पुण्याच्या आसपास भटकंती करण्यास प्रचंड वाव आहे. कधी सह्याद्रीच्या अंगा-खांद्यावर चढायचे तर कधी धरणाच्या जलाशयापाशी पक्षी निरीक्षण करायचे. तर कधीपुरातन मंदिरे बघत फिरायचे. असेच एक पुरातन मंदिर पुण्याच्या अगदी जवळ आहे. भुलेश्वर. पुणे-सोलापूर रोडला लागुनच. पुणेकरांना थोडेसे अपरिचित असे हे ठिकाण.
मंदिराची रचना एकदम वैशिष्ट्यपूर्ण आहे. मंदिराचे प्रवेशद्वार गोमुखी रचनेचे आहे. बहुधा शत्रूंच्या आक्रमणापासून संरक्षण व्हावे हा हेतू असावा. मंदिरात प्रवेश केल्यावर काहीच विशेष दिसत नाही. पण आत अजून एक छोटे द्वार आहे. या दरवाज्यातून आत गेल्यावर मुख्य मंदिरात जाण्यासाठी दोन दगडी जिने आहे. मंदिर एकदम बंदिस्त आहे. मंदिरात प्रवेश करताक्षणी आपण हरखून जातो. सगळीकडे अप्रतिम कोरीवकाम केलेले दिसते. पुराणातील अनेक संदर्भ येथे कोरीवकामातून दाखवले आहेत. अनेक प्रकारची नर्तकींची शिल्पे येथे पाहायला मिळतात. महाराष्ट्रात फक्त तीन ठिकाणी स्त्री-गणेशाची शिल्पे आहेत. त्या दुर्मिळ शिल्पांपैकी दोन शिल्पे येथे आपणास पाहायला मिळतात. येथील बऱ्याचश्या मूर्ती भग्नावस्थेत आहेत. तरीसुद्धा त्यांचे सौंदर्य आणि कलाकुसर आपल्याला नक्कीच जाणवते. मंदिराच्या भिंतींवर अशी एकही जागा नाही जेथे कोरीवकाम दिसणार नाही. संपूर्ण मंदिरावर अतिशय सुबक घंटांचे कोरीवकामसुद्धा आहे. येथील प्रत्येक शिल्प पाहताना आपण भान हरपून जातोच. येथे आल्यावर फोटोग्राफरचा कॅमेरा आणि रेखाकारांचे कुंचले कधीच उपाशी राहणार नाहीत. कशा-कशाचे फोटो आणि चित्रे काढू असे त्यांना होत असते.
मंदिराच्या प्रसन्न आणि धीरगंभीर वातावरणात तेथील कोरीवकाम अजून उठून दिसते. गाभाऱ्याशेजारीच एक विच्छिन्न झालेल्या अवस्थेत वराहमुर्ती आहे. अशीचएक मूर्ती जवळच्या लोणी-भापकर या गावातील मंदिराजवळ आहे. भूलेश्वारचे मंदिर एका छोट्या टेकडीवर आहे. सोळाव्या शतकात या मंदिराभोवती एक किल्ला बांधण्यात आला. तो म्हणजेच “किल्ले दौलत मंगळ”. सध्या एक-दोन बुरुज आणि थोडीफार तटबंदी एवढेच या किल्ल्याचे अस्तित्व. हा किल्ला मुरार जगदेव याने बांधला असे म्हणतात. मंदिराबाहेर खूप चिंचेची झाडे असल्याने नाना प्रकारचे पक्षीसुद्धा येथे बघायला मिळतात.
भुलेश्वरला जाण्यासाठी दोन रस्ते आहेत. एक सासवड मार्गे आणि दुसरा यवत मार्गे. यवतवरून येणारा रस्ता घाटमार्ग आहे. तर सासवड मार्गे येणारा रस्ता थोडाखराब आहे. पावसाळ्यात रस्त्याच्या दुतर्फा विविध प्रकारची फुले येतात. त्यामुळे तेव्हाची सफर एक वेगळाच अनुभव देणार यात शंकाच नाही. येत्या पावसाळ्यातभुलेश्वरचे भुलवणारे सौंदर्य आणि बाहेर निसर्गाचे खुलवणारे सौंदर्य पाहायला परत एकदा आम्ही तर जाणारच आहोत पण तुम्हीसुद्धा ठरवूनच टाका ही ट्रीप. काय म्हणता?
१. पुणे-सासवड-सिंगापूर-माळशिरस-भुलेश्वर
२. पुणे-लोणी काळभोर-यवत-भुलेश्वर
Reply