शिवनिर्मित संतोषगड आणि वारुगड

सह्याद्रीच्या मुख्य रांगेतील राजगड, तोरणा सारख्या अभेद्य आणि आकाशाला गवसणी घालणाऱ्या गडकिल्ल्यांपुढे माणदेशातील छोटेखानी लुटूपुटूचे किल्ले दुर्लक्षित झाले आहेत. सह्याद्रीत तुफानी पाऊस पडत असला तरी हे किल्ले अजूनही पावसाच्या पहिल्या सरीसाठी आतुरले आहेत. या किल्ल्यांच्या इतिहासाला उजाळा देण्यासाठी आणि आमची भटकंतीची हौस भागवण्यासाठी आम्ही निघालो होतो. बोकीलने या वेळी सामान्य माणसाप्रमाणे ४ दिवसाचा बेत आखला. फक्त यात त्याने १० किल्ले घुसडले होते. तर आमचा नवीन भिडू प्रांजल याने त्याची गाडी आणायची तयारी दाखवली. खटाव जवळचे लोणी हे अजयचे मूळगाव. त्यामुळे तिकडे मुक्कामाची सोय झाली होतीच. चला. सगळे जुळले तर होते. स्वातंत्र्यदिन वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यासाठी आम्ही सर्वजण आतुर होतो.

पावसासाठी आसुसलेला माणदेश
पावसासाठी आसुसलेला माणदेश

पहाटे लवकर निघता यावे म्हणून प्रांजल आणि बोकीलने आदल्या दिवशीच पुण्यात मुक्काम हलवला होता. बरीच मोठी सुट्टी असल्याने मी जरा निवांतच होतो पण बाकीचे भिडू माझी साखरझोप मोडायला भल्या पहाटे घरी हजर झाले. त्यामुळे अर्धवट झोपेतच जशी जमेल तशी सॅक कोंबली आणि तयार झालो. तोपर्यंत चहा तयार झालाच होता. कपभर चहा आणि थोड्या फालतू गप्पा मारून आम्ही बाहेर पडलो.  या भटकंतीत आम्ही चौघे होतो. प्रांजल आणि बोकील हे मुंबईकर तर मी आणि अजय पुणेकर. पुण्यातल्या “शिस्तबद्ध” वाहनचालकांवर तोंडसुख घेत प्रांजल गाडी चालवत होता, तर बोकील झटके आल्यासारखा मधूनच एखादा आलाप घेत होता. अजय नेहमीप्रमाणे दिशांचे ज्ञान पाजळत रस्ता दाखवत होता. मी बापडा गाडीच्या एका कोपऱ्यात झोपेला आळवत पडलो होतो. आजचे आमचे टार्गेट होते फलटण जवळील संतोषगड आणि वारुगड. सोयीचा म्हणून कोंढवा-सासवड-नीरा-फलटण असा रस्ता निवडला होता. बोपदेव घाटातील वळणांवर माझी गाडी आडवी झाली ते एकदम सासवड आल्यावरच सरळ झाली. या भागात फिरताना सासवडचा पुरंदरे वाडा न बघता जाणे म्हणजे मोहिमेवर निघताना देवीचे दर्शन न घेता जाण्यासारखेच. पण आमचे नशीब फारच खराब निघाले. तिथे कोणत्या तरी हिंदी चित्रपटाचे शूटिंग चालू होते. आणि आम्हाला आल्या पावली माघारी फिरावे लागले. मग बाजूलाच असलेली बाळाजी विश्वनाथ म्हणजे स्वराज्याचा पहिला पेशवा यांची समाधी आणि संगमेश्वराचे दर्शन घेऊन मोहिमेचा श्रीगणेशा केला. पुढचा रस्ता म्हणजे नुसते माळरान होते. इकडे घाटमाथ्यावर बादल्यांनी पाऊस पडतोय तर या भागात सावली द्यायला सुद्धा ढग जमले नव्हते. कोरड्या जमिनीकडे बघून वाटणार पण नाही कि आत्ताच श्रावण संपतोय. जेजुरीच्या अलीकडे मस्त चटपटीत मिसळ चापली आणि वाल्हे-नीरा-लोणंद-तरडगाव असे पालखी मार्गाने आम्ही फलटणमध्ये आलो.

वारुगडच्या वाटेवर
वारुगडच्या वाटेवर

येथून ताथवडा गावचा रस्ता विचारून घेतला. फलटण-पुसेगाव रस्त्यावरचे ताथवडा हे संतोषगडाचे  पायथ्याचे गाव. अंदाजे शेकडा उंबराच्या गावात शिरतानाच एक बालसिद्ध महादेवाचे पुरातन मंदिर लागते. मंदिराबाहेर पाराजवळ गाडी लावून आम्ही पहिल्या चढाईस सज्ज झालो. गावातूनच गडावर जायची मळलेली वाट आहे. वाटेत वनखात्याने अतिउत्साह दाखवत वन्य प्राणी आणि पक्ष्यांचे माहितीपर फलक लावले आहेत. हे फलक वाचता वाचता गडाची माची कधी येते ते समजतच नाही. गडाच्या या भागात २-३ गुहा आहेत. सद्यस्थितीत या गुहांमध्ये एक मठ आहे. जर तेथील सेवकाने तुम्हाला अडवले नाही तर तुम्हाला या गुहा नीट पाहता येतात. येथेच एका गुहेमध्ये पाणी भरले आहे परंतु खूप अडचण असल्याने तेथे उतरता येत नाही. माथापाशी थोडा विसावा घेऊन गडाच्या वरच्या टप्प्याकडे जायला १० मिनिटे सुद्धा पुरतात. वाटेत दरवाज्याचे आणि तटबंदीचे अवशेष दिसतात. येथून गडाच्या तिसऱ्या टप्प्यात म्हणजेच बालेकिल्ल्यात जाताना कमानरहित दरवाज्यातून जावे लागते. बालेकिल्ल्यावर वाडा, मंदिरे, कोठारे असे अनेक अवशेष दिसतात. पण येथील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे बालेकिल्ल्यावर असलेले विहीरवजा टाके. अंदाजे कातळात कोरलेल्या वीसेक  पायऱ्या उतरून कोरलेल्या दरवाज्यातून आपल्याला या विहिरीत उतरता येते. गडावर सावली मिळण्याची ही एकमेव जागा. या ट्रेक मध्ये आम्ही एक नवा उपक्रम चालू केला होता. आपण ज्या किल्ल्यांना भेट देतो त्याच्या नकाशाचा “flex board” किल्ल्यांवर आडोश्याच्या ठिकाणी लावायचा. संतोषगडावर हा नकाशा या विहिरीच्या तोंडापाशी असलेल्या महादेव मंदिरात तुम्हाला पाहायला मिळेल. तासाभरात गडफेरी आटोपून आम्ही परत पायथ्याशी आलो. तोपर्यंत पाराजवळ लावलेल्या आमच्या गाडीने गावकऱ्यांचे कुतुहूल जागे केले होते. पारावर आणि गाडीपाशी ज्येष्ठ मंडळींची फौज जमली होती. “कुठनं आला? कंचा टीवी?” नुकतेच जवळपास कुठले तरी शूटिंग झाले होते. त्यामुळे आम्ही पण त्यातलेच असू या आशेने आमच्याशी बोलत होते. आम्ही नुसताच गड पाहायला आलोय म्हणाल्यावर अजूनच आश्चर्य व्यक्त झाले. मग लगेच पुढचा प्रश्न “वर पाऊस हाय का?” सगळीकडेच पावसाची बोंब आहे ऐकल्यावर त्याला जरा वाईट वाटलेले दिसले. गावाच्या नळावर तोंड धुवत पुढचा रस्ता विचारून घेतला आणि परत आमची गाडी सुरु झाली.

परळ-वारुगड येष्टी
परळ-वारुगड येष्टी

“म्होरं ढवळपाटीला राईट मारा आणि सरळ मांडवखडकावं जावा. तिथं इचारा दुधभाय म्हून. कुनीबी सांगल.” वारुगडला जाण्यासाठी उलटे फलटण न गाठता मधून एक कच्चा रस्ता जातो अशी कुणकुण होती आम्हाला, त्याची खात्री फाट्यावर झाडाखाली पान-सुपारी लावून बसलेल्या म्हाताऱ्याने एक पिंक टाकत दिली. तिथल्याच टपरीत एकेक काळ्या पाण्याची बाटली संपवली आणि माळरानावरून धुळीने माखलेल्या रस्त्याला लागलो. दूरवर पसरलेले ओसाड माळरान, पावसाची वाट बघणारी कोरडी जमीन, आकाशात निर्विवाद वर्चस्व गाजवणारा सूर्य आणि गाडीत चालू असलेले “हंटर” गाणे. उगाच कुठल्यातरी भोजपुरी पिक्चरचे शूटिंग चालू असल्यासारखे वाटत होते. गिरवी गावातून दुधभायचा रस्ता आम्हाला एका “हिरो”ने  दाखवला. काळा गॉगल, लालसर शर्ट, अर्धवट उभी कॉलर, चायनीज मोबाईल आणि कानात मोठ्याने वाजणारी हिमेशची गाणी. दुधभाय फाट्यावर आम्हाला सोडून तो “हिरो” तर्राट निघून गेला. या गावाचे खरे नाव दुधबावी असे आहे पण अपभ्रंश दुधभाय. गावात वारुगडचा रस्ता विचारल्यावर एकाने सांगितले “जावा त्या येष्टीमागं. तिकडंच जायलीये ती.” त्या “येष्टीची” धूळ खात तिच्यामागे मुकाटपणे चाललो होतो. थोड्याच वेळात डाव्या हाताला किल्ल्यासदृश एक डोंगर दिसायला लागला. हाच वारुगड असे ठरवून आम्ही त्याचे फोटोसुद्धा काढले. पण रस्ता त्या डोंगराकडे वळायलाच तयार नव्हता. शेवटी एका खिंडीतून पलीकडे गेल्यावर खऱ्या वारूगडाचे आम्हास दर्शन झाले. हा रस्ता गडाच्या आपल्याला माचीवरच्या भैरवनाथाच्या जीर्णोद्धारित मंदिरापर्यंत घेऊन जातो.  तिथल्या पटांगणात गाडी लावेपर्यंत मागची “गाव तेथे एस.टी.” उक्ती सार्थ करणारी ती “परळ-वारुगड” येष्टी प्रचंड आवाज करत तेथेच येऊन स्थिरावली.

