एप्रिलचा लाँग-वीकेंड सगळ्यांचा आधीच “बुक” होता. त्यामुळे बरेच दिवसात ट्रेकचा बेत ठरला नव्हता अणि ठरतही नव्हता. अखेरीस आमच्या “अनुभवी ट्रेकरने” पुढाकार घेऊन “नाईट ट्रेक” ठरवला. तूर्तास तरी कोथळीगड ठरला होता. पण राजमाची किवा मकरंदगड हे सुद्धा खुणावत होते. नेहमीप्रमाणे मेसेज वर मेसेज सुरु झाले. “First Reminder”, “Second Reminder” वगैरे. या वेळी आमचे दुर्मिळ ट्रेक-मित्र आमच्याबरोबर येत होते. अन्या, हृषी आणि “दादोजी” उर्फ गोखले. त्यामुळे जरा जास्तच तयारी चालू होती ट्रेकची. बुडाखाली दुचाकी असल्याने उन्हे कलल्यावर निघायचे ठरले. शिवाय मी गुगल वरून कोथळीगडाचा रस्ता शोधला(?) होता पण तो प्रचलित रस्त्यापेक्षा वेगळा होता. तरीहि आम्ही (खरेतर मीच) हाच रस्ता पकडायचे ठरवले.
ट्रेकची सुरवात ठरल्याप्रमाणे चिकन खाऊन झाली. माझ्या घरी सगळे येऊन थांबले होतेच. “थोडा वेळ”, “अजून थोडा वेळ” करत निघायला साडे तीन झाले.

सकाळी दादोजीनी अपरिहार्य कारण सांगून माघार घेतली होती. त्यामुळे आम्ही पाच शिलेदार गाड्यांवर टांग टाकून एकदाचे निघालो. “गुगल” ने दिलेल्या माहितीनुसार आम्ही जुन्या मुंबई हायवेवर कान्हेफाट्याला आत वळलो. नक्की रस्ता माहित नव्हता त्यामुळे GPS वर बघत मी आणि माझ्यामागे बाकीचे निघालो होतो. वाटेत एके ठिकाणी आंबट-चिंबट कैऱ्या पाडल्या. वाह.. यंदाच्या उन्हाळ्यात आंबे जरी कमी असले तरी कैऱ्या खाऊन तोंड आंबट करत होतो. तासभर गाड्या पळवून एके ठिकाणी आमची वाट अडली म्हणून जरा चौकशी केली तर भलतीच माहिती मिळाली. येथून कोथळीगडाला जायला रस्ताच नव्हता. गुगलने आम्हाला गुगवले होते. आता? परत मागे फिरून कर्जत गाठायचे आणि तेथून प्रचलित रस्त्याने जायचे असा निर्णय झाला. म्हणजे जवळ जवळ ७५ किमीचा उगाच फेरफटका. नाहीतरी अनंत फंदींनी म्हणलेच आहे कि “बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडू नको” .

आता वेळ गेलाच होता. म्हणून लोणावळ्यात रामकृष्णमध्ये वीकेंड स्पेशल “फाकीव” दृश्ये पाहत चिकन चापले आणि कर्जतसाठी निघालो. परत चुकू नये म्हणून रस्ता विचारत आम्ही कर्जत – कशेळे मार्गे आंबिवली मध्ये पोचलो. आता पुढे पेठ हे किल्ल्याचे गाव. पण तेथपर्यंत रस्ता आहे कि नाही? रात्रीचे बारा वाजले होते. गावातल्या दोन “तट्टेल” लोकांनी सांगितले कि गाड्या वर चढणार नाहीत, रात्र गावातच काढा. पुढे डावीकडे एक हॉटेल आहे असे उजव्या बाजूला हात दाखवून सांगितले आणि ते निघून गेले. हॉटेल मालकाला उठवायची इच्छा नव्हती पण बाहेरच्या ओसरीत चाललेल्या आमच्या हळू आवाजातील चर्चा ऐकून मालक बाहेर आलाच. त्याच्या म्हणण्यानुसार रोज एक शिक्षक गडावर दुचाकी घेऊन जातो. म्हणून आम्हीही गाड्या वर न्यायचे ठरवले. साधारणपणे २-३ किमीचा रस्ता. एक-दोन वळणे जरा ठीक होती पण नंतर मात्र रस्त्याने रंग दाखवला. आधीच कच्चा रस्ता त्यातून मातीने भरलेला. गाडीची चाके जागच्या जागी फिरू लागली. हो नाही करत, ढकलगाडी करत गाड्यांनी आमचा घाम काढला. शेवटी जिथे जागा मिळेल तिथे थांबायचे ठरले. जरा वर गेल्यावर एक सपाटी दिसली आणि आमचे “माउंटन बाइकिंग” थांबले. समोर गडाचा सुळका दिसत होता आणि पायथ्याला पेठ मधले दिवे. सगळ्यांचे अंग आता बोलायला लागले होते. आपापल्या पथाऱ्या पसरून सगळे आडवे झाले. माझा “स्टार-ट्रेल” चा एक प्रयत्न झाला पण ढगांमुळे शक्य झाले नाही. डोळ्यांवर झोप असतानाच शेजारच्या झुडुपात खुसपूस झाली. डोळ्यात बोटे घातले तरी काही दिसत नव्हते. टॉर्च फिरवल्यावर दोन डोळे चमकले. सगळ्यांची झोप उडाली. तेवढ्यात शेजारी अजून दोन डोळे चमकले. आमच्याबरोबर एक कुत्री (स्वानंद ने तिचे नाव लक्ष्मी ठेवले आहे) खालपासून आली होती. ती मात्र शांतपणे आमची मजा पाहत होती. जणू तिला न काही देणे न काही घेणे. समोरच्या झुडुपात खुसपूस वाढतच होती. शेवटी जरा पुढे जाऊन बघितले तर काही “म्हश्या” रात्रीच्या एक वाजता चरत होत्या. आम्ही चरफडत परत आडवे झालो. त्यानंतर लक्ष्मी रात्रभर त्या “म्हश्यांना” आमच्यापासून दूर ठेवायचे काम करत होती.

रात्री ढगांमुळे मस्त गार पडले होते सगळे. सकाळी आमच्या आचाऱ्याची चहाची तयारी सुरु झाली. त्याने बनवलेल्या रेडीमेड चहाने वेळ मारून नेली. लगेच आवरआवर करून आम्ही गडाकडे निघालो. पुढच्या १० मिनिटात पेठ गाव आले. श्रीकांत सावंत यांच्याकडे सामान ठेवले. त्यांच्या अंगणात तोफेचा पंचधातूचा एक तुकडा आहे. वजन तीनशे ते साडे तीनशे किलो. गडावरून हा तुकडा चोरून नेणाऱ्या दोन चोरांना पकडून गावातल्या लोकांनी तो तिथे आणून ठेवला होता असे सांगतात. आमच्यापैकी पैलवान गडी म्हणजे स्वानंदचे तो तुकडा नुसता हलवून शक्तीप्रदर्शनसुद्धा झाले. असो. गडावर जायचा रस्ता चुकण्यासारखा नाहीये. गावकऱ्यांनी गडावरून पाणी खाली आणले आहे. तोच पाण्याचा पाईप जवळ करून चढायला सुरवात करायची. पुढच्या अर्ध्या तासात आपण वर पोहोचतो. गडावर पाहण्यासारखी ठिकाणे म्हणजे पडका दरवाजा, काही कोरीवकाम केलेल्या गुहा, खूप सारी पाण्याची टाकी आणि मुख्य आकर्षण म्हणजे गडाच्या सूळक्याच्या पोटात वर जाण्यासाठी खोदलेल्या पायऱ्या. गडावर पोचेपर्यंत आमच्याकडचे पाणी संपले होते. पण वरच्या टाक्यातील थंडगार पाण्याने फारच दिलासा दिला. गडावर ४ खोदीव गुहा आहेत. त्यातील सर्वात मोठ्या गुहेमधील खांबांवर अतिशय सुंदर कोरीवकाम केले आहे. शिवाय काही हिंदू देवतांच्या मूर्ती सुद्धा कोरलेल्या येथे आढळतात. या गुहेमध्ये ३०-३५ जण आरामात राहू शकतात. शेजारीच एक छोटेखानी मंदिर आहे आणि त्याला लागुनच पाण्याचे टाके. तसे गडावर भरपूर पाण्याची टाकी आहेत पण या टाक्यातील पाणी पिण्याच्या लायकीचे. गुहेच्या आणि देवळाच्या मधून सुळक्याच्या वर जायचा कातळात खोदलेल्या पायऱ्यांचा मार्ग आहे. वरून दूरपर्यंत दिसणारा परिसर पाहून डोळे सुखावून गेले. माथेरानचे भलेमोठे पठार, भीमाशंकरचा उंच डोंगर, नागफणी, तुंगीचा किल्ला, म्हैसमाळ अशा एकापेक्षा एक उंच डोंगरांनी कोथळीगडाचा परिसर वेढलेला आहे. पण या सगळ्यात उठून दिसतो तो पदरचा किल्ला. सह्याद्रीचा हा सुंदर देखावा नजरेत साठवून आम्ही परत फिरलो. मोठ्या गुहेत विश्रांतीसाठी थांबलो. परत एकदा टाक्याचे पाणी पिऊन तहान भागवली आणि किल्ला उतरून गावात आलो. सावंतांनी मस्त कांदापोहे आणि पन्हे तयार ठेवलेच होते. वाह.. विशेष म्हणजे लक्ष्मी आमच्या बरोबर पूर्ण वेळ फिरत होती. तिला बक्षीस म्हणून खायला “Hide & Seek” ची बिस्किटे दिली. ट्रेक करून तीसुद्धा दमली होती ना!
तासभर आराम करून आम्ही गाव सोडले. आता परत एकदा “माउंटन बाइकिंग” करत पायथ्याला पोचायचे होते. पण उतरताना गाडीला फार कष्ट पडले नाहीत. १५-२० मिनिटात आम्ही गड उतरून आंबिवलीत पोचलो होतो. परतीच्या वाटेवर उन्हामुळे ठिकठिकाणी थांबावे लागत होते. लोणावळ्यात थांबून पोटपूजा केली. आता पुढचा स्टॉप घरी, असे ठरवून पुण्याच्या दिशेने गाड्या सुसाट सोडल्या. सगळी अडथळे पार करून ट्रेक भारी जरी झाला असला तरी माझ्या मनाला रुखरुख मात्र लागून राहिली होती. “गुगल ने गुगवले.”
Reply