पूर्वरंग:
नुकतीच एक भटकंती पार पडलेली असते. फोटोग्राफर मंडळींनी फेसबुकवर आपापले रंग दाखवलेले असतात तर काही (अति-) उत्साही मंडळी (माझ्यासारखी) भटकंतीच्या आठवणी लिखाणात उतरवण्याचे काम करीत असतात आणि त्यातच दुसऱ्याच दिवशी….
दिवस दुसरा:
कोणाचे तरी मेल येऊन थडकते… विषय असतो “Nxt Trk” आणि मसुदा काहीच नाही. सर्वजण अजूनही मागच्याच भटकंतीच्या नशेत असल्याने कोणाचे काही उत्तर येत नाही. मग फेसबुकवर अजून काही फोटो येतात. एकमेकांना “tag” करतात. इतर मंडळींच्या “comments” आणि “likes” खाणे चालूच असते. “कधी जाऊन आलास? आम्हाला पण सांगत जा.” अशा प्रश्नांना उडवा-उडवीची उत्तरे मिळालेली असतात. तो दिवस तसाच जातो.
दिवस तिसरा:कालच्या मेल वर कोणाचेच उत्तर न आल्याने प्रश्नकर्त्याचा धीर सुटत चाललेला असतो. मग अजून एक मेल येऊन थडकते. “Re: Nxt Trk”. या वेळी मसुद्यामध्ये एकच वाक्य असते. “कोणी येणारे का?”. जणू काही हा कोणी आलेच नाही तर एकटाच जाणारे. असो. त्यावर अर्धा दिवस जातो. उत्तर कोणाचेच नाही. आधीच आमच्या फडात अर्धे लोक चतुर्भुज. असे लागोपाठ ट्रेक करायला लागलो तर गॅलरीत टेन्ट टाकून मुक्काम करावा लागेल आणि जेवायला मॅग्गी आणि सूप तेसुद्धा स्वहस्ते करावे लागेल ते वेगळेच. मग दुपारी उत्साही मंडळींच्या ब्लॉगचे लिंक्स येतात आणि उरलेला दिवस त्यावर “चर्चा” करण्यात जातो. शेवटी मावळतीला कोणाचे तरी “गृहमंत्र्यांशी” चर्चाकरून एकवाक्यी उत्तर येते. “I am out.” बस्स. बाकीचे वाट बघतच असतात, मग उत्तरांची सरबत्ती होते. “नाही जमणार”, “सुट्टी नाही”, “घरात काम आहे (बहुधा घरात बडगा उगारलेला दिसतोय)”. एकूणच सगळीकडूनच “नकार” मिळालेल्या व्यक्तीसारखी अवस्था होते मग प्रश्नकर्त्याची. बिचारा काहीही न बोलता गप बसून राहतो.
दिवस चौथा-पाचवा आणि पहिला वीकेंड:
आता या “chain mail” चे नामकरण होऊन त्यावर तारीख पडलेली असते. “7-8 July Trek”. आणि आतमध्ये असते “लोकहो, लवकर सांगा कोण कोण येणारे?” पण कालच्या नकाराने उत्साह थंडावला असतो त्यामुळे भटकंतीच्या “chain mail” वरची चर्चासुद्धा थंडावते आणि तो आठवडा तसाच निघून जातो.
दुसरा आठवडा:
शनिवार-रविवार काहींनी कुठलातरी पिक्चर टाकून त्यावर चिकन-तंगडी-कबाब कोंबल्याने तर काही लोकांनी एकदिवसीय सामना खेळल्यासारखा एखादा गड-किल्ला बघितल्याने, सर्वजण टवटवीत झाले असतात. सोमवारी ऑफिसच्या उदासवाण्या वातावरणात जीव आणण्यासाठी एकनवीन विषयाचे मेल येते. “Check this” आणि आतमध्ये २-३ लिंक्स असतात. ट्रेकचे सामान विकणाऱ्या कुठल्या तरी वेबसाईटच्या किंवा ऑफिसमध्ये फावला वेळ “सत्कारणी” लावताना गूगलवर सापडलेल्या वेगवेगळ्या वस्तूंच्या अशा लिंक्स असतात त्या. दिवसभर मग त्यावर चर्चासत्र झडते आणि दिवसाखेरीस त्या “chain mail” मध्ये निदान २५ वेगवेगळ्या लिंक्स असतात. मग पुढचे एक-दोन दिवस हाच विषय चघळला जातो आणि मग त्यावर कोणीतरी पुस्तकी टिप्पणी करते “सह्याद्रीत फिरताना अशा महागाच्या वस्तू कशाला हव्यात?”. अधूनमधून एकमेकांची खेचायची स्पर्धा सुरूच असते. त्यातच अशी टिप्पणी झाल्यावर आपणहून कापून घ्यायला तयार झालेला बकरा कोण सोडणार? अर्जुनाला मिळालेल्या अक्षय्य भात्यातून निघणाऱ्या बाणासारखे आमच्या भात्यातून शालजोड्या निघत जातात. मग संपूर्ण दिवस नुसते शीतयुद्ध. लहानपणी आम्ही एक खेळ खेळायचो. एक जण कुठलेही वाक्य बोलणार आणि दुसरा त्या वाक्यातील कोणताही एक शब्द उचलून दुसरे वाक्य बोलणार. मग तिसरा आधीच्या वाक्यातील शब्द उचलून भलतेच वाक्य बोलणार. अगदी तसाच खेळ चालू होता आमचा. मुख्य विषय भटकंती. त्यावरून होणारी चर्चा मार्गावरून घसरून येते फोटोग्राफीवर, नंतर कॅमेरा, इतरांचे ब्लॉग, भटकंतीवरील पुस्तके आणि नंतर वस्तू-खरेदीवर. शुक्रवार अखेरीस या “chain mail” ने पन्नाशी तर नक्कीच पार केलेली असते. अजून एक वीकेंड येतो आणि जातो. पण ट्रेकचा पत्ताच नसतो.
