गेले काही महिने ट्रेकिंग आणि भटकंतीपासून लांबच होतो. छोट्या पिल्लू बरोबर खेळून एवढी दमछाक होते की परत वेगळी दमछाक करून घ्यायला गडकिल्ले पाहायला जायचे होते नव्हते. पण अंतरीची ओढ वेगळेच सांगत होती. निदान एक दिवस का होईना आमच्या गुरूला भेटायला तरी जायलाच हवे. शेवटी मना(न्या)चा कौल घेतला आणि बेत ठरला. अशावेळी भिडू जमायला वेळ लगत नाही. उलट एखादा नवीनच साथीदार मिळून जातो. जसे यावेळी सिद्धार्थ जोशी नामक कसलेला भिडू सोबत आला. जवळपासचा म्हणून किल्ले मानगड बघायचे ठरले. आणि वेळ मिळेल तसा अजून एखादा तळा, घोसाळा पैकी करायचे पक्के केले.
रविवारी पहाटे लवकरच निघालो. नाहीतर एकदा उन्हं डोक्यावर आली की चढाई जीवावर येते. किल्ले मानगड हा रायगडच्या प्रभावळीतील एक किल्ला. म्हणजे मुख्य किल्ल्याचा सहाय्यक गड. ताम्हिणी घाट उतरून गेले निजामपूर गाव लागते. येथून रायगडच्या पायथ्याचे गाव पाचाड कडे जाणारा एक फाटा फुटतो. या रस्त्याने जाताना बोरवाडी गाव लागते. बोरवाडी गावातूनच मानगडच्या पायथ्याचे मशीदवाडी गावाकडे जायची वाट फुटते. सध्या गावकऱ्यांनी वाटेवर ठिकठिकाणी “विन्झाई देवीच्या मानगडकडे” अश्या पाट्या बसवल्याने रस्ता चुकायची सोयच राहिली नाहीये. मशीदवाडी हे अगदी छोटे गाव. मोजून पन्नास घरट्याचे. गावाच्या अगदी पाठीशीच छोट्या टेकडीवर किल्ले मानगड दिमाखात उभा आहे. शाळेच्या पाठीमागे जाणारी पायवाट पकडून चढाई सुरु करायची आणि दम लागेपर्यंत अर्ध्या वाटेवरच्या विन्झाई मंदिरात थांबायचे. घड्याळात वेळ लावून चढाई सुरु केली असेल तर दहाव्या मिनिटाला विन्झाईच्या चरणी डोके ठेवायला पोहोचू असा मानगडचा चढ. गर्द झाडीमध्ये बांधलेल्या या मंदिरात विन्झाई देवीची शस्त्रसज्ज मूर्ती आहे. मंदिरासमोर काही फुटक्या वीरगळ आहेत तर एक दगडी रांजणसुद्धा आहे. गडावर मुक्कामाच्या दृष्टीने ट्रेकर मंडळींसाठी हे मंदिर अतिशय योग्य ठिकाण. हे मंदिरामागून गडावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. पन्नास एक पायऱ्या चढून गेल्यावर मानगडचा गोमुखी बांधणीचा मुख्य दरवाजा लागतो. दरवाज्याचे दोन्ही बुरुज सुस्थितीत असून कमान मात्र ढासळली आहे.
