साताऱ्यापासून हाकेच्या अंतरावर म्हणजे पुणे-सातारा रस्त्यावर डावीकडे “लिंब” गाव आहे. कृष्णा नदीच्या काठावर वसलेल्या या गावात अनेक घाट आणि मंदिरे आहेत. यामध्ये विष्णू-लक्ष्मी, मुरलीधर, रामेश्वर ही काही मुख्य मंदिरे. रामेश्वर मंदिराच्या शेजारी अजून एक छोटे मोडकळीस आलेले मंदिर आहे. या मंदिरामध्ये १८ व्या शतकातील भित्तीचित्रे आहेत पण मंदिरातील मूर्ती गायब आहे. लक्ष्मी-विष्णू मंदिर हे तटबंदी युक्त आहे. मंदिरातील लाकडी मंडप आणि नक्षीकाम पाहण्यासारखे आहे. लिंब गावात हे सगळे जरी असले तरी खरं पाहण्याजोगे ठिकाण आहे इथली प्रसिद्ध “बारा मोटांची” विहीर. ही विहीर पाहताना थक्क व्हायला होतं, म्हणजे ही विहीर आहे कि भुयारी राजवाडा असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.
संभाजीराजे यांचे सुपुत्र शाहु महाराज (पहिले शाहु महाराज) यांच्या काळात या विहिरीचे बांधकाम शके १६४१ ते १६४६ या दरम्यान सौ. वीरुबाई भोसले यांनी केले. या विहिरीची खोली ११० फूट असून व्यास साधारण ५० फूट आहे. लिंब गाव परिसरात सुमारे ३०० झाडाच्या आमराईच्या पाणी व्यवस्थेसाठी ही विहीर बांधली.
विहिरीमध्ये उतरायला भव्य कमानीतून पायऱ्या आहेत. आणि आत उतरण्यास दोन बाजूने वाटा आहेत. या विहिरीवर पंधरा मोटा बसवण्याची सोय असून प्रत्यक्षात बारा मोटा एका वेळी चालत असत असे म्हणतात. आजही येथे बारा मोटेचे बारा चौथरे नजरेस पडतात. मुख्य विहीरचा आकार अष्टकोनी असून त्यास जोडून आयताकृती उप विहीर आहे. या दोन्ही विहिरींना जोडणारी इमारत म्हणजे चक्क एक छोटेखानी महालवजा सज्जा आहे. मुख्य प्रवेश जिथून होतो त्या कमानी वर मोडी भाषे मध्ये लिहिलेला शिलालेख देखील आहे.
पायऱ्या उतरून आपण खाली महालाच्या तळमजल्यावर जावून पोहोचतो. या सज्जामध्ये मध्यभागी कोरीव खांब आहेत, प्रत्येक खांबावर वेगवेगळी शिल्पे आहेत. गणपती, हनुमान यांची शिल्पे त्याखाली गजारूढ महाराजांचे शिल्पचित्र. खांबाच्या दुसऱ्या बाजूस अश्वारूढ महाराजांचे शिल्प कोरलेले आहे, तर त्यावरील बाजूस नक्षीदार फुले. या सज्जातून मुख्य दरवाजाकडे पाहिल्यास दरवाजावरील कमानीशेजारी दोन शरभ शिल्पे कोरलेली दिसतात. मुख्य आकाराच्या विहिरीच्या आतील बाजूस वर चार शरभ (वाघांची) शिल्पे आहेत. यातील दक्षिणेकडील दोन शरभ पायात दोन-दोन असे चार हत्ती घेऊन आहेत तर उत्तरेकडील दोन शरभ आकाशात झेपावत आहेत. या शरभशिल्पांचा थोडक्यात अर्थ असा की (महाराजांचा) दक्षिणदिग्विजय झाला आहे आहे आता उत्तरदिशाही स्वराज्यात घेणार. एवढे सगळे अवशेष पाहून सज्जाच्या छतावर आलो की सिंहासनाची जागा आणि समोर सभेसाठी बैठक व्यवस्था केलेली आहे. प्रतापसिंह महाराज मसलती आणि खलबते करण्यासाठी या सज्जाचा वापर करत असत.
इंग्रज काळात या गावात सातारकर छत्रपती प्रतापसिंह महाराज यांना दोन महिने नजर कैदेत ठेवले होते. गावात सौ. वीरुबाई साहेब यांचा वाडा देखील होता.
लिंब गावाला भेट देऊन सातारा रोड स्टेशन मार्गे कल्याणगड उर्फ नांदगिरी चा किल्ला जवळ करता येईल.
कसे जाल:
पुण्यापासून सातारा रस्त्यावर साधारण १०० किमी अंतरावर डावीकडे ‘लिंब फाटा’ लागतो. हा फाटा आनेवाडी टोलनाक्या-पासून तीन किमी पुढे आहे. मुख्य स्त्यापासून आत दोन किमी आत लिंब गाव असून येथून पुन्हा दोन किमी अंतरावर उजवीकडे शेरी नावाचा परिसर आहे. येथेच ही विहीर पहावयास मिळेल.
रवी वर्णेकर हे गृहस्थ आपल्या कुटुंबासमवेत आज या विहिरीची देखभाल करतात.
माहिती साभार – रवी वर्णेकर, राहुल बुलबुले, रोहित पवार.
Reply