गेले तीन महिने घरात नुसती गडबड चालू होती. घरात लहान बाळ असेल तर वेळ कसा जातो ते कळतसुद्धा नाही. दसरा-दिवाळीची धामधूम संपली होती. आता एखाद्या विकेंडला सह्याद्रीमध्ये जाऊन सणासुदीची सांगता करायची असे ठरवत होतो. शेवटी गेल्या शनिवारी सगळे जुळून आले. नुकतेच अनुप जावळी खोऱ्यात जाऊन “बुश व्ह्याकिंग” करून आला होता. शिवाय आत्ताचा वेळ त्या भागात जाण्यासाठी एकदम उत्तम. ठरले. चंद्र-मंगळची मोहीम आखली गेली. भिडू कोण? नेहमीचेच. मुंबईचा “वाघोबा”, खराडीची “मिशी”, आंबेगाव बुद्रुकचे “काकडे” आणि वारज्याचे “कुळकर्णी”.
आदल्या दिवशीच वाघोबाला बोलावून घेतल्याने शनिवारी पहाटे लवकर पुणे सोडले. गाडीच्या काचा पूर्ण बंद केल्यातरी पहाटेची थंडी आमच्या अंगात घुसू पाहत होतीच. कापूरहोळजवळ एका उडप्याच्या हाटेलात इडली-मेंदूवडा सांबरमिक्स हादडले आणि महाडरस्त्याला गाडी लावली. कोकणात उतरायला वरंधघाट एकदम जवळचा. पण रस्ता असा की घाट संपेपर्यंत एकंएक हाड सुटे होते. वरंध म्हणाले की वाघजाईच्या मंदिरापाशी चहा-भजी खाणे आलेच. हवेतील दमटपणा आणि चिकचिक कोकणात आल्याची वर्दी देत होता. मोहिमेतील पहिला किल्ला मंगळगड अथवा कांगोरी. घाट उतरल्यावर बिरवाडीच्या अलीकडे ढालकाठी म्हणून एक गाव लागते. तिथून मंगळगडच्या पायथ्याचे गाव पिंपळवाडी कडे जायचा फाटा फुटतो. गावाचे नाव पिंपळवाडी जरी असले तरी इथे अनेक वस्त्या आहेत. त्यातीलच एक गोगावलेवाडी नावाच्या वस्तीपासून मंगळगडाकडे जायचा गाडी रस्ता बनवला आहे. घाबरू नका. अजून गाडी वरपर्यंत जात नाही. गावातील शाळेपाशी गाडी उभी केली आणि हापशीवर भरपूर पाणी पिऊन घेतले. फक्त पाणी आणि कॅमेरा बरोबर ठेऊन गडाच्या चढाईस सुरवात केली. गडाला वाळवीप्रमाणे पोखरत जाणाऱ्या या वाटेने चालत निघायचे. चार-पाच वळणे घेतली की उजव्या हाताला एक पायवाट जंगलात घुसते. ही वाट गडावर लवकर घेऊन जाते असे वाचले असल्याने बिनबोभाट त्याच वाटेने आम्ही सुद्धा घुसलो. अर्ध्या तासात एक गवताळ पठार लागते असे सुद्धा वाचले होते. पण हा अर्धा तास काही केल्या संपेना. शेवटी तासभर भरकटून झाल्यावर “सुलतान ढवा” सुरु केला आणि १० मिनिटात ते पठार लागले.
