कोकण दुर्गयात्रा – भरतगड, भगवंतगड, देवगड

सह्याद्रीच्या अंगा-खांद्यावर खेळलेल्या जातिवंत भटक्यांना डोंगर चढ-उतर केल्याशिवाय ट्रेकिंग ची मजाच येत नाही. आमचेसुद्धा तसेच झाले होते. कोकणाच्या दुर्गयात्रेसाठी आलो असलो तरी जवळपासचे डोंगरी किल्लेसुद्धा साद घालत होते. म्हणूनच आमच्या या दुर्गयात्रेमध्ये दोन डोंगरी किल्ले जोडले. भरतगड आणि भगवंतगड. मालवण पासून फक्त १६ किमी अंतरावर असलेली ही दुर्गजोडी पाहणे म्हणजे भटक्यांना एक पर्वणीच ठरते.

भरतगड
भरतगड

मालवणहून १६ किमी अंतरावर असलेल्या मसुरे गावातच भरतगड किल्ला उभा आहे. गडाची उंची फार नसल्यामुळे १५ मिनिटाची चढाई केल्यावर आपण गडाच्या प्रवेशद्वारापाशी येतो. गावातून गडावर येण्यासाठी जांभ्या दगडातील पायऱ्या आहेत तसेच एक गाडी रस्ता सुद्धा गडाच्या प्रवेशद्वारापर्यंत येतो. गडाचे प्रवेशद्वार जरी भग्नावस्थेत असले तरी खणखणीत बांधकामाची तटबंदी मात्र अजूनही दिमाखाने उभी आहे. आटोपशीर घेराच्या या गडावर अगदी मोक्याच्या ठिकाणी तटबंदीमध्ये भलेमोठे बुरुज बांधलेले दिसतात. असे तब्बल १० बुरुज् गडाचे संरक्षण करण्यास अगदी सज्ज आहेत. तटबंदीवरून सरळ चालत गडास फेरी मारता येते. त्यामुळे गडाचा आकारही लक्षात येतो आणि सर्व बुरूजही पाहून होतात. खाडीकडे असलेली गडाची बाजू खंदकाने संरक्षित केली आहे. गडाचा परिसर जुने वहिवाटदार चव्हाण यांनी ताब्यात घेऊन तेथे आंब्याची, नारळ-सुपारीची लागवड केली आहे. त्यामुळे भरपूर झाडे-झुडूपामुळे विविध पक्ष्यांची मांदियाळी येथे आहे.

भरतगडाच्या पायऱ्या
भरतगडाच्या पायऱ्या

गडाच्या माथ्यावर बालेकिल्ल्याचे बरेचसे अवशेष आहेत. बालेकिल्ल्याचे प्रवेशद्वार सुस्थितीत असून प्रवेश केल्यावर समोर महापुरुषाचे मंदिर दिसते. येथे घटकाभर विसावून मंदिरामागची विहीर पाहायची. विहीर अतिशय खोल असून खाली उतरायला पायऱ्या केल्या आहेत परंतु पडझडीमुळे विहिरीमध्ये उतरता येत नाही. विहिरीतील पाणी पिण्यासारखे असून पाणी उपसायला रहाटाची सोय केली आहे. विहीरच्या पुढे उजव्या हातास एका छोट्या वाड्याचे सुस्थितीतले अवशेष दिसतात. थोडे पुढे गेल्यास तटबंदीस लागून दारू कोठाराची वास्तू तर बालेकिल्ल्यातून आपातकाली बाहेर पडण्यासाठीचा चोर दरवाजा लागतो. येथून बाहेर पडून आपण पुन्हा गडाच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी जाऊ शकतो. गडाचा घेर लहान असला तरी बरेचसे अवशेष सुस्थितीत असल्याने गडफेरीस सुमारे तासभर लागतो. गडावर आणि आसपासच्या परिसरात भरपूर झाडी असल्याने या भागात आल्यावर कोकणाचे सृष्टीसौंदर्य खऱ्या अर्थाने अनुभवायला मिळते. महाराजांनी याठिकाणी किल्ला बांधण्याच्या दृष्टीने पाहणी केल्याचे उल्लेख आढळतात परंतु किल्ल्याचे बांधकाम हे त्यानंतर बरेच वर्षांनी म्हणजे १७०१ फोंड्याच्या सावंतांनी केले.