दरवाज्यातून आत गेल्यावर एक पायवाट डावीकडे जाते. ही वाट मानगडच्या गुहेकडे घेऊन जाते. बाहेरून जरी छोटी वाटत असली तर गुहेचा आतील भाग बराच प्रशस्त आहे. कदाचित या गुहेचा उपयोग इतिहासकाळात धान्यकोठार म्हणून होत असावा. गुहेसमोर पाण्याची दोन खोदीव टाकी आहेत. टाक्यातील पाण्यावर झाडाचा कचरा जरी पडला असला तरी पाणी पिण्यायोग्य आहे. आल्या वाटेने परत दरवाज्यापाशी जाऊन दुसरी पायवाट पकडायची. या वाटेने आपण गडाच्या माथ्यावर पोहोचतो. येथे एका पीराचे स्थान दृष्टीस पडते. गडाच्या सर्व बाजूने पाण्याची बरीच टाकी खोदलेली दिसतात. दक्षिणेच्या बाजूस एक मोठे पटांगण असून येथे एक चोर दरवाजा सुद्धा दिसतो. परंतु येथून खाली उतरणारी कोणतीही वाट दृष्टीस पडत नाही. गडावर बाकीचे फार अवशेष नसले तरी पाण्याची पुष्कळ टाकी, प्रशस्त गुहा, सुस्थितीतील बुरुज, आणि दरवाज्याच्या कमानीवरील माश्याचे शिल्प यामुळे खूप काही पाहिल्याचे समाधान मिळते. शिवाय गडावर फिरताना एक गोष्ट नक्कीच जाणवते. स्वच्छता. “दुर्गवीर”या दुर्ग संवर्धनासाठी काम करणाऱ्या संस्थेच्या मावळ्यांनी येथे केलेले काम वाखाणण्याजोगे नक्कीच आहे. मानगडची निर्मिती ही स्वराज्याची राजधानीचा उपदुर्ग म्हणूनच झाली असल्याने मानगड कायमच रायगडचा पाठीराखा म्हणून उभा ठाकला आहे. गडफेरी पूर्ण करून परत आल्या वाटेने खाली उतरायचे.
मशीदवाडी मधून बाहेर पडताना गावाबाहेरचे उध्वस्त शिवमंदिर पाहायला मात्र विसरू नका. प्रचंड मोठ्या चौथऱ्यावर कधीकाळी दिमाखात उभे असणाऱ्या या मंदिराची आजची ही उघडी-बोडकी अवस्था पाहिली की मन हेलावते. आसपास विखुरलेले कोरीव कामाचे दगड, उन्हं-पावसाशी उघड्यावर एकट्याने झुंजणाऱ्या नंदीची घडण पाहिली की हे मंदिर हेमाडपंथी असावे अशी दाट शंका येते.
अजूनही बराच वेळ असल्याने आम्ही जवळचाच तळागड पहायचे ठरवले. तळागडला जाण्यासाठी आधी गोवा रस्त्यावरचे इंदापूर गाव गाठायचे. येथून तळा गावाकडे जाणारा फाटा लागतो. मुख्य रस्त्यापासून तळा गावात पोचायला अर्धा तास पुरतो. गावाच्या मागेच एका टेकडीवर तळागडाची निर्मिती केली आहे. तीन टप्प्यात विभागलेला हा गड गावातून अगदीच अवाढव्य दिसतो. दुरून उंच वाटत असला तरी गावातून गडाच्या अर्ध्या वाटेवर डांबरी रस्ता जातो. येथून एक पायवाट डावीकडे जात सरळ गडाला जाऊन भिडते. ही मळलेली पायवाट १५ मिनिटात गडाच्या माचीसदृश पहिल्या टप्प्यावर घेऊन येते. येथे तटबंदीचे आणि जोत्याचे थोडेफार अवशेष दिसतात. हीच पायवाट गडाचा मुख्य डोंगर डावीकडे ठेवत वळसा मारून परत गडाकडे येते. येथून कातळात खोदलेल्या पायऱ्यांनी गडाच्या दरवाज्यापाशी जायचे. दरवाजा सद्यस्थितीत ढासळला असला तरी खांब मात्र शिल्लक आहेत. येथेच कातळात कोरलेली हनुमानाची एक मूर्ती आहे. तर दरवाज्या जवळ बाहेरच्या बाजूस एक टाके खोदलेले दिसते. आतल्या बाजूस देवडीचे भग्न अवशेष दिसतात. हा गडाचा दुसरा टप्पा. पुढे कातळाला वळसा मारून गेले की तिसऱ्या टप्प्याकडे जाणारा पायऱ्यांचा मार्ग लागतो. पायऱ्यांच्या या वाटेला डाव्या बाजूस भक्कम तट बांधला आहे. ठिकठिकाणी जंग्यासुद्धा आहेत. तसेच एक भलामोठा अर्धा गोलाकार बुरुज सुद्धा वाटेत आडवा येतो. पायऱ्या चढून वर गेले की गडाचा मुख्य दरवाज्याची जागा लागते. येथून वर गेलो की गडाचा माथा म्हणजेच तिसरा टप्पा लागतो. गडमाथ्यावर गेल्यावर उजवीकडे एक मोठा चौथरा आणि भक्कम बांधणीचा दुमजली बुरुज दिसतो.