तिसरा आठवडा:
गेले दोन वीकेंड घरात बसल्याने आणि कामात हातभार लावल्याने चतुर्भुजांना “गृहमंत्र्यांकडून” ट्रेकची परवानगी मिळालेली असते. त्यामुळे सोमवारी उत्साहात जुने “chain mail” उकरून काढले जाते. दोन आठवडे त्यावर साचलेली धूळ झटकून पुन्हा एकदा नामकरण केले जाते. “14-15 July Trek”. यावेळी मात्र उत्साह दांडगा असतो. वेळ जात नाही म्हणून शनिवार-रविवार पुस्तकांची पाने चाळलेली असतात. विकीमॅपियावर आख्खा सह्याद्री पालथा घातला असतो. त्यामुळे आवेशात फटाफट गड-किल्ले , घाटवाटा-आडवाटा यांची नावे फेकली जातात. “सांकशी, कर्नाळा”, “अवचितगड, बिरवाडी”, “मढे-उपांड्या”, “सवाष्णी-वाघजाई” वगैरे वगैरे. सोमवार अखेर किमान १०-१५ वेगवेगळ्या ट्रेकची यादी झालेली असते. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये जसा प्रत्येक पक्षाचा एक उमेदवार असतो तसा आमच्यापैकी प्रत्येकजण आवडीप्रमाणे एक नाव निवडतो आणि पुढे करतो. आता त्यावर महाचर्चा. एकाला किल्ले करायचेत तर दुसऱ्याला घाट-वाटा. तर तिसऱ्याला “दिवसात २५-३० मैल चालायचा अमानवी ट्रेक”. आता हि चर्चा ट्रेकच्या ठिकाणावरून घसरून “कसे जायचे” आणि “अजून कोणाला बोलवायचे” यावर येते. आमच्याकडे कुठे जायचे याला फार महत्व नसते पण “कसे जायचे” हे मात्र खूप महत्वाचे. एक-दोन दिवस हे नको-ते नको, असे नको-तसे नको करत जातात. अशातच तिसऱ्या दिवशी एकाचा मेल येतो “अरे आपण XXXX मार्गे XXXX ला जाऊ.” घसरलेली गाडी वेगळ्याच वाटेवर लागते. मग सर्वांचे अचानक एकमत होते आणि इतक्या दिवसाची चर्चा, मेलामेली, मोबाईलवरची संभाषणे सगळी व्यर्थ. पुन्हा पहिले पाढे पंचावन्न म्हणत या नवीन भटकंती संदर्भात माहिती गोळा करायला सुरवात होते. एखाद्या पुस्तकातील यावर लिहिलेल्या पानांचे फोटो पाठवले जातात, विकीमॅपियावर रस्ता शोधला जातो आणि एक “tentative” बेत ठरतो.
आता परत अवघड प्रश्न समोर येतो “जायचे कसे”. बाईक, कार, “येष्टी” अशा सर्व पर्यायांचा विचार सुरु होतो. किती जण आहेत यावर आणि खिशाला परवडेल असा पर्याय निवडला जातो. कोणाला तरी ट्रेकचा मॅनेजर बनवले जाते आणि कामाची/सामानाची वाटणी करायला लावले जाते. कोणी काय आणायचे याची एक यादी सगळीकडे फिरते. पुन्हा एक दिवस सगळे गायब होतात कारण घरामध्ये लक्ष नाही दिले आयत्या वेळी भटकंतीला टांग मारायला लागण्याची शक्यता असते. शुक्रवारी सर्वांना उत्साहाचे भरते आलेले असते. उजाडल्या पासूनच फेसबुकवर जुने ट्रेकचे फोटो, लोकांना खिजवण्यासाठीचे स्टेटस अपडेट्स वगैरे वगैरे सुरु झालेले असते. कधी एकदा दिवस संपतोय असे झालेले असते.
शेवट:
ट्रेक करायची खाज असल्याने सगळ्या अडचणीतून बाहेर पडत आमचा ट्रेक ठरलेला असतो आणि येता वीकेंड सह्याद्रीच्या सान्निध्यात घालवण्यासाठी सर्वजण आतुर झालेलो असतो. तर एव्हाना तुमच्या लक्षात आलेच असेल कि आम्ही येत्या वीकेंडला ट्रेकला चाललो आहोत पण जाणूनबुजून “कोठे” आणि “कोण कोण” याचा उल्लेख मात्र नाहीये. तर, आम्ही परत येईपर्यंत वाट पहा आणि आल्यावर फोटोचा आणि ब्लॉगचा आनंद लुटा.
Reply