपूर असे वातावरण बनले होते. पाठीवरच्या जिलेब्यांची सारखी आठवण करून देणारा वळणावळणाचा रस्ता फटाफट संपवत आम्ही उधेवाडीत पोचलो. तिथे तर वातावरणाचा रंगच वेगळा होता. प्रत्येक घराच्या ओसरीवर १०-१२ जणांचा घोळका बसला होता. काही घोळके तर चक्क “बसले”च होते. त्यांची असंबद्ध बडबड टाळून आम्ही एका ओसरीवर मुक्काम टाकला. घरातून एक चहा मागवला आणि उगाच काढायचे म्हणून फोटो काढत बसलो. थोड्याच वेळात आणलेल्या जिलेब्या बाहेर आल्या. काय खुसखुशीत होत्या त्या जिलेब्या. वाह.. एक दोन तुकडे खातोय तोच बाजूला कुर्रम-कुर्रम आवाज आला. आमच्या जिलेब्यांना अजून एक वाटणीदार मिळाला होता. एक कुत्रे आमच्या शेजारी बसून आमच्याच तोंडावर आमच्याच जिलेब्या खात होते. च्यायला. पण आम्हीसुद्धा भूतदया दाखवून २-३ तुकडे त्याला देऊन त्याचे तोंड बंद केले.

राजमाची वरचे पुरातन शिवमंदिर
राजमाची वरचे पुरातन शिवमंदिर

राजमाचीला दोन बालेकिल्ले आहेत. मनरंजन आणि श्रीवर्धन. दोन्हीच्या मध्ये खिंडीत भैरवनाथाचे मंदिर आहे. निदान तिथे जाऊन तरी मुक्काम करू असे आम्ही ठरवत होतो. पण माचीवर जवळच एक तलाव आहे कळल्यावर आधी तिकडे जाऊ असे ठरले. दक्षिणेला बोट दाखवून एकाने सांगितले त्या देवराईच्या पलीकडे तलाव आणि मंदिर आहे. चला… नवीन हेड-टॉर्च वापरायची वेळ आली होती. अतिशय गर्द राईमध्ये आम्ही शिरलो. असंख्य वटवाघुळानी फडफड करून उगाचच आम्हाला घाबरावायाचा असफल प्रयत्न केला. पाचेक मिनिटात आम्ही उदयसागर तलावापाशी पोचलो. सुमारे ३०० वर्षापूर्वी बांधलेला हा तलाव अतिशय सुंदर आहे. तलावाकाठीच थोडा वेळ बसून आम्ही मनसोक्त फोटोग्राफी केली. उल्हास खोऱ्यातून येणाऱ्या वाऱ्याच्या झुळुकेबरोबर मागील ट्रेकच्या गुजगोष्टी करत कसा वेळ गेला ते कळलेच नाही. अखेरीस पोटातल्या भुकेने आम्हाला तिथून उठावेच लागले. तलावाशेजारीच एक हेमाडपंथी बांधणीचे शंकराचे मंदिर आहे. सुमारे २५०० वर्षापूर्वी सातवाहन काळात या मंदिराची उभारणी झाली असावी असे मानले जाते. मंदिरसमोर बरीचशी सपाटी आहे. एक स्थानिक ग्रुप तिथे प्रचंड गोंधळ करत बसला होता. त्यातील बहुतेक पोरे निसर्गाची धुंदी अनुभवण्यापेक्षा “बाटलीच्या” धुंदीत होता. बाजूलाच एके ठिकाणी चौघेजण बिर्याणी बनवत होते. त्यांच्याच चुलीवर मी (यावेळी चक्क मी आचारी होतो) मॅग्गी बनवली आणि मस्त चांदण्यात बसून ताव मारला. आमच्या शेजाऱ्यांनी शेजारधर्म पाळत बिर्याणी दिली. त्यात मीठ जरी कमी असले तरी चविष्ट नक्कीच होती. त्यांच्याबरोबर थोड्याफार गप्पा मारून आमच्या पथाऱ्या पसरल्या. तेवढ्यात अजयला घरून थर्मास भरून आणलेल्या चहाची आठवण झाली. झाले. ग्लास भरले गेले. त्या मिडनाईट टी ने त्या दिवसाची सांगता झाली.
http://www.youtube.com/watch?v=mJ1YXG9RBbk

पहाटे लवकर उठून मनरंजन चढायचा असे झोपताना ठरले होते. पण पहाटे भुकेनेच हाक मारून आम्हाला उठवले. परत चूल पेटली आणि अजयने सूप नामक पिठले बनवले.