पण आपण आधी डावीकडे जायचे. कातळात खोदलेली भली मोठी टाकी पाहिल्यावर आश्चर्यच वाटते. टाक्यांपलीकडे जोत्यांचे काही अवशेष दिसतात तर पलीकडे उत्तरेकडे निमुळती होत जाणारी भक्कम तटबंदी आहे. या तटबंदीच्या शेवटी एक बुरुज असून येथून कोकणचे दृश्य फारच सुंदर दिसते. या निमुळत्या भागात सुद्धा सात टाकी खोदलेली आहेत. शिवाय एक आडोसा नसलेले महादेवाचे मंदिर. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथील पिंड इतर पिंडीसारखी गोलाकार नसून चौकोनी आहे. आजही सुस्थितीत असलेली ही तटबंदी आणि बुरुज पाहून पुन्हा मागे यायचे आणि दक्षिणेला असलेला दुमजली बुरुज पहायचा. बुरुजावर जाण्याचा जिना चांगला असला तरी अतिशय काळजीपूर्वक वर चढावे. हा छोटेखानी गड भरपूर अवशेष असल्याने एक वेगळाच आनंद देतो. गडाच्या बांधणीवरून उपलब्ध जागेचा पुरेपूर वापर करून गड भक्कम आणि लढाऊ करण्याचा पूर्ण प्रयत्न दिसून येतो. गडाचा इतिहास पाहता १६५७ साली महाराजांनी या गडाचा कब्जा घेऊन स्वराज्यात सामील केल्याचे उल्लेख आढळतात.
तळागड पाहूनसुद्धा वेळ असल्याने आम्ही जवळच असलेली बौद्ध लेणी पहायचे ठरवले. तळा-मांदाड रस्त्यावर कुडा गावाच्या हद्दीतील टेकडीवर ही लेणी दोन टप्प्यात कोरलेली आहेत. मांदाड गावाच्या थोडे अलीकडे कुडा लेण्यांकडे जाणारा कच्चा रस्ता डावीकडे जातो. सुमारे दोन किमी गेल्यावर कुडा लेण्यांचे सुखद दर्शन होते. गर्द झाडीमध्ये लपलेली ही लेणी फारच सुंदर आहेत. पुरातत्व खात्याने लेणी परिसराची अतिशय चांगल्या रीतीने देखभाल ठेवली आहे.
एकूण २६ विहार असलेली ही लेणी दोन टप्प्यात कोरलेली आहेत. यातील १५ विहार पहिल्या टप्प्यात तर उरलेले दुसऱ्या टप्प्यात आहेत. पहिल्या टप्प्यात ५ चैत्यगृहे आहेत. मुख्य विहाराच्या प्रवेशद्वारावर प्रचंड मोठे हत्ती कोरलेले आहेत तर आत गौतम बुद्धाची अतिशय सुंदर मूर्ती आहे. शिवाय पूर्णाकृती स्त्री-पुरुषाच्या मूर्ती सुद्धा पाहण्यासारख्या आहेत. एकेक विहार पाहता-पाहता कसा वेळ जातो ते कळतच नाही. दिवसाचा पूर्ण शिणवठा लेण्यांच्या धीरगंभीर शांततेत विरून जातो आणि एखाद्या विहारामध्ये आडवे पडल्यावर डोळ्यांवरचा ताणसुद्धा. जर तुमच्याजवळ वेळ असेल तर सूर्यास्त होई पर्यंत लेण्यामध्ये जरूर थांबा. पश्चिमेला राजापूरच्या खाडीवर होणारा सूर्यास्त तुम्हाला नक्कीच सुखावेल.
आम्ही भटके सह्याद्रीला गुरु मानतो आणि गुरुला भेटायला गेलो की आपण कधीच रिकाम्या हाताने परत येत नाही. आमच्या या छोट्या भटकंतीत सुद्धा सह्याद्रीने आम्हाला बरेच काही दिले. मानगडचा पाठीराखेपणा, तळागडचा भक्कमपणा आणि कुडा लेण्यांचा धीरगंभीरपणा.
Reply