मागची भटकंती होऊन दोन आठवडे उलटले तरी पुढचे बेत ठरत नव्हते. तशी आमची भटकंती ठरवायची पद्धत वेगळीच आहे म्हणा. या वेळी ठाणे जिल्यातील किल्ले बघायचे एकमताने (?) ठरले होते. तसे ध्रुव आणि वाघोबाने रात्री “जागवून” एक प्लान सुद्धा बनवला होता. पण प्लान प्रमाणे घडत असते तर आपला देश आत्ता कुठे पोचला असता नाही का? अगदी शुक्रवारी सकाळपर्यंत ठाणे जिल्हा एकदम फायनल होता. पण आम्हा पुणेकरांची गाडीची सोय न झाल्याने सोयीचे म्हणून पेण-पनवेल जवळचे किल्ले फुल अँड फायनल झाले. मिरगड-सांकशी-रत्नदुर्ग-माणिकगड असा भला मोठा बेत कागदोपत्री उतरला आणि शुक्रवारबरोबरच संपला.
शनिवारी भल्या पहाटे धो-धो पावसात मी, अजय आणि खंडो(बल्लाळ नव्हे) स्वारगेटला हजर झालो. रिक्षावाल्याने रस्त्यात पडलेले असंख्य खड्डे चुकवत पोचवल्याने कधी नव्हे ते वेळेवर सुटलेली अलिबागची “येष्टी” आमच्या तोंडावर निघून गेली. दोन प्लेट भजी, गरम चहा असा खास पावसाळी नाश्ता करून पुढच्या गाडीने पेणला पोचलो. तोपर्यंत मुंबईकर मंडळी (धुरड्या, वाघोबा आणि नवा गडी “योगी”) पेणमधील “तांडेल”ची मिसळ हाणत बसले होते. मग पुन्हा एकदा हाता-तोंडाची गाठ घालून देत मिसळ चापली आणि ढेकराबरोबर मिरगड-रत्नदुर्गचा बेत हवेत विरून गेला. नेहमीच्या अनुभवावरून स्थानिक लोकांना जवळपासचे किल्ल्याचे खरे नाव माहित नसते. सांकशीबाबतसुद्धा तेच घडले. तांडेलच्या “हाटेला”त काम करण्याला विचारले तर त्याने सांगितले “सांकसाई? बद्दृद्दिनदा पासून जा. स्टँडावर जा आणि मुन्गोशीची गाडी मिळंल. तिकडनं चालत जा. एक घंट्यात पोचाल.”
इथे पुन्हा एकदा नशिबाने आमची “येष्टी” चुकवली. मग एका टमटमने पनवेल रस्त्यावरच्या बळवलीफाट्यावर उतरलो. आणि पायाची गाडी सुरु केली. कोणीतरी सांगितले होते की वीस मिनिटात दर्गा येईल. रिपरिप पावसात गप्पा मारत टवाळक्या करत दीडेक तासात दर्ग्यापाशी आलो. “हजरत सईद बद्दृद्दिन हुसैनी दर्गा” असे भले मोठे नाव असलेला या दर्ग्याचा विस्तार गडपायथ्याला बराच मोठा आहे. पाठीमागेच दर्गा अथवा मशीद असे काहीसे जुने बांधकाम आहे. कुठल्यातरी पुस्तकात लिहिल्याप्रमाणे दर्ग्या पाठीमागची पाण्याची पाईप पकडून आमची सांकशीच्या चढाईला सुरवात झाली. दहा-पंधरा मिनिटाच्या सोप्या चढणीनंतर गडाच्या काही फुटक्या-तुटक्या पायऱ्या काळजीपूर्वक चढून गेलो की गडाचा छोटी सपाटी लागते. येथे कातळभिंतीमध्ये कोरलेले पाण्याचे एक टाके आहे. पण येथे चढण्यासाठी नीटशी जागा नसल्याने जरा जपूनच टाक्यापर्यंत जावे लागते. शिवाय सततच्या पावसामुळे येथील कातळ निसरडा झाला आहे. येथून गडमाथ्यावर जाण्यासाठी एका घळीतून चढावे लागते. थोडी काळजी घेतली की हा टप्पा पटकन सर् होऊ शकतो. पावसामुळे आणि निसरड्या वाटेमुळे आम्हाला येथे रोप लावून जावे लागले. या वाटेने आपण गडाच्या मध्यभागी जातो. माथा बराचसा खडकाळ आहे. समोरच दोन मोठी कोरडी टाकी दिसतात. तर काही छोटे-मोठे खड्डे दिसतात. त्यातले काही खड्डे चराने जोडले आहेत. यामागचा उद्देश काही लक्षात येत नाही. गडाचा पूर्वेकडील भाग हा मुख्य डोंगररांगेपासून वेगळा झालेला दिसतो. येथे उभे राहून ढगांमध्ये हरवण्याचा आनंद तसेच कोकणातून येणारा अल्लड वारा छातीत भरून घ्यायचा आणि नव्या दमाने उरलेल्या गडफेरीस निघायचे. गडाच्या पश्चिम भागात सुद्धा काही टाकी आणि एक टाके-वजा गुहा आहे. कोरीव खांबाची रचना असल्याने हे टाके आहे की गुहा ते लक्षात येत नाही. संपूर्ण गड फिरण्यास अर्धा तास पुरतो. गडाच्या इतिहासाची चर्चा करत आम्ही आल्या वाटेने दर्ग्याकडे परतलो. पोटातल्या कावळ्यांनीसुद्धा आता पावसाच्या आवाजात सूर मिसळला होता.