मनरंजनच्या बुरुजावरून
मनरंजनच्या बुरुजावरून

शिवमंदिराचे कालच्या गोंधळकरांनी बेडरूममध्ये रुपांतर केल्याने फोटो काढण्याची इच्छा आम्हाला आवरती घ्यावी लागली. त्यामुळे परत गावाकडे आलो. येताना मात्र वाटेतल्या देवराईचा गर्द्पणा अनुभवता आला. गावातूनच मनरंजन बालेकिल्ल्याकडे वाट जाते. वाट अगदी सोप्पी असल्याने पंधराच मिनिटात किल्ल्यावर पोहोचलो. मनरंजनवर बरेच अवशेष शिल्लक आहेत. भक्कम तटबंदी, वाद्याचे अवशेष, कातळात खोदलेले धान्यकोठार, वगैरे. बुरुजावरून आसपासचा बराचसा प्रदेश दृष्टिक्षेपात येत होता. दक्षिणेला समोरच्या डोंगरावर खंडाळा दिसत होते तर त्यामागे नागफणीचे टोक. तर पश्चिमेला पुणे-मुंबई रेल्वेमार्गावरचा बोरघाट. उत्तरेला ढाकचा किल्ला आणि पूर्वेला श्रीवर्धन बालेकिल्ला. मनरंजनच्या तटबंदीवरून फेरी मारून आम्ही खिंडीतील भैरवनाथाच्या मंदिरात उतरलो. वाटेत एके ठिकाणी कातळात खोदलेल्या तीन बौध्दकालीन गुहा आहेत. त्यातीलच एका गुहेत पाण्याचे टाके आहे. खिंडीतील हे मंदिर म्हणजे मुक्कामाची उत्तम जागा. येथे मंदिरासमोर दीपमाळ, दगडी घोडा, गजांतलक्ष्मीचे दुर्मिळ शिल्प, अनेक देवतांच्या मूर्ती असे बरेच अवशेष विखुरले आहेत. तर मंदिरामध्ये शिवाजीमहाराज, पेशव्यांनी दिलेल्या मूर्ती आहेत. श्रीवर्धनला जायचा बेत माझ्या दीड दिवसाच्या अटीमुळे रद्द करावा लागला. देवळाबाहेरच्या पारावर थोडावेळ पाठ टेकवून आम्ही परत गावाकडे फिरलो.

भैरवनाथ मंदिराच्या खिंडीतून दिसणारे उल्हास खोरे
भैरवनाथ मंदिराच्या खिंडीतून दिसणारे उल्हास खोरे

राजमाचीचे निसर्ग सौंदर्य बघून आमचे मन जरी भरत असले तरी पोट भरत नव्हते. गावातल्या घरात कांदेपोहे सांगून ओसरीवर पहुडलो तर डोळे कधी मिटले तेच कळले नाही. पोहे तयार झाल्याच्या वर्दीने जाग आणली. पोहे एकदम फक्कड झाले होते. बऱ्याच दिवसांनी मनसोक्त पोहे खाल्ले. आणि शिवाय जोडीला कोकम सरबत होतेच. त्यामुळे ढेकर यायला वेळ लागला नाही. पावसाळ्यात परत यायचे मनोमन ठरवून आम्ही परत निघालो. वाटेमध्ये एके ठिकाणी कैऱ्या पाडायला मात्र विसरलो नाही. पावसाळ्यात येथे अवतरणाऱ्या स्वर्गाची, जागोजागी दिसणाऱ्या असंख्य धबधब्यांची कल्पना करतच आम्ही घाट उतरत होतो. आता एका दमात घर गाठायचे होते कारण घरी मँगो मिल्कशेक आमची वाट बघत होता.

शिवमंदिर फोटो अजय काकडे कडून साभार…

9 responses

 1. लई बेस्स!
  चला परत पुढच्या वीकेंडला कुठेतरी.

  1. ठरवूयात… कोयनेच्या जंगलात जायचे का?

   1. लगेच चला.

 2. bhushan kulkarni Avatar
  bhushan kulkarni

  छान ..अजून विस्तृत असता तरी चालला असता …थोडक्यात संपवला असे वाटले..मंदिराचे फोटो पाहिजे होते यार..किमान बाहेरून तरी..बाकी जिलेबी आमच्या पण पोटात कुरकुरायला लागली..

  1. धन्यवाद भुषण… पुढच्या वेळी विस्तृत लिहायचा नक्की प्रयत्न करेन. आणि मंदिराचा एक फोटो टाकला आहे. अजून काढायची खूप इच्छा होती पण त्या स्थानिक मंडळींनी सगळा घोटाळा केला.

 3. bhushan kulkarni Avatar
  bhushan kulkarni

  उत्तम….असेच एक पुरातन मंदीर क्षेत्र महाबळेश्वरच्या वाहन तळ समोरील गल्लीत आहे…फारसे कोणाला माहित नाही..बघ कधी गेलास तर..पार भग्नावस्थेत आहे आता..

 4. Sagar Tahasildar Avatar
  Sagar Tahasildar

  Nice, like the description.

 5. […] राजमाची आणि खाद्यंती […]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *