सांधण व्हॅली


“या वीकेंडला ट्रेकला जायचे” असे ठरवले कि नेमके काहीतरी कारण निघते आणि सगळ्यावर पाणी फिरते (निदान माझ्या बाबतीत तरी). नुकताच प्रचीतगड असाचहुकल्यामुळे मी अज्याला काहीच कमिट करत नव्हतो. तरी सुद्धा त्याने नेटाने “जायचेच” असे ठरवले होते. बरेच दिवसांनी (खरेतर वर्षांनी म्हणायला पाहिजे!!) स्वानंद, अजय आणि मी एकत्र ट्रेकला जाणार होतो. पण सगळे व्यवस्थित घडेल तर तो ट्रेक कसला ना? माझी काही कामं शनिवार दुपारपर्यंत लांबत गेली आणि मुख्य म्हणजे तेल-पाण्यासाठी दिलेली माझी बाईक शुक्रवारी मिळालीच नाही. त्यामुळे शनिवारी दुपारी निघायचे ठरले. अजयची चिडचिड झालीच होती. त्यातून भरीत-भर म्हणून बायकोला पटवायचे होते. बाप रे!! फार अवघड असते हे काम. शनिवारी सकाळी लवकर कामं संपवायच्या अटीवर ग्रीन सिग्नल मिळाला. आता “जायचे कुठे?” हा प्रश्न यक्षासारखा समोर उभा ठाकला. या प्रश्नाला उत्तर एकाच ठिकाणी मिळू शकते. google.com. थोडेफार सर्च झाले. सांधणची घळ, नाणेघाट अशी दोन ठिकाणे फायनल झाली. नाणेघाट तर सर्वपरिचित आहेच. सांधणबद्दल पंकज शिवाय कोण चांगले सांगू शकेल? लगोलग त्याच्याशी मेला-मेली झाली. त्याचा ब्लॉग वाचून काढला. सांधण डोक्यात फिट्ट झाले. शनिवारी सगळी कामे भराभरा संपत गेली. शिवाय बुडाखाली चार चाके पण मिळाल्यामुळे बाईकवर जायचा त्रास वाचला. अजय आणि स्वानंद घरी पोहोचेपर्यंत १ वाजला. ट्रेकचा सापडेल तेवढा संसार गोळा केला गाडीत कोंबला आणि एकदाचे आम्ही बाहेर पडलो.

सांधणच्या वाटेवरून कुलंग आणि मदन किल्ला
सांधणच्या वाटेवरून कुलंग आणि मदन किल्ला

सांधण मधून रतनगड
सांधण मधून रतनगड

अजय आणि स्वानंदच्या पोटातील कावळ्यांचे हत्ती झालेले, जवळचे म्हणून “लवंगी मिरची” समोर गाडी उभी केली. चिकन चापता-चापता सांधणबद्दल गप्पा झाल्या. अजयच्या “ट्रेकानुभावी” मनाला समजावून एकदाचे निघालो. डेस्टीनेशन सांधण. बराच लांबचा पल्ला होता. वाटेत डझनभर केळी घेतली आणि साडेपाचला संगमनेर असे टार्गेट ठेऊन नाशिक रोड पकडला. मजल-दरमजल करत संगमनेर गाठायला आम्हाला ६ वाजले. आता पुढे अकोले-राजूर-शेंडी-साम्रद असा दोन-अडीच तासाचा रस्ता. वाटेत अकोल्यात शिवजयंतीच्या मिरवणुका जोरदार चालू होत्या. ट्रक्टर-ट्रॉलीच्या मागच्या बाजूला महाराजांची छोट्यात छोटी मूर्ती अणि पुढच्या बाजुस माणुससुद्धा दिसणार नाही एवढ्या उंचीची स्पीकरची भिंत. कोंबडी पळाली, रिक्षावाला वगैरे भक्तिगीतांवर नाचणारे “मावळे” बघून आम्ही धन्य पावलो. मनातूनच महाराजांना वंदन करून राजूरच्या दिशेने निघालो. वाटेत राजूरमध्ये गाडीत पोटात “त्याल” आणि आमच्या घशात एक-एक कटिंग ओतले. शेंडी गावातशिरतानाच काही भक्तगण “अमृतप्राशन” करून कुणाच्याही भक्तीत “टल्लीन” होऊन चालताना दिसले. एका हॉटेलच्या कट्ट्यावर असाच एक भक्तगण ध्यानावस्थेत बसला होता. एका सरळ रेषेत चालणाऱ्या व्यक्तीस गाठून त्याला साम्रदचा रस्ता विचारून घेतला. हरिश्चंद्र-कळसुबाईच्या घनदाट जंगलातून जाताना आमची तोंडे आपोआप गप्प झाली. बिबट्याचा वावर असलेला हा प्रदेश. त्यामुळे  बिबट्याचे दर्शन घडेल अशी अपेक्षा करत आम्ही उडदावणे  गावात पोचलो. उजवीकडे आडव्या अंगाचा अलंग दिसत होता. गावातल्या शाळेशेजारी गाडी लावली. थोडी लाकडे गोळा करून अजयने चूल पेटवली. मस्त गरम-गरम सूप आणि “maggie” खाल्ली. तिथेच मग आमची “night photography” झाली. एक तासभर कॅमेराला दमवून टेंटमध्ये शिरलो.

