नमस्कार मित्रांनो. गुडघेदुखी मुळे गेले काही महिने घरातच बसून राहावे लागले होते. शेवटचा ट्रेक तर कधी झाला हेच विसरून गेलो होतो मी. त्यातच गेल्या महिन्यात मला कन्यारत्न झाल्याने ट्रेक अजूनच लांबले होते. शेवटी बायको माहेरवासास गेल्याने माझा बोम्बल्या फकीर झाला होता. उन्हाने यंदा तर उत आणला होता. पुण्यात तर पारा ४२ अंशापर्यंत गेला होता. त्यामुळे उन्हामध्ये भटकायला जाणे जीवावर आले होते. चातकासारखी किंवा त्याच्याहून जास्त आतुरतेने सर्व ट्रेकर मंडळी पावसाची वाट पाहत होती. ट्रेकरलोकांच्या दुष्काळात तेरावा महिना म्हणजे यंदा वळवाच्या पावसाने सुद्धा पाठ फिरवली होती. त्यामुळे घरात “छ.बो.” करून पडण्याशिवाय काही पर्याय नव्हता.
मे महिना संपायला आला तसा वर्तमानपत्रात बातम्या येऊ लागल्या. मॉन्सूनची वाटचाल समाधानकारक. वगैरे. त्याबरोबरच आमचे नेहमीप्रमाणे मेलामेली (सध्याचे नवीन साधन व्हॉट्सऍप ) सुरु झाली. काहींना इंद्रवज्राचे वेध होते तर काहींना हरिशचंद्रच्या वारीचे. एके दिवशी सकाळी बातमी आली “मॉन्सून महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर”. झाले. पंकज लगेच पावसाच्या स्वागताला पळाला. आम्ही मात्र ऑफिसच्या खिडकीत बसून काचेवर बाहेरून जमणाऱ्या थेंबांचा जमेल तसा आनंद लुटत होतो. पण पावसाच्या स्वागताला तर जायलाच हवे ना? आम्ही उरल्या सुरल्या लोकांनी “श्रीगणेशा” म्हणून एक छोटेखानी आणि निवांत भटकंती ठरवली. फक्त पहिल्या पावसाचा आनंद लुटायचा. बस्स. हो-नाही करत एकेक टाळके गळत गेले आणि शेवटी उरली जोडगोळी. मी आणि अजय. भोरगिरी-भीमाशंकरच्या नावावर शिक्का मारून फायनल केले मगच शुक्रवारी पाठ टेकली.
शनिवारी भल्या पहाटे मी आणिअजय निघालो. वाटेतच “स्वीकार” लागते. तिथले इडली-चटणी कसे चुकवणार? नंतर एकेक टंपरभर चहा मारून सुसाट गाडी सोडली. वेळ भरपूर असल्याने वाटेत नारायणगावच्या जवळ उभा असलेला नारायणगड करायचे सुद्धा डोक्यात होतेच. त्यामुळे आधी गाडी तिकडे वळवली. कोरीव पायऱ्या, काळ्याकभिन्न कातळाची नैसर्गिक तटबंदी, पाण्याची भरपूर टाकी आणि देवनागरी शिलालेख अशा अनेक गोष्टी येथे पाहायला मिळत असल्या तरी हा किल्ला अगदीच दुर्लक्षित राहिला आहे. पायथ्याच्या मुक्ताईच्या मंदिरामागून गडाकडे पायवाट जाते. गडचढाई तशी सहजसोप्पी. पाचेक मिनिटे मळलेली पायवाट तुडवल्यावर कातळात कोरलेल्या पायऱ्या लागतात. आजमितीसही या पायऱ्या सुस्थितीत असल्याने चढाई सुकर होते. पंधराच मिनिटात आपण गडाच्या माचीजवळ पोहोचतो. येथे दरवाज्याचे भग्नावशेष आणि तटबंदीचे तुटक अवशेष दिसतात. गडावर प्रवेश केल्यावर गडाचे दोन भाग जाणवतात. डाव्या हाताला दूरवर हस्ताबाईचे मंदिर दिसते. मंदिराची पायवाट बऱ्यापैकी मळली आहे. याच भागात वाड्याचे अवशेष दिसतात. येथे असंख्य कोरीव कामाचे दगड विखुरलेले दिसतात. गडावर येणाऱ्या लोकांनी थोडीफार जाण राखून दरवाज्याची गणेशपट्टी त्या ढिगाऱ्यातून बाहेर काढून ठेवली आहे. वाड्याच्या जोत्यावर उभे राहून त्याचे पूर्वीचे रूप डोळ्यासमोर आणायचे आणि उरलेल्या गाड्फेरीस निघायचे. गडाच्या पूर्व भागात फारसे अवशेष नसले तरी पाण्याची भरपूर टाकी आहेत. त्यातीलच एक महत्वाचे टाके म्हणजे नारायण टाके. येथेच देवनागरी मध्ये लिहिलेला शिलालेख आहे. उन्हापावसाशी झगडून आता त्याची बरीच झीज झाली आहे. याच भागात ५-६ टाक्यांचा एक समूह आहे. तासाभरात गडफेरी करून पायथ्याच्या मंदिरात थोडी विश्रांती घ्यायची.