या पठारावरून गडाच्या दिशेने जाणारी ठळक वाट आहे. वाटेत खुणा करून ठेवल्याने पुन्हा चुकण्याची भीती नाही. थोडा वेळ चालून गडाच्या कातळाला जाऊन भिडायचे आणि मग गड उजवीकडे ठेऊन जाणाऱ्या पायवाटेने निघायचे. थोडेफार जंगल आणि कारवीची झाडी असल्याने या वाटेने चढताना फारसा त्रास जाणवत नाही. समोरच गडाचे भग्न प्रवेशद्वार दिसते. अजून अर्ध्या तासाची चढाई. हाश-हूश करत या भग्न दरवाज्यातून आत गेलो की आपण गडाच्या माचीवर पोहोचतो. उजव्या हाताला बालेकिल्ला तर डाव्या हाताला लांबवर पसरलेली माची. माचीवर मध्यभागी एका उंचवट्यावर कांगोरीनाथाचे मंदिर बांधलेले आहे. मंदिराकडे जाताना एक कातळकोरीव टाके लागते. पाण्याचा हिरव्यागार रंगावर नाही गेलो तर पाणी पिण्यायोग्य आहे. मंदिराच्या दारासमोर एक सुरेख वृंदावन आहे. आणि आसपास काही मूर्ती इतस्ततः विखुरलेल्या आढळतात. कधीकाळी याच ठिकाणी दिमाखात विराजमान असलेल्या या मूर्तींची आजची ही अवस्था पाहून कसेसे वाटते. मंदिरातील कांगोरीनाथाची मूर्ती फारच सुंदर आहे. मंदिराच्या मागील बाजूस माची निमुळती होत जाते तर काही ठिकाणी बांधकामाचे अवशेष आढळतात. ही माची दोन्ही बाजूंनी चिरेबंदी तट घालून अतिशय भक्कम केली आहे. मंदिराच्या थोड्याफार सावलीमध्ये आम्ही पथारी पसरून थोडी विश्रांती घेतली आणि बालेकिल्ल्याकडे निघालो. बालेकिल्ल्यावर जाताना अजून दोन पाण्याची टाकी लागतात. बालेकिल्ल्यावर वाड्याचे भग्नावशेष सोडल्यास फारसे अवशेष नाहीत. नुकताच पावसाळा संपलेला असल्याने सगळीकडे गवताचे साम्राज्य होते. डोक्याएवढ्या गवतातून वाट काढणे अवघड होत होते आणि इतर अवशेष शोधणे तर महाकठीण. पण येथून सभोवतालचा परिसर मात्र फारच मनमोहक होता. दुर्गाडीचा किल्ला, रायरेश्वरचे नाखिंदा, प्रतापगड असा बराच मोठा परिसर डोळ्यात साठवून आम्ही परत फिरलो.
खाली उतरताना भुकेची जाणीव वाढतच होती. त्यामुळे पोलादपूर गाठायच्या आधी हॉटेल गाठले आणि एका कोंबडीला स्वर्गात धाडले. सूर्यास्ताच्या आत ढवळे गावात मुक्कामासाठी पोचण्याचा मनसुबा खड्ड्यात अधूनमधून दिसणाऱ्या रस्त्याने साफ फोल ठरवला. पोलादपूर ते ढवळे हे अंदाजे २५ किमीचे अंतर सुपरस्लो वेगाने दोन तासात पार पाडले. सह्याद्रीच्या कुशीत वसलेले ढवळे हे छोटेखानी गाव. दीडेकशे जोत्याच्या या गावात बहुतेक घरे मोऱ्यांची. शाळेसमोर गाडी लाऊन रविंद्र मोरेच्या घरी बुड टेकवले. सारवलेल्या ओसरीवर गारव्याला पडून चहाचे घुटके घेताना फारच मजा वाटत होती. नंतर समस्त भटक्या मंडळींचे हक्काचे जेवण म्हणजेच मॅग्गी खाऊन गावातल्या शाळेजवळच्या विठ्ठलाच्या देवळात पाठ टेकली. पण एवढ्या लवकर झोप थोडीच येणार? पौर्णिमेच्या पिठूर चांदण्याने जावळीचे खोरे व्यापले होते. हवेतला गारवा थकलेल्या शरीराला सुखावत होता. आणि दूरवर चाललेल्या भजनाचा घुमणारा आवाज वातावरणाचे पावित्र्य राखत होता. नभातील टपोऱ्या चंद्राला न्याहाळत सह्याद्रीच्या साक्षीने रंगलेल्या भटक्यांच्या गप्पाची सर शहरातील तुटपुंज्या बाल्कनीमध्ये ६०च्या बल्बच्या उजेडात बसून मारलेल्या गप्पांना कधीच येणार नाही. पाहिलेले न पाहिलेले किल्ले, घाटवाटा, इतिहास, भुते-खेते असे अनेक विषय इथे कमी पडतात. पुढच्या भटकंतीची स्वप्ने रंगवत तंबूत विसावलो.
