भैरवगडची जंगलयात्रा

उन्हाळा म्हणले की समोर येते ते रुक्ष डोंगर, कोरड्या पडलेल्या नद्या आणि डोक्यावर तळपणारा सूर्य. त्यामुळे या दिवसात भटकंती तर सोडाच घरातून बाहेर पडणेसुद्धा जीवावर येते. पण आमच्यासारखे स्वच्छंदयात्री गप्प बसतील तर खरे ना. तेलबेल-ठाणाळे, राजमाची अश्या नुकत्याच झालेल्या उन्हाळी भटकंती नंतर आम्हाला वेध लागले होते ते एक जंगलयात्रेचे. त्यातूनच आमचे मित्रवर्य अनुप बोकील यांनी जयगड-भैरवगड-प्रचितगड अशी जंगली डोंगरयात्रा करून आम्हाला चिथावले होते. त्यामुळे मी, अजय,पंकज आणि अन्या मिळून भैरवगडचा बेत आखत होतो. आठवडाभर मेल नुसते ये-जा करत होते. शेवटी एकदाचा ट्रेकचा आराखडा तयार झाला. सर्वांचा उत्साह ओसंडून वाहत होता. शुक्रवारी कधी एकदा ऑफिसमधून निघतोय असे झाले होते सगळ्यांना. आपापल्या फेसबुकच्या भिंतीवर जुने ट्रेकचे फोटो आणि नवीन मजकूर चिकटवले आणि लोकांना खिजवायचे काम सुरु झाले.

भैरवगड बुरुज
भैरवगड बुरुज

आराखड्याप्रमाणे माझ्या घरी सर्वजण भेटलो. सामानाची देवाण घेवाण झाली. एकेक घोट चहा घेऊन बाहेर पडलो. या भटकंतीत दोन याद्या करायचे ठरले होते. एक खर्चाची आणि दुसरी काय खाल्ले याची. खाऊच्या यादीने खाते उघडतानाच चौकार मारला. चहा-बिस्कीट आणि जांभळे. आज रात्री कऱ्हाडला माझ्या घरी मुक्काम ठरला होता. आईला सांगून ठेवले होतेच त्यामुळे काहीतरी चमचमीत जेवायला मिळणार याची खात्री होतीच. तरीसुद्धा वाटेत भुईंजमध्ये विरंगुळावर वडापाव-मिसळ चापल्याशिवाय पुढे कसे जाणार? कऱ्हाडला पोहोचेपर्यंत १० वाजले. इकडच्या-तिकडच्या गप्पा होईपर्यंत पाने मांडली गेली. कढी-खिचडी-गुळांबा-लसणाची चटणी-पापड. वाह… एकदम झक्कास बेत. आईच्या हातच्या जेवणाला तोडच नाही. असो.. खरेतर पोटं तुडुंब भरलेली असताना झोप लागायला हवी पण आमचा उत्साह केवढा तो. रात्री १ वाजला तरी आमच्या गप्पा काही कमी झाल्या नाहीत. पहाटे लवकर उठून कोयनानगर-हेळवाक गाठायचे असल्याने नाईलाजाने डोळे मिटून उद्याच्या भटकंतीच्या स्वप्नात रमलो. पहाटे ६ला आईच्या हातचा चहा पिऊन आमची मोहीम सुरु झाली. कोयनेच्या काठाने जाणारा कराड-चिपळूण रस्ता म्हणजे कोणत्याही ऋतूमध्ये स्वर्गच. उन्हाळा आहे असे सांगूनही खरे वाटणार नाही एवढी हिरवाई होती आजूबाजूला. कोयना नदी म्हणजे महाराष्ट्राची प्रकाशदायिनी. महाबळेश्वरात उगम पावणारी ही अवखळ नदी हेळवाकजवळ अडवून कोयनानगरचे प्रचंड मोठे धरण दिमाखात उभे आहे. हा सर्व प्रदेश म्हणजे सदाहरित जंगलांनी व्यापलेला अति-दुर्गम प्रदेश. याच जंगलातील आडवाटांवर आहेत वासोटा-जयगड-भैरवगड हे रानटी वनदुर्ग. सूर्याच्या किरणांबरोबरच आम्ही हेळवाकमध्ये शिरलो. बस-थांब्या शेजारच्या हाटेलात बसून आम्ही गरमागरम चहा-शिरा हाणून दिवसाची सुरवात केली. भैरवगडला जाण्यासाठी कोंढावळे अथवा चाफ्याचा खडक या धनगर पाड्यापर्यंत जावे लागते. या हॉटेलशेजारूनच चाफ्याच्या खडकाकडे जायचा रस्ता आहे. घोटाभर भुसभुशीत चिकणमातीचा थर असलेल्या या रस्त्यावरून गाडी चढवणे म्हणजे एक दिव्यच होते. शेवटी गाडी खालीच एका घराशेजारी लाऊन आम्ही चालतच चाफ्याच्या खडकावर पोहोचलो. आम्हाला येताना पाहताच जयराम कोळेकर घरातून बाहेर येत वाटाड्या म्हणून यायला तयार झाले. यांच्या घरी बहुतांश सामान ठेऊन पाणी आणि थोडेफार खायला घेऊन आम्ही निघालो. चाफ्याच्या खडकापासून जवळच समर्थांचे वास्तव्य लाभलेली रामघळ आहे. आम्ही भैरवगड करून रात्रीच्या मुक्कामास या रामघळीत यायचे ठरवले होते. त्यामुळे रामघळीची वाट सोडून आम्ही भैरवगडाची पायवाट पकडली. आमचा वाटाड्या जणू त्या भागातील रोबिन हूड असल्यासारखा चालला पुढे चालला होता. हातातला कोयता सपासप चालवत त्याने घरासाठी एक-दोन वासे मोडून ठेवले. जर बेअर ग्रील्सने त्याचा हा कोयता बघितला असता तर त्याने पुढे कधीच स्वतःचा नाईफ वापरला नसता. मोठ्याने गाणी म्हणत, आरोळ्या ठोकत आमचा वाटाड्या पुढे चालला होता. मधूनच त्याला सांगावेसे वाटत होते की आम्हाला एखादे जनावर दिसले तरी चालणार आहे. धनगर पाड्यामागच्या डोंगराचा खडा चढ आमचा जीव काढत होता. चालताना कोयनेच्या घनदाट जंगलाची पुरेपूर अनुभूती आम्हाला येत होती. एवढी की दोघांमध्ये थोडे जरी अंतर पडले तरी समोरचा माणूस नक्की कुठल्या झाडोऱ्यात शिरला ते समजायला वावच नाही. जंगल म्हणले की रानमेवा हा आलाच. सुरवातीलाच जयरामने तोरणाचे झाड दाखवून त्याच्या फळांची चव चाखावली होती. ती चव जिभेवर रुळ्तेय तोच समोर हाडक्या जांभळीची झाडे. या जांभळाना गर नसला तरी चव नक्कीच भन्नाट होती.

रानमेवा
रानमेवा

वाटेवर एक गाव लागते. जुनं वाघने. १९६७ च्या भूकंपात या गावाची पूर्ण वाताहत झाली आणि हे गाव उठले ते कायमचेच. आता फक्त शिल्लक आहेत ती पडकी घरे आणि देवळांची जोती. गावाजवळूनच एक पावसाळी नदी वाहते. याच नदीच्या पात्रात एके ठिकाणी थोडे पाणी शिल्लक आहे. या पाण्यापाशी थोडावेळ पाठ टेकली आणि पुढे निघालो. इथे तर जांभळीची असंख्य झाडे होती. आणि जांभळेसुद्धा एवढी मधुर की अजूनसुद्धा त्यांची चव जिभेवर रेंगाळत आहे. हात आणि जीभ पूर्ण जांभळी झाल्याशिवाय आम्ही तिथून हललोच नाही. वाघन्याच्या पठारावरून सुरु होतो भैरवगडाचा शेवटचा टप्पा. पुन्हा एकदा जंगलात शिरायचे आणि सावकाश चढत जाणारी पायवाट पकडायची. झाडी अतिशय दाट असल्याने उन्हाचा त्रास अजिबात होत नव्हता. सुमारे अर्धा- पाऊण तास तंगडतोड केल्यावर आम्ही एका छोट्या पठारावर आलो आणि अचानक समोर आले भैरवनाथाचे मंदिर आणि पश्चिमेला “भैरव घाटावर” पहारा देत उभा असलेला राकट भैरवगड. तिथे कोकणातून येणारा वारा छातीत भरून घेत आम्ही मंदिरात आडवे झालो. तिथे पुण्याहून ४ लोक आधीच येऊन बसले होते. जरा गप्पागोष्टी करतोय तोच इंजिनाची घरघर ऐकू आली. २ जीप २०-२५ पोरांना घेऊन भैरवगडावर ॲडवेंचर ट्रीपसाठी आले होते. ते पाहून आमची प्रचंड चिडचिड झाली. एकतर ४ तासाची जंगलातून तंगडतोड करत आम्ही इथे आलो होतो आणि हे जवळच्या रिसोर्टवाले लोक जीप मध्ये बसून जंगल कँप साठी आले होते. वाह.. त्यातून त्यांचा लीडर (ज्याला आम्ही जखमी हंटर असे नाव ठेवले) आमच्या समोर फारच फुशारक्या मारत होता. उगाच फॉरेस्टची परवानगी आणि काय काय बडबड करत होता. जाऊ दे आम्हाला काय? भैरवनाथाचे मंदिर फार पुरातन आहे. पूर्वीचे दगडी मंदिर मोडकळीस आल्यावर आजू-बाजूच्या गावकऱ्यांनी श्रमदानातून सध्याचे पक्के मंदिर उभारले आहे. मंदिरात दोन अप्रतिम सांबरशिंगे आहेत. ती कोणी आणि कधी आणून ठेवलीत ते माहित नाही पण इतक्या वर्षानंतरही तिथेच आहेत हे पाहून आश्चर्य वाटते. मंदिराशेजारून भैरवगडावर जाण्याची पायवाट आहे. त्या कँपवाल्या पोरांची गर्दी होण्याच्या आधीच आम्ही गडफेरी करून परत मंदिरात विश्रांतीस आलो. तसे गडावर फार काही अवशेष शिल्लक नाहीत. एक सुस्थितीतल बुरुज, दरवाज्याचे भग्नावशेष, एक पाण्याचे टाके आणि २ गुहा. आमच्या वाटाड्याला मुंबईला जायची घाई असल्याने आम्ही नवीन वाटाड्या मिळवला होता. जयराम लांबोर आणि त्याचा अतिउत्साही कुत्रा “गंगाराम”. त्याच्या बरोबर साताऱ्याचे दोन ट्रेकर होते. तो कँपवाला लीडर पाठदुखीमुळे गडफेरीस न जाता मंदिरातच आडवा झाला होता आणि जेवणाचे समान घेऊन गाडी आली नाही म्हणून कोणावर तरी खार काढत होता. मंदिराच्या थंडगार फरशीवर विश्रांती घेऊन आम्ही परत फिरलो.