भगवंतगड वरील मंदिर
भगवंतगड वरील मंदिर

भरतगडचा सोबती आणि समकालीन किल्ला म्हणजे भगवंतगड. ते दोन्ही किल्ले कालवली खाडीच्या काठावर समोरासमोर उभे ठाकले आहेत. सागरी महामार्गावर आचराच्या अलीकडे भगवंतगड फाटा लागतो. या रस्त्याने ४ किमी वर भगवंतगड गाव लागते या गावाच्या हद्दीतच भगवंतगडचा छोटा डोंगर उभा आहे. गावातील शाळेच्या शेजारून गडावर जायची पायवाट आहे. थोडे पुढे गेल्यावर गडाच्या पायऱ्या आपल्याला गडमाथ्यावर घेऊन जातात.

गडमाथा अत्यंत छोटा असून समोरच भगवंताचे मंदिर लागते. तर बाकीचे अवशेष मंदिरामागच्या झाडीमध्ये गडप झाले आहेत. थोडीफार कसरत केल्यास इमारतींची जोती, एक बुजलेली विहीर आणि तटबंदीचे अवशेष नक्की सापडतात. काटे-कुटे आणि दाट झाडीतून तटबंदी मध्ये लपलेला दरवाजा शोधायला मात्र फार कष्ट घ्यावे लागतात. गडावर बाकी काहीच अवशेष नसल्याने गडफेरी पूर्ण करण्यास अर्धा तास पुरतो.

कोल्हापूरचे बावडेकर पंतप्रतीनिधींनी भरतगडास प्रत्युत्तर देण्यासाठी भगवंतगडची निर्मिती केल्याचे उल्लेख सापडतात.   आम्ही भर उन्हात भगवंतगड पाहण्यास आल्याने भगवंताच्या मंदिरातील शीतल सावलीमध्ये अंग टेकण्याचा मोह काही आम्हाला आवरेना. येथील मंदिरात इतर ठिकाणप्रमाणे मूर्ती नसून एक भलीमोठी शिळा प्रतिष्ठापित आहे. या मंदिरात तासभर विश्रांती घेतल्यानंतर नंतर आम्ही देवगड कडे निघालो.

देवगडचे प्रवेशद्वार
देवगडचे प्रवेशद्वार

देवगड म्हणाले की डोळ्यासमोर येतो तो म्हणजे फळांचा राजा हापूस आंबा. देवगडच्या हापूसने साऱ्या जगावर आपल्या सुमधुर चवीने भुरळ घातली आहे. पण देवगड हे ठिकाण फक्त आंब्यासाठी प्रसिद्ध नसून याच नावाचा एक ऐतिहासिक जलदुर्ग येथे आहे. याच किल्ल्याच्या नावावरून गावाला आणि तालुक्याला देवगड हे नाव पडले आहे. देवगड गावाजवळ एक भूशिर उत्तर दिशेला समुद्रात घुसले आहे. याच भूशिरावर देवगड किल्ल्याची उभारणी झाली आहे. देवगड गावापासून किल्ल्यापर्यंत डांबरी रस्ता जात असल्याने कुठेच चुकण्याचा प्रश्न येत नाही. देवगड किल्ला म्हणजे समुद्रालगतची भलीमोठी सपाटीची जागा आहे. देवगड किल्ल्याचे दोन भाग आहेत. डांबरी रस्ता आपल्याला सरळ गडाच्या बालेकील्ल्यासमोर आणून सोडतो तर दुसऱ्या भागात समुद्रालगत छोटा धक्का आहे. या रस्त्याने जाताना ठीकठिकाणी टेहाळणीसाठी बांधलेले बुरुज भग्नावस्थेत उभे असलेले दिसतात. डांबरी रस्ता संपतो तिथेच देवगडचे भले मोठे भक्कम बुरुज वाट अडवून उभे आहेत. याच बुरुजामधुन गेल्यास गडाचे गोमुखी प्रवेशद्वार लागते. तर डाव्या बाजूस एक मोठाला खंदक लक्ष वेधून घेतो. गडाला मुख्य भूभागापासून वेगळे करण्यासाठी देवगडच्या तटबंदीला लागून कातळात हा खंदक खोदण्यात आला आहे. या खंदकाचा उद्देश हा केवळ मुख्य तटबंदीस शिड्या लावून प्रवेश करता येऊ नये एवढाच होता. हा खंदक तटाबरोबर नेऊन थेट समुद्राजवळ मोकळा केला आहे.