अजस्त्र सह्याद्री
अजस्त्र सह्याद्री

साम्रद गाव
साम्रद गाव

रविवारी पहाटेच आम्ही साम्रदच्या रस्त्याला लागलो. वाटेत एका “लई भारी” स्पॉट वर थांबलो. आमचा आचारी उर्फ अजयने  चुलीशी बराच वेळ झगडून “आल्याचा चहा” बनवला. सूर्योदयाच्या वेळी आकाशात मस्त रंग पसरले होते. तिथे थोडावेळ आमची कला पाजळून आम्ही साम्रदला पोचलो. गाडी पार्क करून निघेपर्यंत P@P मधला एक मित्र भेटला. श्रीकांत. चला चांगलीच सोबत झाली. गावामध्ये यशवंत बांडे यांच्या घरी चहा घेऊन आणि दुपारच्या जेवणाची ऑर्डर  देऊन आम्ही सांधणच्या दिशेने निघालो.  श्रीकांतबरोबर P@P चा अजून एक गडी होता. गिरीश. दोघांनापण फोटोग्राफीची आवड. त्यामुळे आमचा चांगलाच वेळ जात होता.  पाण्यातील प्रतिबिंब, गव्हाची शेते, घरे, सोनपंखी (ladybug) वगैरेचे फोटो काढत आम्ही निघालो होतो. श्रीकांतला सांधणची “so called” वाट माहित होती. त्यामुळे आम्ही त्याला वाटाड्याच बनवला होता. पण त्याने एक उच्च जागा दाखवली. मिनी कोकणकडा. सांधणच्या अगदी लगतच.