ढवळ्या अथवा चंद्रगड हा जावळीच्या कोंदणातील अजून एक हिरा. जंगलात लपलेल्या या किल्ल्यावर जाण्यासाठी गावातून वाटाड्या बरोबर घ्यावाच लागतो. उन्हाचा त्रास वाचवण्यासाठी सकाळी लवकरच ताज्या दमानेच चढाई सुरु केली होती. त्या थंडीतही गड घामटं काढत होता. अंगावर येणारा छाती दडपवणारा चढ झाडांच्या गर्दीत हरवून गेला होता. जंगलात ठिकठिकाणी लावलेल्या “ॐ नम: शिवाय”च्या पाट्या आपण रस्ता चुकलो नसल्याची जाणीव करून देत राहतात. अर्ध्या-पाऊण तासात आपण म्हसोबाच्या खिंडीत पोहोचतो. इथून तर गडाची खडी चढण सुरु होते. कारवीची झाडीतून घसार्याची वाट पकडायची आणि अजून पाऊण तासात गडाचा कातळटप्पा गाठायचा. आमचा वाटाड्या बराच पुढे होता. एके ठिकाणी दमून दोन क्षण उभे राहून अजून किती चढायचे आहे ते पाहण्यासाठी वर पाहिले तर साक्षात सूर्यनारायण चंद्र्गडाच्या पाठीमागून आमच्याकडे डोकावून पाहत होते. कदाचित सूर्य बघायला आला असेल की एवढ्या पहाटे कोणाला हुक्की आली जावळीमध्ये घुसायची? सूर्योदयाचे ते अप्रतिम दृश्य कॅमेरापेक्षा डोळ्यांमध्ये आयुष्यभरासाठी बंदिस्त झाले. पुरुषभर उंचीच्या या कातळातील पायट्यांवरून अतिशय काळजीपूर्वक चढून माथ्यावर जायचे. वर जाताच खोऱ्यातून वर येणारा भन्नाट वारा आपले स्वागत करतो. आणि मग जावळी खोऱ्याचे दिसणारे विहंगम दृश्य. महाबळेश्वरचे आभाळाला गवसणी घालणारे सह्याद्रीचे अजस्र कडे आणि त्यातून अल्लडपणे वाहणारी ढवळी नदी. खाली दुरवर इवलीशी दिसणारी ढवळे गावातील घरे पाहिल्यावर सह्याद्रीच्या अवाढव्य आकाराची आणि आपल्या नगण्यपणाची जाणीव होते.
चंद्रगडाचा विस्तार तसा छोटासाच आहे. चिंचोळ्या गडमाथ्यावर एक सुंदर घडीव नंदी आणि समोर कातळात खोदून आत कोरलेली पिंड दिसते. या ढवळेश्वराच्या दर्शनासाठी महाशिवरात्रीला पंचक्रोशीतून भाविक येतात. पिंडीचे दर्शन घेऊन एक कातळात खोदलेल्या प्रवेशद्वारातून गडाच्या बालेकिल्ला वजा सर्वोच्च माथ्यावर पोचायचे. येथे वाड्याचे काही अवशेष दिसतात. जवळच एक पाण्याचे टाके आहे. तर शेजारची पायवाट गडाच्या उत्तरेला असलेल्या टाक्याकडे घेऊन जाते. ही वाट कातळ आणि तटबंदी मधीलएका लहानग्या दरवाज्यातून जाते. दरीला एकदम खेटून खोदलेल्या या टाक्याचे थंडगार पाणी पिण्यायोग्य आहे. तर शेजारी एक पहार्यासाठी गुहा खोदली आहे. गुहेपाशी बसून पाण्याचे दोन घोट घेताना इतिहासात रमायचे आणि समोरचा निसर्ग पाहून नि:शब्द व्हायचे. एकूणच गडाचा वापर ढवळे घाटावर नजर ठेवण्यासाठी आणि टेहळणीसाठी होत असल्याने गडावर फारशी बांधकामे आढळत नाहीत. रायरेश्वर, कोळेश्वरची पठारे, महादेवाचा मुऱ्हा, महाबळेश्वर, ढवळे घाट असा बराच मोठा प्रदेश दृष्टीक्षेपात येत असल्याने पहाऱ्यासाठी यापेक्षा उत्तम जागा दुसरी कोणती असेल. चंद्रराव मोऱ्यांनी ज्या जावळीच्या जोरावर महाराज्यांशी उद्धटपणा केला ती जावळी चंद्रगडावरून अनुभवता येते.
चंद्रगड उतरतानासुद्धा भरपूर काळजी घ्यावी लागते. नाहीतर बुड शेकलेच म्हणून समजा. तासाभरात पुन्हा ढवळे गाव गाठायचे आणि परतीच्या वाटेवरचे नरवीर तानाजीचे उमरठ गाव गाठायचे. ज्या सिंहामुळे कोंढाणा जिंकता आला त्या शूरवीराचे स्मारक बघितल्याशिवाय जावळी मोहीम फत्ते होणे शक्य नाही. रात्री अनुभवता न आलेला जावळीचा निबिडपणा आत्ता जाणवतो आणि मनात घोळत राहते ते चंद्रराव मोऱ्याचे उत्तर “जावळीस येणार असाल तर यावे. दारू-गोळा मौजूद आहे. येता जावळी, जाता गोवळी!!!”
Reply