देवगडचा खंदक
देवगडचा खंदक

देवगडच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्यावर डाव्या हाताला एक हनुमान मंदिरवजा घुमटी दिसते तर काही पहारेकऱ्यांच्या देवड्या. येथूनच प्रवेशद्वारावर चढण्यासाठी पायऱ्या आहेत. येथून वर चढून गेल्यावर गडाचा संपूर्ण प्रदेश नजरेखाली येतो. तटावरून चालत पश्चिमेला गेल्यावर एक मोठा बुरुज लागतो. बुरुजावर जाण्यासाठी केलेल्या दगडी पायऱ्यांनी वर जाताच समोर दिसतो तो अथांग पसरलेला अरबी समुद्र. दिवसभराची पळापळ करून आलेला शिणवटा  घालवण्यासाठी सूर्यसुद्धा अरबी समुद्राकडे झुकत होता. उतरत्या उन्हाचा तो सोनेरी रंग संपूर्ण समुद्रावर पसरला होता. एखाद्याने पाहतच बसावे असे सुंदर दृश्य होते ते. थोडीफार फोटोग्राफी करून आम्ही उरलेल्या गड्फेरीस निघालो. देवगडचा अर्धा भाग हा केंद्र सरकार आणि पोर्ट ट्रस्टच्या ताब्यात असून या भागात एक दीपगृह उभे आहे. समुद्रातील बोटींना इशारे देण्यासाठी सरकारने या दीपगृहाची उभारणी केली आहे. या दीपगृहाकडे जाताना वाटेत अनेक जुनी जोती, एक पाण्याचे कोरडे टाके दिसते. किल्ल्यामध्ये बाकी काही अवशेष शिल्लक नाहीत. किल्यावरचे दीपगृह संध्याकाळी ५:३० ते ६:३० याच वेळेत लोकांसाठी खुले असते. तुम्ही त्या वेळेत तिथे असाल तर तुम्हाला हे दीपगृह आतून पाहता येते. तेसुद्धा अगदी नाममात्र शुल्क देऊन. सुदैवाने आम्ही याच वेळेत गेल्यामुळे आम्हाला दीपगृहात जाता आले. तेसुद्धा अगदी वरपर्यंत जाऊन. तेथील सरकारी कर्मचाऱ्याने अगदी व्यवस्थितपणे माहिती सांगत कसलीही गडबड न करता आम्हास दीपगृह पाहू दिले. गडाच्या खालच्या भागात जाण्यासाठी दीपगृहाच्या आवारातून दगडी पायऱ्या आहेत. परंतु सध्या सरकारने ही वाट बंद केली आहे. याच भागातील धक्क्याजवळ दोन तोफा ठेवल्या आहेत. या पाहता न आल्याची हळहळ व्यक्त करत आम्ही पुन्हा मुख्य प्रवेशद्वाराकडे आलो. वाटेवर देवगडचे प्रसिद्ध गणेश मंदिर लागते. या शिवकालीन गणेशाच्या दर्शनासाठी अनेकांची ये-जा चालूच असते. पण यातील किती लोक आसपासच्या किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व जाणतात हे तो गणेशच जाणे. देवगड किल्ल्याच्या बांधणीबाबत अनेक तर्क वितर्क आहेत, शिवाय महाराजांच्या काळातील किल्ल्याचे उल्लेख मात्र नाहीत त्यामुळे हा किल्ला नंतरच्या काळात बांधला गेला असावा.

देवगड
देवगड

देवगड पाहून होईपर्यंतच अंधार पडल्याने आम्हाला मुक्कामासाठी विजयदुर्ग गाठणे शक्य नव्हते. त्यामुळे वाटेतच एक पठार आणि मोकळी जागा पाहून आम्ही तंबू उभे केले. मस्त चांदण्यांच्या साथीने पोटपूजा करून निवांत पहुडलो. गवताळ पठार असल्याने अनेक ससे खुसपुसत होतेच. शिवाय दूरवरून ऐकू येणारी कोल्हेकुई ती शांतता भेदत होती. आमचे तंबू पाहून गस्तीवरच्या पोलिसाने आम्हाला हटकले पण ओळखपत्रावरील आमचे केविलवाणे चेहरे पाहून त्याने सुद्धा दया दाखवली. मात्र त्या पोलिसाने मध्यरात्री पंकजच्या स्वप्नात येऊन त्याला तंबू बाहेर खेचल्याने आमची हसून पुरेवाट नक्कीच झाली.

Posted in

2 responses

  1. Hi! Atyant surekh lekh! Pan photo links dead aahet. Please look into it, if possible!
    Cheers & keep trekking 🙂

    1. Dhanyawad Mitra. Thank you for finding the issue. Fixed now.

Reply

Your email address will not be published. Required fields are marked *