हरणटोळ
हरणटोळ

परतीच्या वाटेने सुद्धा आमचा बराच घाम गाळला. आधीच सकाळपासून जांभळे आणि मुठभर शेवेव्यतिरिक्त काही गेले नव्हते त्यामुळे वाघने गावाशेजारील डोंगराने तर आमची पुरतीच वाट लावली. त्यातूनच वाटाड्या आणि आमच्यात बरेच अंतर पडत गेले. परतताना रामघळीची वाट बघून गावात जायचे असा ठरले होते पण शेवटी पंकजने पुढे जाऊन घळ बघावी आणि आम्ही मागून त्याला गाठावे असे ठरले. तरीही त्याची आणि आमची चुकामुक झाल्याने अर्ध्या तासाचा जंगल फेरफटका झाला. शेवटी घळीचा नाद सोडून पाड्याकडे निघालो. वाटेतच आमच्या शोधार्थ परत फिरलेला पंक्या पण भेटला. जयरामच्या घरी कोरा चहा पिऊन पडवीवर आडवे झालो. उन्हे कलल्यावर सुटलेल्या वाऱ्यांनी गारठा वाढवला होता. आम्हाला तर थंडीमुळे स्लीपिंग बॅगमधेच शिरावे लागले होते. रात्रीच्या जेवणाची सोय तिथेच झाल्यामुळे आम्ही निवांत होतो. जसजसा अंधार पडत गेला तसे आमचे डोळे सुद्धा मिटत गेले. बाजूच्या गोठ्यातून गुरांच्या घंटांचा किणकिणाट, मंद सांजवारा आमच्या झोपेत अजूनच भर घालत होता. जयरामने जेवणासाठी दिलेल्या हाकीने आमचे डोळे उघडले पण ते सुद्धा अर्धवटच. गावरान वांग्याची झणझणीत आमटी आणि भाताचे चार घास पोटात गेले तेव्हा कुठे जरा तरतरी आली. सामान कसेही सॅकमध्ये भरून बॅटऱ्यांच्या उजेडात रामघळीच्या वाटेवर लागलो. पंकजला वाट माहित असल्याने १५-२० मिनिटातच घळीत पोचलो. अवसेची रात्र असल्याने आकाशात असंख्य तारे चमकत होते. त्यातून आजूबाजूला काजव्यांची भर. थोडावेळ शेकोटी पेटवायचा प्रयत्न झाला पण तिने सुद्धा १० मिनिटातच अंग टाकले. शेवटी तसेच अंधारात पाठ टेकून झोपून गेलो. रात्री मधूनच न ऐकलेल्या आवाजाने दचकून जाग यायची आणि बॅटऱ्यां फिरवून काही नाही याची खात्री करून परत डोळे मिटायचे. तसे या परिसरात अस्वले, भेकरे आदि जनावरांचा वावर असल्याने आम्ही सावधच झोपलो होतो. पहाटे अगदी जवळून आलेल्या भेकराच्या आवाजाने सगळेच खडबडून जागे झाले. त्या आवाजात कस्तूर, कोकीळ पक्ष्यांनी आपापले आवाज मिसळून रामप्रहर झाल्याची आठवण करून दिली. घळीतील सामानसुमान आवरून ती गुहा नीट न्याहाळली. काय सुंदर जागा होती ती… शंभरएक फूट लांब गुहा अशी ही गुहा पाहून समर्थांच्या ओळी मनात घोळल्या. आणि डोळ्यासमोर पावसाळ्यातील चित्र उभे राहिले. डोईवरून खाली कोसळणारा धबधबा, समोर खळाळत वाहणारा ओढा, त्या निबीड अरण्यातील जंगली श्वापदांचे असंख्य आवाज… क्षणभर शहाराच आला अंगावर.

