काल दिवसभराच्या थकव्यानंतर लागलेल्या गाढ झोपेला चाळवले ते बोकीलच्या रागदारीने. भल्या पहाटे कसला किडा वळवळत होता त्याच्या अंगात कोणास ठाऊक? आणि बाजूच्या रानातले मोर कर्कश्य आवाजात केकाटून त्याला बाहेरून साथ देत होते. शेवटी मला झोपेचा गाशा गुंडाळून उठावेच लागले तेव्हा कुठे हे दोन्ही आवाज शांत झाले. मोरांचा माग घेण्यासाठी मी बाहेर आलो तर बाहेरचे आल्हाददायक वातावरण पाहून फारच सुखावून गेलो. सूर्याची कोवळी किरणे दारातून आत शिरू पाहत होती. अंगणातील गवतावर पडलेले दवबिंदू उजळून मोत्यांप्रमाणे भासत होते. खाद्य शोधण्यासाठी किडे गवतावर उड्या मारत होते तर तारेवर एक भोरड्याची जोडी त्या किड्यांसाठी टपून बसून होती. लोणीमधल्या अजयच्या घराला “फार्म हाउस” म्हणायला काहीच हरकत नव्हती. आजूबाजूला ५-६ एकराची शेतजमीन. घरापर्यंत येणारा बांधावरचा कच्चा रस्ता. घरामागे नुकतीच लावलेली आंब्याची कलमे. आणि समोर भलेमोठे ग्रीन हाउस. असा सुंदर देखावा बघताना हातात चहाचा कप मिळाला तर? अल्लाउद्दिनच्या जिनीप्रमाणे मनातल्या इच्छा ओळखत अजयने चहाचा वाफाळता कप समोर धरला. देव त्याचे भले करो!!! प्रांजलने तर मुलगा पसंत आहे अशी प्रांजळ कबुली सुद्धा देऊन टाकली. नाष्ट्यासाठी प्रांजल आणि अजयने बनवलेल्या मॅगीचा “बस्स दो मिनट” म्हणत फडशा पाडला आणि सामानाची आवाराआवर सुरु केली.
“काकडे प्लाझा”ला टाळे ठोकून आम्ही आजच्या भटकंतीला निघालो. वर्धनगड, महिमानगड आणि पंतप्रतीनिधींचे औंध. पण त्याआधी समोरचे ग्रीन हाउस बघायची इच्छा काही मोडवली नाही. फक्त ५ मिनिट म्हणता म्हणता तिथल्या जरबेरीच्या फुलांमध्ये अर्धा तास काढला. शेवटी प्रांजलने अक्षरश: ओढून बाहेर काढले. लोणी गावाशेजारीच स्वराज्याचे सरसेनापती प्रतापराव गुजरांचे भोसरे गाव आहे. त्या गावातून जाताना, त्यांची पडलेली गढी पाहताना “वेडात मराठी वीर दौडले सात” हे गाणे आठवल्यावाचून राहत नाही. वर्धनगडला जाण्यासाठी पुसेगावला जावे लागते. या रस्त्यावर दोन्ही बाजूला असलेल्या वडाच्या झाडांमुळे मन प्रसन्न होऊन गेले होते. त्यामुळे मी आणि प्रांजलने बोकीलच्या चित्रविचित्र रागदरीला “आय अम अ हंटर” ची जोड देऊन जुगलबंदी चालू केली होती. कोरेगाव-पुसेगाव या हमरस्त्यावरच वर्धनगड नावाचे गाव आहे. गावाच्या पाठीमागेच राखणदार