पावसाच्या स्वागतास निघालो होतो खरे पण अजूनही आम्हाला पावसाची चिन्हे दिसत नव्हती. पंक्याने कोकणकड्यावर ठाण मांडल्याने तो तिकडेच घुटमळत असावा कदाचित. नारायणगावात परत येऊन चमचमीत मिसळ हाणली आणि वरून थंडगार लस्सी रिचवली. पुढचे ठिकाण भोरगिरी. येथे पोचेपर्यंत मात्र पावसाला आमची कीव आली आणि स्वताहून चार पावले टाकत आमच्याच स्वागताला हजर झाला. सह्याद्रीमध्ये काही अशी ठिकाणे आहेत जी पाहता क्षणीच आमच्या सारख्या भटक्यांना भुरळ पडतात. हरिश्चंद्रचा रौद्र कोकणकडा, भैरवगडचे घनदाट जंगल ही त्यातील काही ठिकाणे. त्यात आज या भोरगिरीची भर पडली. चहूबाजूंनी डोंगराने वेढलेले हे ठिकाण. निसर्गाने सह्याद्रीवर अगदी मुक्तहस्ताने सौंदर्याची उधळण केली आहे. खरे तर भीमाशंकरच्या घनदाट जंगलात वसलेला भोरगिरी हा किल्ला आहे कि लेणे यावर एकमत नाही. पण सौंदर्याचे लेणं नक्कीच आहे. पाच-पन्नास घरांचे हे इटुकले भोरगिरी गाव. गावाला अगदी खेटून पिटुकला भोरगड उभा आहे. इतका पिटुकला कि गावात उभे राहूनसुद्धा गडावरच्या गुहेतली हालचाल जाणवेल इतका. गावात शिरल्यावर कोटेश्वराचे (शंकराचे) एक पुरातन देऊळ दिसते. देवळाच्या आवारात अनेक कोरीव दगड विखुरले आहेत. यामध्ये काही वीरगळ आहेत, तर काही शरभाच्या मूर्ती. पारावर बसले कि तिथेले मनुष्य आणि वाघाचे युद्ध करतानाचे शिल्प लक्ष वेधून घेते. एकंदरीत या दगडी कलाकुसरीवरून हे मंदिर पूर्वी हेमाडपंथी बांधणीचे असावे असे वाटते. पावसाने आम्हाला येत असल्याची चाहूल तर दिली होती पण अजूनही तो पलीकडे भिमाशंकरावर अभिषेक घालत होता. सगळीकडे काळवंडून आले होते. पश्चिमेकडून वारा पावसाचे तुषार खेळवत घेऊन येत होता. त्यामुळे पटकन भोरगडाच्या गुहेत जाऊन पावसाचे तांडव बघायचे ठरले. पण वाटेतल्या करवंदीच्या जाळ्यांनी आमचा बेत बिघडवला. रसरशीत, टपोऱ्या आणि चवदार करवंदे झाडावर तशीच ठेवणे आम्हास काही जमले नाही. करवंदांचे तोबरे भरून तडक गुहा गाठली. भोरगडची गुहा एकदम प्रशस्त आहे. गडाच्या या टप्प्यावर दोन गुहा आहेत. खरेतर ही लेणीच आहेत. एकंदरीत खोदकाम आणि आतल्या रचनेवरून बौद्ध भिक्षुंसाठी खोदलेल्या लेण्या वाटतात. पण मधल्या काळात त्याचे रुपांतर देवस्थानात झाले आहे. एका गुहेत आत गाभाऱ्यासदृश खोलीत शंकराची पिंड आहे. तर दुसऱ्या गुहेत माता पार्वती विराजमान आहे. गुहेमध्ये आम्हाला अनपेक्षित पाहुणे भेटले. एक संन्यासी. खणखणीत अंगकाठी. पिळदार मिश्या, भरगच्च दाढी. बडे बाबा (खरे नाव नाही विचारले). शंकराचे भक्त. त्यांच्याशी अध्यात्मावर गप्पा मारता मारता अंधार कधी पडला ते कळलेच नाही.
सह्याद्रीला निसर्गाने जसे सौंदर्याचे वरदान दिले आहे तसेच विविध प्राणी-पक्ष्यांचे सुद्धा दिले आहे. असंख्य प्रकारचे जीव येथे पाहायला मिळतात. त्यातीलच एक काजवा. पावसाळ्याच्या सुरवातीला या काजव्यांचे संमेलन भरत असते. म्हणजे काही ठिकाणी हजारो-लाखो काजवे एकत्र येतात. आणि रात्रभर चमकत बसतात. आपल्याकडे कवी संमेलनात नवकवी कसे एकत्र येऊन उगाच अक्कल पाजळत असतात तसेच काहीसे. पण या संमेलनाप्रमाणे काजव्यांचे हे संमेलन कंटाळवाणे नसते. उलट एक नैसर्गिक अविष्कार बघायला मिळाल्याचा स्वर्गीय आनंद मिळतो. काजव्यांचे ते तालात चमकणे आणि रातकिड्यांचा किरर्र आवाजात मला भुकेचा विसर पडला होता. पण अजयच्या भुकेने मात्र निसर्गावर विजय मिळवत त्याला मॅग्गी करायला भाग पाडले होते. पातेलेभर मॅग्गी संपवून शक्य तिकडून ढेकर देऊन झोपेला आळवत पडून राहिलो. मधेच एका खेकड्याने अजयच्या निद्रापिशवीत शिरायचा प्रयत्न केला होता पण अजयच्या शो-ऑफ बेअर ग्रील्स ला घाबरून बिचारा आल्या वाटेने निघून गेला. रात्री मधूनच एखादा भरकटलेला काजवा गुहेतल्या त्या काळ्याकुट्ट अंधाराला घालवायचा प्रयत्न करून जात होता. तर कधीतरी पाऊस पावसाळा चालू झाल्याची आठवण करून देण्यासाठी भीमाशंकरहून येरझाऱ्या घालत होता. गडापलीकडच्या जंगलातून येणाऱ्या आवाजांचा कानोसा घेत रामप्रहर कसा आला ते समजलेच नाही.
रविवार पहाटेपासूनच पावसाने जोर लाऊन धरला होता. कालचे काजवा संमेलन बघायला अनेक हौशी मंडळी आली होती. त्यांची वर्दळ आता गडावर वाढल्याने आमच्या झोपेचे खोबरे झाले होते. शेवटी गाशा गुंडाळून अजयने चहा बनवला. गुहेच्या ओसरीवर बसून समोर वाऱ्याबरोबर पळणारे ढग, पावसाची रिमझिम बघणे, झाडांच्या पानावर पाणी पडतानाचे सुमधुर संगीत ऐकणे सोबतीला गरम चहाचे घुटके घेणे यापेक्षा एखाद्या ट्रेकर अजून काय हवे असते. आमच्याकडे अख्खा दिवस असल्याने आम्ही निवांत गडफेरीस निघणार होतो. गडावर येणाऱ्या काही हौशी ट्रेकर मंडळी आमच्या गुहेत राहण्यावर भलतीच खुश होत होती. काहींनी तर आमच्याबरोबर फोटो सुद्धा काढून घेतले. त्यामुळे आमचे वजन पावशेराने वाढल्याचे उगाचच वाटत होते. गुहेपासून गडमाथ्यावर आपण पाचच मिनिटात पोचतो. येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक हौशी ट्रेकर आम्हाला सांगितले होते वर काही नाही बघायला. एक टाके आणि एक गुहा बस्स. तरीही आलोय तर जायचे म्हणून आम्ही माथ्यावर आलो. सध्या आम्हाला अनेक उठसुठ ट्रेकर भेटतात. आज हा गड केला तर उद्या तो करणार. पण अगदी बोटावर मोजण्या इतके लोक तो गड “बघतात”. बाकीचे नुसतेच पाहून निघून जातात. भोरगडाच्या माथ्यावर गेल्या गेल्या एक कोठार लागते. पूर्वी कदाचित त्याचा धन्य साठवणुकी साठी उपयोग करीत असावेत. तिथूनच जवळ आम्हाला अनेक पिंडी दिसल्या. काही नेहमीसारख्या गोल तर काही चौकोनी. थोडे पुढे गेलो तर जुन्या पायऱ्या दिसल्या. जवळच वाघाचे एक शिल्प. या व्याघ्रशिल्पाजवळून पूर्वेला एक जुनी पायऱ्यांची वाट खाली दरीत उतरते. नाही म्हणता अनेक गोष्टी फिरताना दिसल्या. दरवाज्याचे, जोत्याचे अवशेष, खोदीव टाकी, तटबंदी. त्यामुळे पूर्वी याचा गडाचा किल्लेवजा टेहळणी साठी उपयोग केला गेला असावा हे जाणवते. गडाचा घेर कमी असल्याने संपूर्ण फेरीस अर्धा तास पुरतो. पूर्वेला उतरणाऱ्या वाटेने जाताना पायऱ्यांवर विशेष काळजी घ्यावी लागते. त्यातून पाऊस असला तर निसरडे असण्याची शक्यता. अगदी सावकाश उतरत या वाटेने दहाव्या मिनिटाला आम्ही सपाटीवर आलो. इथे शेजारी डोंगरातून येणारा ओढ आहे. आत्ताच ही जागा एवढी सुंदर आहे तर पावसाळ्यात पाणी वाहताना कसे असेल याची कल्पना करत गावाची वाट तुडवू लागलो. परत एकदा करवंदाच्या जाळीने आमचा रस्ता अडवला आणि तोबरे भरण्यात रमून गेलो.
आमच्या पावसाळी चिंब भटकंतीचा श्रीगणेशा तर जोमाने झाला होता. आता फक्त बघायचे की हा जोम अशा किती भटकंतीसाठी पुरतो.
Reply