गिरीचे मस्तकी गंगा | तेथुनि चालली बळे |
धबाबा लोटती धारा | धबाबा तोय आदळे || १||
गर्जता मेघ तो सिंधू | ध्वनी कल्होळ उठिला |
कड्याशी आदळे धारा | वाट आवर्त होतसे ||२||
तुषार उठती रेणू | दुसरे रज मातले |
वाट मिश्रीत ते रेणू | सीत मिश्रीत धुकटे ||३||
दराच तुटला मोठा | झाड खंडे परोपरी |
निबीड दाटती छाया | त्या मधे वोघ वाहती ||४||
गर्जती श्वापदे पक्षी | नाना स्वरे भयंकरे |
गडद होतसे रात्री | ध्वनी कल्लोळ उठती ||५||
कर्दमु निवडेना तो | मानसी साकडे पडे |
विशाळ लोटती धारा | ती खाले रम्य विवरे ||६||
विश्रांती वाटते येथे | जावया पुण्य पाहिजे |
कथा निरुपणे चर्चा | सार्थके काळ जातसे ||७||

रामघळ
रामघळ

अशा नितांत सुंदर घळीतून आम्ही परत पाड्यात आलो. गावकऱ्यांची सकाळची लगबग चालू होती. कोणी गुरे चरायला घेऊन जात होते तर कोणी कडोशीस पाण्याच्या कळश्या घेऊन येत होते. कुठे म्हशीची धार काढणे चालू होते तर कुठे लहान पोरांचा दंग चालू होता. जयरामच्या घरी धारोष्ण दुधाचा फक्कड चहा मिळाला. तिथे गंगाराम (त्याचा अतिउत्साही कुत्रा) आणि दोस्तमंडळी (गावरान कोंबड्या) यांनी आमच्या चहामध्ये सोडाच पण सामनामध्ये सुद्धा तोंड घालायचे बाकी ठेवले नव्हते. गंगारामला तर सोय स्टीक्स म्हणजे तिखट-मीठ लावलेली हाडेच वाटत होती. हेळवाकमध्ये शिरा-भजी आमची वाट बघत असल्याने आम्ही पाड्याचा निरोप घेऊन लगोलग निघालो. रस्त्यातच एक हरणटोळ कोवळे उन खात पहुडला होता. फटाफट कॅमेरे बाहेर आले. एवढे सारे फोटोग्राफर बघून त्या बिचाऱ्याला सुद्धा उगाचच सेलेब्रिटी झाल्यासारखे वाटले. गाडीच्या खाली येऊ नये म्हणून पंकजने त्याला उचलून बाजूच्या झुडुपात सोडले. हेळवाकमध्ये नाश्ता करता करता आजच्या उरलेल्या दिवसाचे प्लान ठरले. आधी दातेगड आणि नंतर अजिंक्यतारा करून पुण्यास परतायचे नक्की झाले. दातेगडला जाण्यासाठी आम्ही पाटण-चाळकेवाडी रस्त्यावरून टोळेवाडीला आलो. येथून गड अगदी जवळ. गावातल्याच एका रामचंद्र नामक हुशार मुलाने आम्हाला गडापर्यंत नेण्याची तयारी दाखवली. अगदी उत्साहात तो गडाबद्दल बोलत होता. दहाएक मिनिटात आम्ही गडावर आलो. या शिवपुर्वकालीन गडाचा घेरा अगदीच कमी आहे. पण बघण्यासारखी ठिकाणे अनेक. भग्न प्रवेशद्वारातून आत गेल्यावर समोर दिसतात त्या हनुमान आणि गणेशाच्या दगडात कोरलेल्या ९-१० फुटी मूर्ती.शिवाय गडावरचे मुख्य आकर्षण म्हणजे कातळात १०० फूट खोदलेली विहीर.

दातेगड - मारुती आणि विहीर
दातेगड – मारुती आणि विहीर

अंदाजे ५० पायऱ्या उतरून आम्ही विहिरीत उतरलो. विहिरीतले पाणी बर्फाहून थंड होते. या विहिरीबद्दल आणि गडाबद्दल अनेक दंतकथा त्या पोराने ऐकवल्या. या उपेक्षित परंतु सुंदर गडाची फेरी तासाभरात पूर्ण होते. गड उतारावर करवंदाच्या असंख्य जाळ्या आहेत. या रानमेव्याचा सुद्धा मनमुराद आनंद गड उतरताना आम्ही लुटला. पुढे चाळकेवाडीच्या पठारावरून आम्हाला ठोसेघर गाठायचे होते. काल भैरवगडाचे जंगल कधी संपूच नये असे वाटत होते तर इकडे हे पवनचक्क्यांचे जंगल कधी संपतेय असे झाले होते. ठोसेघरला आधी पोटपूजा करून घेतली आणि नंतर तिथला प्रसिद्ध धबधबा पाहायला गेलो. तिथल्या डोहातील पाणी बघतच आमच्यातल्या मस्तवाल रेड्याने पुन्हा डोके काढले आणि सगळा शीणवठा पाण्यात घालवूनच बाहेर आलो. ठोसेघरचा घाट ८-१० किमी उतरून खाली आलो आणि समोर दिसलेला सज्जनगड बघून मला अचानक कॅमेरा विसरल्याची जाणीव झाली.  झाले. मनात विचारांचे काहूर उठले. कॅमेरा असेल का? कदाचित ठेवला असेल. घरी काय सांगू इत्यादी.
परत फिरून ठोसेघरच्या हॉटेलात आलो आणि मालकाने सांभाळून ठेवलेली बॅग घेतल्यावर हायसे वाटले. आता जाता जाता अजिंक्यतारा करूनच जायचे होते होते. तसा अजिंक्यतारा सर्वांनीच बघितला असल्याने तिथे फार वेळ दवडण्यात अर्थ नव्हता. आणि अजिंक्याताऱ्याबद्दल सर्वांनाच बरीच माहिती असल्याने त्याबद्दल येथे लिहिण्यात सुद्धा अर्थ नाही. तरी सुद्धा तासभर गडावर फेरी मारून काही मावळत्या उन्हातील फोटो काढले. आणि पुण्याच्या रस्त्याला लागलो.
दुसऱ्या दिवशी सकाळीच अन्याने या जंगलयात्रेचे सुंदर वर्णन करणारे एक मेल पाठवत पुन्हा एकदा दोन दिवसातल्या आठवणी ताज्या केल्या. आता पुढच्या भटकंतीपर्यंत पुण्यातील सिमेंटच्या जंगलात राहून राहून आठवेल ती भैरवगडची भन्नाट जंगलयात्रा.

अजिंक्यतारा
अजिंक्यतारा

Posted in

9 responses

  1. हाडक्या नाही, लेंडी जांभळं होती. छान जमलाय.

    1. अरे तो जयराम त्याला हाडकी जांभळे म्हणत होता… आपल्या इकडे त्यांना लेंडी जांभळे म्हणतात..

  2. सुंदर प्रवास.. आणि सुरेख वर्णन. आपल्या भावी प्रवासास शुभेच्छा !

    1. धन्यवाद निलेश..

  3.  Avatar
    Anonymous

    मस्त रे… धम्माल केलीत गड्यांनो…

    1. अम्या आता तर पावसाळा तोंडावर आलाय… मग आहेच अजून धमाल…

  4. Anup Bokil Avatar
    Anup Bokil

    Tumchi biscuits etc stuff palavla te nahi lihilas 🙂 zakkas lihilay baki..

    1. अरे ते नाही लिहिले… मला वाटले उगाच वाढेल म्हणून…

Reply

Your email address will not be published. Required fields are marked *