गडकोटांवरील गणेश मूर्ती

सह्याद्रीची भटकंती करत असताना कुठल्याही गड किल्ल्यावर २ देव हमखास आढळून येतात. हनुमान आणि गणपती… आज गणेश चतुर्थीच्या निमित्त काही आडबाजूच्या थोड्याशा दुर्लक्षित पण तरीसुद्धा शेकडो वर्षापासून टिकून असलेल्या गड किल्यावरच्या ११ गणेश मूर्तीं बद्दलची ही माहिती… 

१) राजगड : स्थळ-सुवेळा माची. एका सु-वेळी (चांगल्या मुहूर्ताला) प्रत्यक्ष शिवाजी महाराजांनी या गणपतीची स्थापना केली, आणि चांगल्या कामाचा श्री गणेशा केला, हीच ती मूर्ती. सुवेळा माचीच्या तटामध्ये एका कोनाड्यात याची स्थापना केली आहे. या मूर्तीसमोर समोर दगडी दीप आहे.

२) हडसर : स्थळ(19°15’59″N 73°47’57″E)- हडसर किल्ल्याच्या दक्षिण-पश्चिम बाजूस सुटावलेल्या भागात हा अतिशय सुबक गणपती वर्षानुवर्षे ठाण मांडून आहे. मूर्ती भंगलेली आहे पण त्याचे डोळे लक्षात राहण्यासारखे आहेत…

३) रतनगड : स्थळ(19°29’49″N 73°42’16″E) रतनगडाच्या हनुमान दरवाज्यामध्ये उजव्या बुरुजावर हे देखणं गणेशशिल्प आहे. याचं वैशिष्ट्य म्हणजे याच्या दोहो बाजूस देवी आहेत… बहुधा रिद्धी-सिद्धी असाव्यात…

४) भोरगिरी : स्थळ(19°2’31″N 73°34’9″E) भोरगिरी किल्ल्याच्या पायथ्याला महादेव मंदिर आहे (अतिशय देखणं मंदिर, घडीव कोरीव दगड सगळीकडे पसरलेले आहेत, मुक्कामाला योग्य ठिकाण).  याच मंदिराच्या आवारात एक अनोखी गणेश मूर्ती पाहायला मिळाली. या मूर्तीला गरुडासारखे पंख दाखवले आहेत कि ती स्त्री वेशातील मूर्ती आहे ठाऊक नाही. कुणाला माहिती असल्यास कळवावे. मूर्ती थोडी वेगळी आहे हे मात्र नक्की.

५) महिपालगड :  स्थळ(15°53’25″N 74°22’26″E) महिपालगडाच्या वैजनाथ मंदिराच्या मंडपामधे हा सुमारे ३ फूट उंचीचा काळ्या पाषाणातील गणपती आहे, या भागात काळा पाषाण उपलब्ध नाही. ही मूर्ती किंवा त्याचा दगड बाहेरून आणला असावा (या मंदिराच्या आवारात शिवलिंग शिलालेख कोरीव चिन्हांनी भरलेले टाके एक जुना नगारा सुद्धा आहे).

६) माणिकगड : स्थळ (18°49’35″N 73°11’40″E) माणिकगडाच्या टोकावर तटाच्या कडेने काही टाक्यांचा समूह आहे त्याच्या बाजूला एक शिवलिंग आणि हा गणपती आहे. सद्यस्थितीत तो थोडासा भंगला आहे चेहरयाचा भाग दिसत नाही. उजवा हात गुडघ्यावर डावा सोंडेजवळ तर मागच्या हातांमध्ये आयुधे आहेत.

७) दातेगड : स्थळ(17°22’44″N 73°51’51″E) दातेगडावरची हि गणेशमूर्ती आजवर पाहिलेल्या गड देवतांमध्ये सर्वात सुस्थितीत असलेली, आणि मला सर्वात जास्त आवडलेली अशी आहे. सुमारे पुरुषभर उंचीची ही मूर्ती एका मोठ्या देवडी सदृश कोनाड्यात विराजमान आहे. दोन्ही कान जास्वंदी फुलाप्रमाणे कोरीव आहेत, पोटावर नागाचं वेटोळ आहे, एक हात आशीर्वाद देणारा, एक सोंडेवर तर मागच्या दोन्ही हातात परशु आणि अंकुश (?) आहेत. (या गणरायाच्या सोबतीला शेजारी तितकाच उंच अन सुंदर मारुतीराया सुद्धा कित्येक शतकांपासून उभा आहे)

८) चावंड : स्थळ ( 19°14’16″N 73°44’51″E) जुन्नरजवळच्या चावंड किल्ल्यावर एक देखणी पुष्करणी आहे. तिच्या एका देवळी मध्ये ही भंगलेली गणेश मूर्ती आहे.
या पुढचे तीनही गणपती एकाच किल्ल्यावरचे आहेत आपण हरिश्चंद्रगड च्या अक्षरशः वाऱ्या करतो पण या गणपतीना नीट बघत नाही.