वारुगड माची
वारुगड माची

येथून बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी १५ मिनिटे सुद्धा पुरतात. आम्ही पायवाट शोधायच्या भानगडीत न पडता सुलतानढवा करतच गडमाथा गाठला. बालेकिल्ल्यावर फारसे अवशेष शिल्लक नसून थोडीफार तटबंदी आणि सदरेच्या इमारतीचे जोते शिल्लक आहे. बाजूलाच एक बुजलेली विहीर सुद्धा दिसते.  सदरेपासून उत्तर दिशेला खाली उतरण्यासाठी पायऱ्या आणि उध्वस्त झालेले दोन दरवाजे दिसतात. याच वाटेने खाली उतरल्यावर गडाचा मुख्य दरवाजा “फलटण दरवाजा” लागतो. येथेच बाजूला एक खांब टाके नजरेस पडते.  गावकऱ्यांनी या टाक्याची डागडुजी करून त्याचे पाणी वापरण्यास योग्य केले आहे. टाक्याच्या पलीकडे चार भुयारे असून आतमध्ये  ती एकमेकांना जोडली असल्याची शक्यता नाकारता येत नाही. फलटण दरवाज्यात एक ग्रुप फोटो काढून आम्ही परत गाडीजवळ आलो. मावळतीच्या किरणांनी सारा परिसर उजळून निघाला होता. वारूगडाच्या प्रचंड विस्ताराच्या माचीवरून एक फेरफटका मारून मंदिरापाशी आलो. तोवर एस.टी. च्या कंडक्टरने आमची विचारपूस केली. आमच्यापैकी दोघेजण मुंबईचे आहेत ऐकल्यावर खुशीत येऊन मुंबईहून आणलेले पाणी देऊ केले त्यांना. रोजच्या या आडवळणाच्या फेऱ्यांना कंटाळला होता बिचारा. त्याच्याशी थोड्याफार गप्पा मारून आम्ही परतीची वाट पकडली.  विजापूरकरांच्या आक्रमणांना आला घालण्यासाठी थोरल्या महाराजांनी स्वत:  संतोषगड आणि वारुगड हे किल्ले बांधून घेतले होते अशी नोंद सापडते.

वारुगड
वारुगड

दिवसभराच्या प्रवासाने सूर्य वारूगडाच्या पाठीमागे विसावला होता तर आम्हाला खुणावत होते लोणीचे अजयचे घर. वाटेत दहिवडी मध्ये गरमागरम भज्यांच्या वासाने आमची गाडी आपसूकच थांबली. ५-६ भज्यांच्या प्लेट पोटात गेल्यावरच गाडीला स्टार्टर मारला. वाटेत रात्रीचा शिधा म्हणून डाळ-तांदूळ घेतले आणि तडक लोणी गाठले. घरात शिरल्या शिरल्या प्रत्येक जण मिळेल ती जागा पकडून विसावला. अजयने ट्रेकरच्या भूमिकेतून आचाऱ्याच्या भूमिकेत शिरत वरण-भात शिजवला. भुरके मारत भात खाताना ट्रेकच्या गप्पा चालूच होत्या. कुठल्याही ट्रेक मध्ये मुक्कामाला घर, झोपायला गादी असले लाड पुरवले गेले तर कोणा भटक्याला आवडणार नाही? त्यातून कहर म्हणजे ताज्या धारेच्या दुधाची कॉफी. वाह. आता ट्रेकला आल्याचा “फील” निद्रा-पिशवीत (स्लीपिंग बॅग्स) झोपल्याशिवाय थोडीच येणार? दिवसभराचा आढावा घेत आणि उद्याचा बेत ठरवत डोळे कधी मिटले ते आता आठवत पण नाही.

Posted in

6 responses

 1. Anup Bokil Avatar
  Anup Bokil

  Byesht !!!!!! दुधभाय !! सॉल्लिड मजा आली राव ! 😀

 2. कडक ! दंगा घातलेला दिसतोय 🙂

  1. प्रश्नच नाही. नेहमीप्रमाणेच!!

 3. सही रे… पण पाऊस नाही रे अजिबात. एकदम कोरडा प्रदेश दिसतोय 🙁 🙁

 4. Manasi Avatar
  Manasi

  Khup mastch….Malahi avdel trecking karayala…lohagad cha aspas sudha mast ahe tasech Panhala Jotiba ( kolhapur) trek pan kar…..

  1. Thanks Manasi 🙂

Reply

Your email address will not be published. Required fields are marked *