म्हणून वर्धनगड उभा आहे. गावात शिरतानाच दोन तोफा इतिहासाची साक्ष देत उभ्या आहेत. एका पडक्या वाड्यापाशी गाडी उभी करून गडावर जाणारी मळलेली वाट आम्ही जवळ केली. गडाची उंची कमी असल्याने अर्ध्या तासातच आपण गडाच्या दरवाज्यात पोहोचतो. गडाची बांधणी शिवकालीन असल्याने या दरवाज्याची रचना गोमुखी आहे. भक्कम तटबंदी आणि बुरुजांनी वेढलेला हा दरवाजा खूपच सुंदर आहे. दरवाज्यातून आत गेल्यावर आपण माचीवर प्रवेश करतो. प्रचंड विस्ताराच्या माचीवर बांधकामांचे अनेक अवशेष विखुरले आहेत. गडाची तटबंदी अजूनही शाबूत असल्याने आम्ही त्यावरूनच गडफेरी चालू केली. खालच्या अंगाला गावामध्ये काडेपेट्यासारख्या घरांमध्ये एखादा चौसोपी वाडा उठून दिसत होता. गडाला चोर दरवाजा आहे असे वाचले होते त्यामुळे त्या चोरवाटेच्या शोधात आमची जवळपास अर्धी गडप्रदक्षिणा झालीच. पण चोर दरवाज्यातून खाली उतरून कड्यावर उभे राहिलो आणि दरीतून येणाऱ्या भन्नाट वाऱ्यापुढे ही पायपीट विसरून गेलो. माचीवर मध्यात एक छोटी टेकडी आहे. तिथे वर्धनीमातेचे सुरेख देऊळ आहे. आणि मातेची मूर्ती तर अप्रतिम. कधी मुक्काम करायचा झाल्यास अतिशय सुरेख जागा होती ती. देवळापाशी उभे राहिले की संपूर्ण गड दृष्टीक्षेपात येतो. चहूबाजूंनी वेढलेल्या भक्कम तटबंदी आणि असंख्य बुरुजांकडे पाहून शिवकालातील गडाची बरकत नक्कीच जाणवते. येथून कल्याणगड उर्फ नांदगिरी, महिमानगड, संतोषगड असा बराच मोठा प्रदेशसुद्धा नजरेखाली येतो.
मंदिरासमोरून एक पायऱ्यांची वाट खाली उतरते. याच वाटेवर एक महादेवाचे मंदिर लागते. बाजूलाच एक कोरीव टाके सुद्धा आहे. तसेच मागे झाडीमध्ये एका पडलेल्या वाड्याचे अवशेष सुद्धा दिसतात. हीच वाट आपल्याला परत गडाच्या मुख्य दरवाज्यात घेऊन येते. शिरस्त्याप्रमाणे येथे एक ग्रुप फोटो झाला आणि आम्ही उतरायला सुरवात केली. वर्धनगडावर शिवाजी महाराज महिनाभर विश्रांतीसाठी वास्तव्यास होते अशी नोंद उपलब्ध आहे. आणि गडाची पुनर्बांधणी आणि मजबुतीकरण हेसुद्धा महाराजांनीच करवून घेतले आहे. शिववास्तव्याने पुनीत झालेल्या, स्वराज्यात एके काळी महत्वाची भूमिका निभावलेल्या या किल्ल्याची आजची अवस्था बघताना खंत नक्कीच वाटते. राहून राहून वाटते
गडागडांचे रूप आगळे,
प्रत्येकाचे इतिहास वेगळे,
कुठे पदके खिंडारची
तर भरे कुठे दरबार!!
वर्धनगडाची भटकंती करून परत पुसेगावात येईपर्यंत सूर्य डोक्यावर आला होता. उन्हामध्ये महिमानगड करायचा की जवळच असलेल्या औंधमधील संग्रहालय बघायचे या प्रश्नांच्या उत्तरासाठी आम्हाला खुराकाची गरज होती. त्यामुळे एक वडापाव, भाजीची गाडी पकडून आम्ही आधी पोटपूजा चालू केली. ५-६ प्लेट भजी, २ प्लेट वडापाव, पुरीभाजी, वडा-सांबर एवढे फस्त केले तरी आमची खा-खा काही थांबेना. म्हणून मी आणि बोकील केळी आणायला गेलो. डझनभर केळी घेताना शेजारच्या हलवायाकडे गुलाबजाम दिसले. मग राहवते थोडेच? पावशेर गुलाबजाम चौघांच्यात किती टिकणार? तेवढ्यात एका दुकानावर “लस्सी मिळेल” असे लिहिले होते. पटकन दुकानात शिरून ४ लस्सीची ओर्डर दिली. मस्त मलईचा गोळा घातलेली थंडगार लस्सी समोर आली. वाह… अजून ही चव रेंगाळत आहे जिभेवर… अप्रतिम… भरल्या पोटी महिमानगड करणे शक्य नव्हते त्यामुळे आम्ही औंधचा रस्ता धरला. औंध हे पेशव्यांच्या पंतप्रतीनिधींचे गाव. गावाला इतिहास तसा बराच आहे. पंत प्रतिनिधींनी उभारलेले कला संग्रहालय बघण्याजोगे आहे. जगभरातून गोळा केलेली शिल्पे, चित्रे, हत्यारे बघण्यासाठी आख्खा दिवससुद्धा पुरणार नाही. २ तासात संग्रहालयफेरी आटोपून आम्ही औंधच्या यमाई देवीच्या दर्शनाला गेलो. टेकडीवर बांधलेले उंचच उंच तटांनी संरक्षित केलेले हे मंदिर बघताना जेजुरी, भुलेश्वर यासारख्या देवळांची आठवण होते. येथून पूर्वेला एकांड्या भूषणगड उठून दिसत होता. त्याला उद्या भेटायला येतो सांगून आम्ही लागलीच परतीचा रस्ता धरला.
पुसेगाव-दहिवडी रस्त्यावर महिमानगड गाव लागते. गावामागेच शंभू-महादेव डोंगररांगेतील महिमानगडाची कातळभिंत उभी आहे. एका शाळेजवळ गाडी उभी करून आम्ही चढाईस सुरवात केली. चढायला सोपा असला तरी सुबाभळीचे माजलेले रान आणि मुरमाचा घसारा यामुळे आम्ही काळजी घेतच चालत होतो. अर्ध्या तासातच तटबंदीमध्ये लपलेल्या दरवाज्यासमोर उभे ठाकतो. शिवाजी महाराजांनी या गडाची बांधणी केली असल्याने गोमुखी पद्धतीचा दरवाजा आपल्याला येथे पाहायला मिळतो. दरवाज्यातून आत शिरल्यावर छोट्या टेकडीवर मारुतीचे एक मंदिर लागते. मंदिराशेजारीच एक बांधीव टाके आहे. गडावर फार अवशेष शिल्लक नाहीत परंतु वाड्यांची काही जोती मात्र दिसतात. गडाच्या पूर्वेला एक डोंगरसोंड गेली आहे. या सोंडेचा माचीसारखा उपयोग करून त्यावर काही बांधकामांचे अवशेष आढळतात. ही सोंडवजा माची गडापासून भक्कम तटबंदीने वेगळी केली आहे. या भागात जाण्यासाठी चोर दरवाज्यासारखी वाट सुद्धा आहे. या सोंडेवर आम्ही निवांत पहुडलो होतो. किल्ल्यावरून क्षितिजाकडे झुकणाऱ्या सूर्याकडे बघता बघता कसा वेळ जातो ते सांगणे कठीणच. त्याबद्दल कितीही लिहिले, फोटो काढले, नंतर आठवणी काढल्या तरी तो क्षण चिरतरुणच राहतो. बुडणाऱ्या सूर्यबिंबासमोर उडणारे पक्षी बघून आमच्या पोटातल्या कावळ्यांनी गलबलाट चालू केला होता. त्यामुळे नाईलाजाने उठून गड उतरायला सुरवात केली.
पोटातल्या कावळ्यांना शांत करण्यासाठी पुसेगावातल्या एका हॉटेलमध्ये चिकनवर चांगलाच ताव मारला. अगदी खाली बोट लावून जेवलो. आज पुन्हा एकदा मुक्काम होता “काकडे प्लाझा”मध्ये. परत येईपर्यंत पोटातली कोंबडी एकेका अवयवावर विजय मिळवत डोळ्यांपर्यंत पोचली होती. स्लीपिंग बॅगमध्ये शिरताना उद्याच्या भटकंतीचा प्लॅन ठरवायला सुद्धा कोणी जागे राहिले नव्हते.
Reply