९) हरिश्चंद्रगड : स्थळ (19°23’25″N 73°46’46″E) तारामती शिखराच्या पोटात कोरलेल्या गणेशगुफा याच गणपती च्या नावाने ओळखल्या जातात. सुमारे ७ फुट उंचीचा हा रांगडा गणपती, या आडरानात या गुहेत कधी कोणी कोरला आहे कोणास ठाऊक. पण कित्येक भटक्या ट्रेकर्सना रात्रीच्या मुक्कामी या गणरायची साथ आणि आशीर्वाद असतो… (अलिकडच्या काळात या गणरायाला प्लास्टिक अन दारूच्या बाटल्यांचा कचरा बघावा लागतोय हेच दुःख).

१०) हरिश्चंद्रगड : स्थळ : (19°23’29″N 73°46’47″E) हरिश्चंद्रगडाच्या पुष्करणी जवळ एका छोटेखानी देवळीमध्ये ही दुर्लक्षित पण सुस्थितीत असलेली मूर्ती आहे.

११) हरिश्चंद्रगड: स्थळ:(19°23’29″N 73°46’46″E) हरिश्चंद्र गडाच्या मुख्य मंदिराच्या बाजूला असण्याचा मान मिळालेला हा गणेश सर्वांच्या नजरेत भरेल असाच आहे. हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या आवारात एका ओट्यावर ही शेंदूर लावलेली मूर्ती आहे.

अजूनही बरेच गड किल्ले भटकायचे बाकी आहेत. अजूनही बरच काही बघायचं बाकी आहे. गड किल्ले बांधणाऱ्या आपल्या पूर्वजांना आधार होता या गड-देवतांचा, आणि आजही आपले अस्तित्व टिकवून असलेल्या या गडकोटाना त्यांचाच आधार आहे…

वरील सर्व माहिती ही माझा भटकंती-मित्र अजय काकडे याने संकलित केलेली आहे. तर काही छायाचित्रे ही अनुप बोकील याने दिलेली आहेत.

Posted in

7 responses

  1. Masta khup chan lihile aahes Rajgadavarchi aani Naneghatatali surivatila asleli pan murti tak…!!! 🙂

    1. स्वच्छंदयात्री Avatar
      स्वच्छंदयात्री

      माहिती सगळी अजयची आहे. मी फक्त ती सोशल केली 🙂

  2. छानच विषय आहे. गणेशमूर्तीं बद्दल लिहिलेला लेख व फोटोज सुद्धा छान आहेत. हनुमानाचेही फोटो माहितीस्वरूपात दिल्यास अजून वाचनीय होईल. महाराजांच्या प्रत्येक गडावर हनुमान व गणेशमूर्तीची स्थापना केलेली आढळतेच. पण देवींच्या मूर्ती सुद्धा अनेक किल्ल्यांवर आहेत. जसे की राजगडावरील पद््मावती देवी, तोरणावरील मेंगाई देवी, शिवनेरीवरील शिवाई देवी. यांच्याविषयी सुद्धा लेख लिहाता येऊ शकतो. मस्त.

    1. स्वच्छंदयात्री Avatar
      स्वच्छंदयात्री

      धन्यवाद निशिकांत… इतर माहिती सुद्धा गोळा करतोय आम्ही. आपल्याकडे काही माहिती उपलब्ध असल्यास जरुर कळवणे.

  3. जमलेलंय … मस्त …

    1. स्वच्छंदयात्री Avatar
      स्वच्छंदयात्री

      धन्यवाद मित्रा…

  4. Hemant Pokharankar Avatar
    Hemant Pokharankar

    सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रामगडावरील गणेशमूर्ती, कोरीगडाच्या पायथ्याची गणेशमूर्ती, रतनगडावरच पहिल्या दरवाजाच्या डाव्या बाजूस असलेली पण पटकन लक्षात न येणारी मूर्ती यादेखील हव्यात. आणखी दुर्गगणेशांचा संग्रह इथे मिळेल.. http://www.maayboli.com/node/28677

Reply

Your email address will not be published. Required fields are marked *