चला कॅम्पिंगला…

सध्या सोशल नेटवर्कींग साईटसमुळे भटकंतीच प्रचंड आकर्षण निर्माण झालंय. गड किल्ले, जंगल सफारी, ऐतिहासिक ठिकाणे अजून काय काय. यातच एक भर पडत आहे ती कॅम्पिंगची… शहराच्या गोंगाटापासून लांबवर एखादी रात्र मित्रांसमवेत किंवा कुटुंबासमवेत तंबू ठोकून घालवायला कोणाला नाही आवडणार??

एखाद्याा तळ्याच्या काठी तंबू ठोकून, सूर्यास्ताच्या वेळी होणारी रंगांची उधळण पाहण्यातली मजा काही औरच. मग त्यावेळी निसर्गाच्या तालावर कधी आपले सूर फुलून येतात तर कधी गप्पांचे फड जमतात. रात्रीच्या निरभ्र आकाशातील असंख्य ताºयांच्या साक्षीने कित्येक संगीत रजनीसुद्धा खुलतात. अशावेळी सर्वांच्या मदतीने बनलेली खिचडी आणि चहासुद्धा एक वेगळीच चव देऊन जातो. पंख्याशिवाय लागलेली झोप पुढे कित्येक रात्री तुम्हाला आठवत राहील. आणि पहाटे कोणत्याही गजराशिवाय जाग येणार हे नक्की. पहाटेचा सुखद गारवा, पाखरांची किलबिल अशा अनेक गोष्टी झोपेतून जागे करायचे काम सहज करतील.

कॅम्पिंगमध्ये आपल्याला निवांत क्षण मिळतातच, पण अजून बºयाच गोष्टी आपल्याला मिळवता येऊ शकतात. जिथे कॅम्पिंगसाठी जाणार त्या भागाची माहिती घेऊन तिथल्या लोकांबरोबर जिव्हाळा वाढवता येऊ शकतो. आसपासची भौगोलिक आणि नैसर्गिक माहिती आपल्याला बरेच काही शिकवू शकते. एकप्रकारची बिनभिंतींची शाळाच म्हणावी लागेल.

कॅम्पिंग करणे म्हणजे काही साहस करण्यासारखे असे काहीच नाही. एक वेगळ्याप्रकारे केलेला प्रवास आणि भटकंती एवढाच काय तो फरक. आपल्या शहरांच्या आसपास अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे कॅम्पिंगची सगळी सोय केली जाते. किंवा आपल्याच मित्रांच्या शेतामध्ये किंवा गावाकडच्या घरी सुद्धा आपल्याला कॅम्पिंगचा आनंद घेता येऊ शकतो.

कॅम्पिंग कोठेही करु शकतो. पण यापूर्वी त्या ठिकाणी जाऊन आलेला एखादा भिडू सोबत असेल तर उत्तम. शक्यतो गावाच्या जवळ राहावे. अडअडचणीला त्यांची गरज भासू शकते. पाणी जवळ असणे अत्यंत आवश्यक आहे. गावाजवळ राहताना ग्रामस्थांना तशी कल्पना द्याावी. काही गावात आपली जेवणाखाण्याची सोयदेखील होवू शकते. कॅम्पिंगसाठी सर्वात महत्त्वाचा आहे तो म्हणजे तंबू. हल्ली बाजारात वजनाने हलके, पण मजबूत असे आणि सहजगत्या वापरता येतील असे तंबू उपलब्ध आहेत. त्याचबरोबर ॠतुमानानुसार स्लीपींग बॅग अथवा अंथरुण पांघरुण सोबत असावे.

आठवड्याचा सगळा शीण घालवायला म्हणून सुट्टीच्या दिवशी बाहेर पडून गर्दीच्या ठिकाणी मौल्यवान दिवस वाया घालवण्यापेक्षा निसर्गाच्या अगदी जवळ नेणारा कॅम्पिंगचा आनंद एकदातरी घ्यावाच लागेल.

 • कॅम्पिंगमध्ये पाळावयाचे नियम:
  • आपण एका घरातून दुसऱ्या घरी राहायला जातोय असेच समजावे. आपले घर स्वछ ठेवतो तसेच निसर्गाचे घर सुद्धा ठेवले पाहिजे.
  • निसर्गाला हानी पोचेल अशी कोणतीही गोष्ट करू नये. झाडे, फुले यांनी सौंदर्य वाढते.
  • नैसर्गिक शांतता अनुभवावी, आनंद घ्यावा, ती भंग करू नये.
  • इतरांना दाखवावे म्हणून कोणतेही साहस करू नये.
  • प्लास्टिकचा वापर टाळावा.
  • सोबत नेलेली प्रत्येक गोष्ट परत आणलीच पाहिजे याची काळजी घ्यावी.
 • कॅम्पिंगची महत्वाची तयारी:
  • प्रथमोपचार किट
  • पुरेसे तंबू. साधारणपणे एका तंबूमध्ये तीनजण राहू शकतात.
  • हवामानानुसार पुरेसे कपडे, स्लीपींग बॅग.
  • टॉर्च अत्यावश्यक.
  • चांगल्या प्रतीचे शूज.
  • जेवणाची सुविधा नसेल त्याप्रमाणे जेवणाचे साहित्य.
 • कॅम्पिंगच्या काही जागा:
  • लोणावळ्याजवळील तेलबैला गाव
  • कोलाड येथे कुंडलिका नदीच्या किनारी
  • राजमाची
  • राजगड पायथा
  • भंडारदरा धरणाच्या बॅकवॉटर जवळ साम्रद गाव.
  • पवना, मुळशी, खडकवासला, वळवंड, शिरवटे धरणाच्या फुगवट्याकिनारी

सूचना

हा लेख लोकसत्ताच्या ३ फेबृवारीच्या अंकात प्रसिद्ध झाला आहे.

Posted in

Reply

Your email address will not be published. Required fields are marked *