थोडावेळ विश्रांती घेऊन आम्ही पुन्हा पायाच्या गाडीने गोवा रस्त्यावर आलो. मिळेल त्या गाडीने पनवेल गाठले आणि माणिकगडच्या पायथ्याच्या वडगाव गावात जाणाऱ्या मुक्कामी गाडीची वाट बघत बसलो. वडगावला जाणारी साडे आठची शेवटची मुक्कामी गाडी साडे नऊला (अगदी वेळेवर) हजर झाली. पावसाच्या आवाजाच्या वरताण आवाज करत ती “येष्टी” इथून तिथून हलत तासाभरात मुक्कामी पोचली. कोपऱ्यावरच्या “अड्ड्यावर” गाडी थांबवून “डायवर”ने काही “घ्याचे का?” असे मास्तरास विचारलेसुद्धा. ओंकार ओकच्या कृपेमुळे आधीच गावात जेवण सांगून ठेवल्यामुळे गरम गरम कांदा-बटाटा-वांगी रस्सा, भाकरी आणि लोणचे असा फक्कड मेनू आमची वाट बघत होता. अगदी खाली बोट लाऊन अधाश्यासारखे तो अस्सल शिधा खाऊन गावातल्या मारुती मंदिरात पाठ टेकली. पत्र्यावर कोसळणाऱ्या पावसाच्या तालावर डोळे आपसूकच मिटले गेले.
पहाटे जाग आली ती प्रचंड कलकलाट आणि गोंधळामुळे. अंदाजे तीस-पस्तीस नवशे ट्रेकर माणिकगडच्या ट्रीप साठी आले होते. त्यांच्या ट्रेकिंगच्या अविर्भावापुढे आम्ही गरीब बापुडे वाटत होतो. गड चढताना ट्राफिक नको म्हणून आम्ही निवांत होतो. चहा-पोहे खाऊन चढणीस सुरवात केली. गेल्याच वर्षी आम्हाला याच गाडणे एकदा हुलकावणी दिली होती. जंगलात वाट चुकून भरकटले गेलो होतो. त्यामुळे आता परत तीच चूक नको असे म्हणूनसुद्धा सुरवात चुकलीच. शेवटी अर्धा जंगलात वाट शोधायचा प्रयत्न करून शेवटचा उपाय म्हणून “सुलतानढवा” सुरु केला. मिळेल त्या वाटेने दिसेल त्या दिशेने डोंगर माथ्याच्या दिशेने चढलो. सरतेशेवटी एका डोंगर धारेवर एक छत्री दिसली. भाताची खाचरे तुडवत छत्रीच्या दिशेने निघालो. वाट सापडली. नवश्या ट्रेकरपैकी एक जोडप्याने तिथे शेवटचा थांबा घेतला होता. गावकऱ्यांनी सांगितल्या प्रमाणे पठारावरून मारुती दिसेपर्यंत पन्नास एकर (?) चालत रहायचे आणि नंतर उजवीकडची वाट पकडायची. वाट सापडल्याने जरा चालण्यात जोर आला होता. त्यामुळे मारुतीच्या शोधात आम्ही ती मळलेली पायवाट तुडवू लागलो. काय सुंदर जंगल होते ते. हिरवी दुलई पांघरलेला माणिकगड मधूनच ढगाअडून दर्शन देऊन खुणावत होता. म्हणत होता “या पोरांनो… माझ्या अंगा-खांद्यावर चढा… पहा ही निसर्गाची किमया. अनुभवा सह्याद्रीचा रांगडेपणा…लवकर या…” पावसाने तर थांबायचे नाही असेच ठरवले होते. दोनेक तासाची नुसती पायपीट केल्यावर गडाची मुख्य चढण सुरु झाली. माथ्यावर जाणारी वर गडाला पूर्ण वळसा घालून जाते. वाट दाट जंगलातून जात असल्याने त्या अंगावर येणाऱ्या चढणीचा तेवढा त्रास होत नाही. माणिकगडची लिंगी अथवा सुळक्याला वेढा घालून घळीतून वाट गडावर जाते. थोड्याच वेळात एक मोठे टाके लागते. येथून सरळ जात तुटल्या तटबंदीमधून गडामध्ये प्रवेश होतो. गडमाथ्यावर सपाटीवरून थोडे चालले की एक चुन्याचा मोठा घाणा दिसतो. हा घाणा म्हणजे एक मोठे दगडी वर्तुळ आहे. पूर्वी या वर्तुळात बैल फिरवून चुन्याचा घाणा चालवला जायचा. थोडे पुढे गेले की गडाचे दोन दरवाजे लागतात. एक दरवाजा पूर्ण भग्न झाला असून पूर्वी येथून खाली उतरण्यासाठी वाट असावी असे दिसते. तर दुसऱ्या दरवाज्याची कमान शिल्लक आहे. कमानीवर गणेशाची सुंदर मूर्ती कोरलेली आहे. या दरवाज्यातून पलीकडे गेलो की एक मोठा तलाव आहे. आणि जवळच गडाची सलग तटबंदी दिसते. येथून थोडे पुढे गडाच्या खालच्या टप्प्यावर उतरण्यासाठीच्या पायऱ्या लागतात. या भागात दोन बलदंड बुरूज आणि काही टाकी आहेत. तटबंदी शेजारून एक वर परत फिरून मगाशी बघितलेल्या तलावाकडे जाते. या वाटेवर शंकराची एक पिंड आणि चार-पाच टाकी आहेत. या पिंडीजवळ एक भग्न गणेशमूर्ती सुद्धा दिसते. पूर्वी येथे देऊळ असावे असे आसपासच्या जोत्यावरून जाणवते. तसेच पुस्तकामध्ये येथे नंदी असल्याची नोंद सुद्धा आहे परंतु वाढलेल्या गवतात ती काही सापडत नाही. पिंडीजवळ थोडावेळ बसून परत फिरायचे. संपूर्ण गडफेरी तासाभरात पूर्ण होते. सकाळपासून झोडपणाऱ्या पावसाची आणि बोचऱ्या वाऱ्याची तमा न बाळगता एका बुरुजावर उभे राहून निसर्गाचा आस्वाद घेत आम्ही अजून काही वेळ तिकडे घालवला आणि माणिकगडला निरोप दिला. सुमारे तीन-चार तासाची पायपीट, सततचा पावसाचा मारा, भूकेजलेले पोट, दमलेले शरीर घेऊन गडावर गेल्यावर एवढे अवशेष आणि निसर्गसौंदर्य पाहायला मिळाल्यावर कोण्या दुर्गप्रेमीस तिथून निघायची इच्छा होईल?
परत आल्यावर आमचे अनुभव ऐकून अनेक जण विचारतात. “का रे बाबा एवढी तणतण करायची? पावसापाण्याचे फिरायचे?” पण त्यांना कसे कळणार की हे दुर्गच आम्हाला साद घालतात. एवढी तंगडतोड केल्यावर गडावरचे भग्न अवशेष सुद्धा जिवंत होतात आणि डोळ्यासमोर त्यांचे पूर्वीचे भरभराटीचे दिवस तरळतात. असेच अजून बरेच दुर्ग साद घालतायत, बोलावतायत आम्हाला पुढच्या भटकंतीला.
ता.क. सलग दोन दिवस आम्ही पावसात भटकतोय. सांकशीच्या वाटेवर, माणिकच्या जंगलात तर पावसाने अक्षरश: झोडपून काढले होते. आमच्याबरोबर आमच्या बॅग पण पावसाला कंटाळल्या होत्या.
पुन्हा ता. क. अजून काही तास असेच भटकलो असतो तर आमच्या ढुंगणावर सुद्धा शेवाळे साठले असते.
शेवटचे ता.क. अति पावसामुळे कॅमेरा बाहेर काढणे सुद्धा शक्य होत नव्हते त्यामुळे पुढील छायाचित्रे ही फक्त नोंद ठेवण्यापुरती आहेत.
सहभागी भटके – अजय काकडे, अमित कुलकर्णी, प्रांजल वाघ, महेश लोखंडे, ध्रुव मुळे, केदार योगी.
नोंदी आणि रेखाटने – अजय काकडे
Reply