समृद्ध निसर्ग
समृद्ध निसर्ग

डावीकडे आकाशात घुसलेला रतनगड आणि त्याचा खुट्टा सुळका. खाली हजार फुट खोल दरी आणि कोकणातली छोटी छोटी गावे. दरीतून वर येणारा भन्नाट वारा. समोर आपली अवाढव्यता दाखवणारा आजा उर्फ आजोबा. पुढच्या वेळी इथेच टेंट टाकायचा ठरवून आम्ही सांधणच्या मुखाकडे निघालो. पंधरा-एक मिनिटे चालून आम्ही सांधणच्या प्रसिद्ध घळीत शिरलो. सांधणची घळ म्हणजे पठाराला पडलेली प्रचंड मोठी भेग आहे.  मोठमोठ्या खडकातून वाट काढत आम्ही आत शिरत होतो. बाहेरच्या पेक्षा आत बरेच थंड होते. एके ठिकाणी तर आमचा रस्ता पाण्याने अडवला होता. पाण्यातून जाण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता. शेवटी फक्त कॅमेरा घेऊन आम्ही पाण्यामध्ये उतरलो. बाप रे!!! बर्फाहून थंड पाणी. त्यातून ते छातीपर्यंत आलेले. पावसाळ्यात इथे येणे म्हणजे मूर्खपणाच ठरणार. शक्य तेवढे लवकर पाण्यातूनबाहेर पडलो. आम्ही जसजसे आम्ही पुढे जात होते तशी ही घळ अरुंद होत चाललेली. फक्त काही ठिकाणीच प्रकाशाची तिरीप येत होती खाली. थोडाफार क्लीच्क-क्लीच्काट झाला. घळीच्या तोंडापर्यंत पर्यंत गेलो. तिथून दिसणारा “व्हू” म्हणजे कमाल!!! घळीत एक-दोन तास घालवून आम्ही साम्रदला परत आलो. यशवंत बांडेनी सांगितल्या प्रमाणे जेवण तयार ठेवलेच होते. चटकदार कालवण आणि भाकरी. वाह.. त्यानंतर हातसडीच्या तांदळाचा भात. सुख. असे सुंदर जेवल्यावर ढेकर आला नाही म्हणजे नवलच.. थोडा वेळ गप्पा-टप्पा मारून, नंबरची देवाण-घेवाण करून आम्ही रतनवाडीच्या रस्त्याला लागलो. रतनवाडीचे अमृतेश्वर मंदिर खूप पुरातन आहे. अतिशय सुरेख कोरीवकाम आणि काळ्या दगडातील हे मंदिर बघताना   मन प्रसन्न होऊन जाते. तिथे परत एकदा आमचे कॅमेरे आणि ट्रायपॉड बाहेर आले. एक तासभर वेळ काढून आम्ही सूर्यास्ताच्या वेळी रतनवाडी सोडली. रतनवाडी-शेंडी रस्ता म्हणजे भंडारदऱ्याच्या पाण्याला वळसा. मागे रतनगडाच्या मागे सूर्य अस्तास गेलेला दिसत होता.

सांधणच्या आत मध्ये
सांधणच्या आत मध्ये

परत येताना आम्ही वेगळा रस्ता निवडला होता. कोतूळ-ब्राह्मणवाडा-बोटा-आळे फाटा. दिवस मावळल्यामुळे आम्हाला या रस्त्याचा आनंद घेता आला नाही. फक्त प्रवासाचा अर्धा-एक तास वाचला एवढेच कौतुक. एक अविस्मरणीय, उच्च, लई भारी ट्रेक चा अनुभव घेऊन आम्ही परत पुण्यात शिरलो.

अमृतेश्वर मंदिर, रतनवाडी
अमृतेश्वर मंदिर, रतनवाडी

काही उपयुक्त माहिती:
कसे जाल? पुणे-संगमनेर-अकोले-राजूर-शेंडी-उडदावणे -अप्पर भाटघर धरण-साम्रद
पुण्याहून अंतर – अंदाजे २३० किमी.
राहण्याची सोय – साम्रद (मारुती मंदिर), उडदावणे (शाळेमध्ये)
खाण्याची सोय – साम्रद मध्ये जेवण्याची सोय होते.
पूर्णपणे दोन दिवस दिल्यास रतनगड सुद्धा पाहता येतो. साम्रदहून रातान्गादास जाता येते. तसेच रतनवाडीहून सुद्धा शिडीची वाट आहे. परतीच्या वाटेवर रतनवाडीचे पुरातन अमृतेश्वर मंदिर नक्की बघा.
शिवाय पुण्यास येण्याचा वेळ वाचवण्यासाठी एक वेगळा रस्ता राजूर पासून कोतूळ मार्गे. कोतूळ-ब्राह्मणवाडा-बोटा-आळे फाटा.

One response

  1. >Mastch re !!! Zakkas lihila ahes. Sandhan valley cha ajun thoda varnan yeudyaat bhaannat watate ahe wachatana.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *